आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'दारु दुकान बंद'साठी नारीशक्तीचा एल्गार; अमरावतीमध्‍ये 300 महिलांचे आज आंदोलन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बडनेरा जुनीवस्ती येथील महिलांनी दुर्गावतार घेत सहा महिन्यांपूर्वी देशी दारू दुकानासमोर अशाप्रकारे दारूच्या बाटल्या फोडत आंदोलन केले होते. - Divya Marathi
बडनेरा जुनीवस्ती येथील महिलांनी दुर्गावतार घेत सहा महिन्यांपूर्वी देशी दारू दुकानासमोर अशाप्रकारे दारूच्या बाटल्या फोडत आंदोलन केले होते.

अमरावती - जागतिक महिला दिनी, ८ मार्च रोजी बडनेराच्या शाळेसमोरील दारुचे दुकान बंद करण्यासाठी स्थानिक नारीशक्ती एल्गार पुकारणार आहे. सुमारे सहा महिन्यांपूर्वी दुकानसमोरच दुर्गावतार धारण करत महिलांनी देशी दारुच्या बाटल्या फोडल्या होत्या. दुकानालादेखील कुलूप ठोकले होते. त्यावेळी स्टॅम्प पेपरवर लिहून दिलेल्या शपथपत्रानुसार दुकान अन्यत्र हलवायला दुकानदार तयार नसल्याने पुन्हा आंदोलनाचा शंखनाद करण्याचा पवित्रा ३०० महिलांनी घेतला आहे.


गुरुवारी होणाऱ्या आंदोलनात शहरातील सर्वच राजकीय पक्षाच्या सुमारे ३०० महिला कार्यकर्त्या सहभागी होत आहेत. शहरातील कित्येक कुटुंबे उदध्वस्त होण्यास कारणीभूत ठरलेल्या बडनेरा जुनीवस्ती बारीपुरा भगतसिंग चौकातील देशी दारु दुकानाविरोधात मागील सुमारे ३० वर्षांपासून आंदोलन केले जात आहे.


गांधी प्राथमिक शाळेसमोर दुकान असल्याने विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच त्यांच्या पालकांना मद्यपींचा कमालीचा त्रास होत आहे. येथून ये-जा करणाऱ्या महिलांच्या नाकी नऊ आले आहे. दारुडे रस्त्याच्या कडेला लघुशंका करीत असल्याने येथील रहिवाशांनादेखील प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. देशी दारुमुळे जुनीवस्ती भागातील असंख्य कुटुंबे उघड्यावर आल्याने महिलांच्या संयम सुटला आहे. मागील काही वर्षांपासून महिलांना निवेदन देत प्रशासनाचे लक्ष वेधले होते.

 

दारु दुकानदाराने स्टॅम्प पेपरवर दिले होते दुकान बंद करण्याचे शपथपत्र : गत वर्षी शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे सहा महिने जुनीवस्ती भगतसिंग चौकातील दारु दुकान बंद होते. मात्र, सरकारने निर्णय फिरविल्याने पुन्हा दारुची दुकाने सुरू झाली. मात्र बडनेरा जुनीवस्ती भगतसिंग चौकातील देशी दारुचे दुकान पुन्हा सुरू होऊ द्यायचे नाही असा चंग महिलांनी बांधला. दुकानमालक राजेश शालीकराम जयस्वाल २२ सप्टेंबर २०१७ रोजी देशी दारुचे दुकान सुरू केले. दुकान पुन्हा उघडल्याचे लक्षात आल्याने शेकडो महिलांनी भगतसिंग चौकातील देशी दारु दुकानावर त्याच दिवशी धडक दिली. पेट्या बाहेर काढत महिलांनी दारुच्या बाटल्यांचा दुकानासमोरच चुराडा केला होता. दुसऱ्या दिवशी बडनेरा पोलिस ठाण्यावरही शेकडो महिलांनी धडक दिली. त्यावेळी जयस्वाल यांनी देशी दारुचे दुकान अन्यत्र हलविण्याबाबत नागरिकांसमक्ष १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहून दिले.

 

शपथपत्र लिहून घेणाऱ्या पोलिसांचेही कानावर हात !
बडनेरा जुनीवस्ती बारीपुरा भागातील देशी दारूचे दुकान हटवण्याच्या मागणीसाठी करावयाच्या आंदोलनाचे नेतृत्व बडनेरा शहरातील सर्वपक्षीय नारीशक्ती करणार असल्याचे भाजपाचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी कळवले आहे. दारूचे दुकान हटवण्यासंदर्भात दुकान मालकाकडून पोलिस ठाण्यात शपथपत्र घेणाऱ्या पोलिसांनीही आता कानावर हात ठेवले असल्याचे कुळकर्णी यांनी 'दिव्य मराठी' शी बोलताना सांगितले.

 

बातम्या आणखी आहेत...