आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिडेंचे वक्तव्य बेकायदेशीर असल्यास कारवाई; मनुवादाचे समर्थन करण्याचा प्रश्नच नाही : मुख्यमंत्री

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी मनुवादाबाबत केलेले वक्तव्य तपासून त्यात काही बेकायदेशीर बाब अाढळल्यास भिडेंवर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत सांगितले. हे सरकार ज्ञानोबा आणि तुकोबांच्या तसेच भारतीय संविधानाच्या विचाराने चालणारे असल्याने मनुवादाचे समर्थन करण्याचा प्रश्नच नाही, अशी ग्वाहीदेखील त्यांनी या वेळी दिली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि अजित पवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर निवेदन करताना मुख्यमंत्री बोलत होते. 


संत ज्ञानोबा व तुकोबा माउलींच्या अपमान करत मनू हा या दोन्ही संतांच्या एक पाऊल पुढे असल्याचे धक्कादायक वक्तव्य भिडे यांनी केले होते. या घटनेचा उल्लेख करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सरकारला जाब विचारला. हा महाराष्ट्र संतांची शिकवण आणि फुले- शाहू- आंबेडकरांच्या विचारावर चालणारा असताना अशी संविधानविरोधी भूमिका कशी काय मांडली जाऊ शकते, असा सवाल त्यांनी केला. गेल्या वर्षीदेखील या भिडेचे कार्यकर्ते तलवारी घेऊन वारीत घुसले होते. तरुणांना बिघडवण्याचे काम ही व्यक्ती करत असून त्या मागचा मास्टरमाइंड कोण आहे, त्याचा शोध घ्या. याच भिडेने आंबा खाऊन अपत्यप्राप्ती होत असल्याचा दावा केल्याची आठवणही पवार यांनी या वेळी करून दिली. तर कोरेगाव भीमाप्रकरणी प्रमुख संशयित असतानाही त्याला अटक केली जात नाही. सरकार भिडेला पाठीशी घालत आहे. त्यातच आता संतांचा अपमान करणाऱ्या या व्यक्तीबाबत लोकांमध्ये संताप असल्याचे विखे म्हणाले.

 
संविधानाविरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई 
गेल्या वर्षी पालखी मिरवणुकीत तलवारी घेऊन घुसलेल्या भिडेंच्या कार्यकर्त्यांना वारकऱ्यांनी आक्षेप घेतल्यानंतर कुणालाही पालखी मिरवणुकीत दर्शनाला येताना किंवा मिरवणुकीच्या स्वागतासाठी शस्त्र आणण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र, अनेक धार्मिक सोहळ्यात शस्त्रे वापरली जात असल्याने शस्त्रांची प्रतिकृती आणण्यास परवानगी आहे. राज्य सरकार अशा पद्धतीच्या कोणत्याही प्रवृत्तीला थारा देत नसून संविधानाच्या विरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. मनुच्या विचारांचा प्रसार करणाऱ्याचे सरकार कधीही समर्थन करणार नाही, असा खुलासाही मुख्यमंत्र्यांनी या वेळी केला. 

बातम्या आणखी आहेत...