आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाम्पत्याने केली शेतकरी महिलेची विष पाजून हत्या; पती-पत्नी गजाआड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - वलगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रामा साऊर येथील ई क्लास शेतातील पेरणीच्या वादातून एका दांपत्याने ३२ वर्षीय शेतकरी महिलेला विष पाजून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी समोर आली. या प्रकरणी वलगाव पोलिसांनी पती पत्नीला अटक केली आहे.

 

संगीता प्रल्हाद चव्हाण (३२ रा. रामासाऊर) असे मृतक महिलेचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी रामेश्वर धर्माजी चव्हाण (६५) आणि त्याची पत्नी चंचला रामेश्वर चव्हाण (३८, रा. रामा साऊर) यांना अटक केली. संगीता चव्हाण व त्यांचे कुटुंबीय मागील पाच वर्षांपासून गावातच असलेली ई क्लासची जमिनीची वहिती करत आहे. वास्तविक ही शेती ई क्लासमध्ये आहे. याच कारणावरून संगीता चव्हाणचे कुटुंब व रामेश्वर चव्हाण यांच्यामध्ये पावसाळ्यापासून वाद सुरू होते. यापूर्वी दोन्ही गट एक - दोन वेळा पोलिसांत गेले होते. दरम्यान, सकाळी संगीता व त्यांची सासू रेखा या दोघी शेतात गेल्या. त्यावेळी रामेश्वर, त्याची पत्नी व काही मजूर शेतात हरभरा कापण्याचे काम करत होते. आमच्या शेतात कसे काय हरभरा कापता यावरून रामेश्वर व संगीता यांच्यात शेतात वाद झाला.


यावेळी त्याने संगीताच्या आजारी सासूच्या दिशेने कुऱ्हाड फेकून मारली, ती सासूबाईंना लागली नाही. मात्र ती वृद्ध महिला खाली कोसळली. त्यानंतर रामेश्वर व त्याची पत्नी संगीताच्या दिशेने धावत आले व त्यांनी तिला विष पाजले, असा आरोप केला आहे. त्यानंतर अत्यवस्थ झालेली संगीता व तिची सासू रस्त्यापर्यंत आली. त्यानंतर गंभीर अवस्थेत संगीताला इर्विनमध्ये दाखल केले. उपचारासाठी उशीर झाल्यामुळे उपचारादरम्यान शनिवारी संगीताची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी संगीताच्या नातेवाइकांनी रामेश्वर व त्याच्या पत्नीवर आरोप केले.संगीताची सासू शेतात होती. यावरून पोलिसांनी रामेश्वर व त्याच्या पत्नीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

 

बातम्या आणखी आहेत...