आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहिणीसोबत लग्न केल्यामुळे डोक्यात मारला दगड, युवकास 3 वर्षांचा तुरुंगवास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मोखड गावात राहणाऱ्या एका युवकाने गावातीलच एका युवतीसोबत लग्न केले होते. या लग्नाला मुलीच्या भावाचा विरोध होता. त्याने लग्न करणाऱ्या युवकाला डोक्यात दगड मारला. या प्रकरणात दगड मारणाऱ्याविरुध्द दोष सिध्द झाल्यामुळे न्यायालयाने त्याला सोमवारी (दि. 25) तीन वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली. देवानंद उद्धवराव गुर्जर (34, रा. माेखड, नांदगाव खंडेश्वर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. 

 

7 नोव्हेंबर 2013 ला सायंकाळी साडेपाच वाजता गुर्जरने गावातच राहणाऱ्या उमेश बाबाराव घोरडे (24) याला डोक्यात दगड मारला होता. उमेशने घटनेच्या तीन महिन्यांपूर्वी गुर्जरच्या बहिणीसोबत लग्न केले  होते. हे स्थळ बहिणीसाठी देवानंदला पसंत नव्हते. त्यामुळे त्याचा विरोध होता. या कारणावरून गुर्जर व घोरडेचा वाद होऊन गुर्जरने त्याला मारहाण केली. या प्रकरणात उमेशची बहीण रेखा विष्णू पाटणकर (29, रा. बोरीअरब, दारव्हा)  यांनी नांदगाव खंडेश्वर पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी देवानंद गुर्जरविरुध्द जीवघेणा हल्ला करणे या कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.

 

सदर प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश क्रमांक 4 यांनी देवानंद गुर्जरला प्राणघातक हल्ला प्रकरणाऐवजी गंभीर मारहाण या कलमान्वये तीन वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. 

बातम्या आणखी आहेत...