आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

४० वर्षांपासून सार्वजनिक आयुष्यात, मागील दोन वर्षांपासून आरोप का? खडसेंचा उद्विग्न सवाल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- मागील ४० वर्षांपासून आपण सार्वजनिक जीवनात वावरत आहोत. त्यातील ३८ वर्षांत कधीच आपल्यावर आरोप झाले नव्हते. परंतु आता असे काय घडले की आपल्यावर असे आरोप होऊ लागले आहेत. एखाद्याचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे कारस्थान योग्य नाही, अशा उद्विग्न भावना माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सोमवारी विधानसभेत व्यक्त केल्या. 


आमदार सुरेश भोळे यांचे लेटरहेड वापरून खडसे यांची बदनामी करणारे पत्र आमदारांसह न्यायालयांनाही पाठवल्याचा गौप्यस्फोट सोमवारी आमदार सुरेश हळवणकर यांनी विधानसभेत केला त्यावर खडसे बोलत होते. आमदार भोळे यांनी ते पत्र आपण दिलेले नाही, असे स्पष्टीकरण देत जळगाव पोलिसांकडे तक्रार केल्याचे म्हटले आहे. या तक्रारीवर एफआयआर दाखल व्हावा, या मागणीसाठी विरोधी पक्षांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतली. त्याची दखल घेत आजच यासंदर्भात माहिती घेऊन एफआयआर दाखल करण्याचे निर्देश अध्यक्ष हरिभाऊ बागडेंना सरकारला द्यावे लागले. या प्रकरणात विरोधक खडसेंच्या मदतीला धावून गेल्याने विधानसभेत सरकारची चांगलीच गोची झाली.


खडसे म्हणाले, यापूर्वी आपल्या नावाने बनावट धनादेशाचे प्रकरणही मी पोलिसांकडे दिले होते. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे न्यायालयात जावे लागले. आता ते प्रकरण सुरू आहे. एका सामाजिक कार्यकर्त्याने ठाण्यातच गोंधळ घातल्याच्या तक्रारीची अद्यापही नोंद नाही. आपण पुराव्यानिशी माहिती दिली असतानाही पोलिसांनी दखल घेतली नाही. पत्र पाठवून आपली बदनामी करणाऱ्या कारस्थानाची चौकशी व्हावी.
  

भानगडी असत्या तर ताठ मानेने बोललो नसतो
शेतीच्या पलीकडे आपले कुठलेही उत्पन्न नाही. एसीबी आणि आयकर विभागाने आजवर चौकशी केली आहे. त्यातही काही आढळले नाही. माझ्या कुठल्या भानगडी असत्या तर ताठ मानेने या सभागृहात बोलू शकलो असतो काय, असा सवालही खडसे यांनी केला. प्रकरणाची तातडीने चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. खडसे यांच्या भावनेशी सहमत होत विरोधी पक्षनेत्यांनी सरकारवर टीकेचे आसूड अोढले.  


खडसेंच्या मदतीसाठी विरोधक आक्रमक  
भोळे यांच्या तक्रारीवर आजच एफआयआर दाखल व्हावा, अशी मागणी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली. त्यावर अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आमदाराने तक्रार दाखल केल्यावर एफआयआर दाखल न होणे ही गंभीर बाब असून त्यावर सरकारने निवेदन करावे, असे निर्देश दिले. मात्र, त्याने विरोधी पक्षांच्या नेत्यांचे समाधान झाले नाही. अध्यक्षांनीच त्यासंबंधी आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली. गुन्हा दाखल झाला की नाही याची माहिती आपण घेत आहोत. तो झाला नसेल तर तसे आदेश दिले जातील, असे अध्यक्ष बागडे यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...