आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकसान भरपाई लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या देणार; मुख्यमंत्र्यांची ग्वाही, मदतीची आकडेवारी सादर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- बोंडअळी कापूस व धान उत्पादकांना जाहीर सर्व मदत पूर्णपणे दिली जाईल. पैसे शेतकऱ्यांच्या खात्यातच जमा होणार असल्याने लाभार्थी शेतकऱ्यांची संपूर्ण यादी जाहीर केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. 


शेतकऱ्यांना मदतीच्या मुद्द्यावर सोमवारी विरोधी पक्षांनी विधानसभेत सरकारची कोंडी केली. विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मध्यरात्रीपर्यंत विधानसभेतच ठाण मांडले होते. मुख्यमंत्री मंगळवारी त्यावर निवेदन देतील, या आश्वासनानंतर विखेंनी माघार घेतली होती. मंगळवारी पुन्हा हा विषय विखे यांनी उपस्थित केल्यावर मुख्यमंत्र्यांनी त्याला सविस्तर उत्तर दिले. मुख्यमंत्र्यांनी म्हणाले, हेक्टरी १३,५०० रुपये प्रमाणे १,००९ कोटींची मदत दिली अाहे. विम्यापोटी शेतकऱ्यांना २,३३७ कोटींची (हेक्टरी १२ हजार) मदत दिल. तर बियाणे कंपन्यांना नोटिसा देऊन १ लाख ५५ हजार शेतकऱ्यांना ९६ कोटींची (हेक्टरी ८ ते १५ हजार) मदत देण्याचे आदेश काढले आहेत. उर्वरित एक लाख प्रकरणांचा लवकरात लवकर निपटारा केला जाईल. एनडीआरएफमार्फत देण्यात येणाऱ्या मदतीचा तिसरा हप्ता येत्या १५ दिवसात देण्यात येणार असून पुरवणी मागण्यांमध्ये त्याबाबतची व्यवस्था करण्यात आली आहे. बियाणे कंपन्यांकडून मिळणाऱ्या मदतीबाबत सात लाख प्रकरणांच्या सुनावण्या पूर्ण झाल्या असून महिनाभरात त्याबाबतची पुढील प्रक्रिया पूर्ण होईल. 


भरपाई न मिळालेल्या प्रकरणांसाठी टास्क फोर्स 
ज्या प्रभावित शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून कुठलीच नुकसान भरपाई मिळालेली नाही, अशा प्रकरणांसाठी टास्क फोर्स गठीत केला जाईल. गरज वाटल्यास अशा शेतकऱ्यांना सरकारकडून मदत दिली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या सरकारने जाहीर कराव्या, अशी मागणी अजित पवारांनी केली. शासनाने शेतकऱ्यांना जाहीर केलेली संपूर्ण नुकसान भरपाई दिली जाईल. त्याचप्रमाणे लाभार्थी शेतकऱ्यांच्या सविस्तर याद्या जाहीर केल्या जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 

बातम्या आणखी आहेत...