आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान कृषी सिंचन योजनेसाठी २०३ कोटी; शिवसेनेचा विरोध, तरी बुलेट ट्रेनसाठी २५० कोटी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी बुधवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत ११ हजार ४४५ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांसह महापालिका, नगरपालिका तसेच आमदारांच्या सूचनांद्वारे  ग्रामीण भागातील विकास कामांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या पंतप्रधान कृषी सिंचन योजनेसाठी २०३ कोटी रुपये तर शेतकऱ्यांकडून तूर खरेदीसाठी दिलेल्या शासन हमी कर्जाच्या एकरकमी परतफेडीसाठी १ हजार ५२८ कोटींची तरतूद आहे. आगामी वर्ष हे निवडणुकांचे वर्ष असल्याने केंद्र आणि राज्य सरकारचा आगामी अर्थसंकल्प हा हंगामी स्वरुपाचा असेल. परिणामी त्या अर्थसंकल्पात सरकारच्या विशेष प्रकल्पांसाठी भरीव तरतूद करणे शक्य होणार नाही. ही बाब लक्षात घेऊन यावेळच्या पुरवणी मागण्यांमध्येच या योजना आणि प्रकल्पांसाठी तरतूद करण्यात आली आहे. 


या तरतूदींच्या आधारे संबंधित योजना किंवा प्रकल्प मार्गी लावून त्यांचा वापर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात करण्याचा सरकारचा हेतू यातून स्पष्ट होत आहे. याशिवाय राज्यातील बालके, गरोदर आणि स्तनदा मातांसाठी राबवल्या जाणाऱ्या आहार योजनेसाठी ५०० कोटी, अंगणवाडी सेविकांच्या मानधनासाठी अतिरिक्त तरतूद म्हणून ४९३ कोटी, चंद्रपूरच्या सैनिकी शाळेसाठी ११५ कोटी, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला अंशदान म्हणून १०० कोटी तर चंद्रपूर, रत्नागिरी आणि कोल्हापूर विमानतळाच्या विकास कामासाठी ९६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. भीमा - कोरेगाव दंगलीतील बाधितांसाठी आठ कोटी रुपयांची तरतूद पुरवणी मागणीत आहे. या पुरवणी मागण्यांवर ९ आणि १० जुलै रोजी सभागृहात चर्चा होणार असल्याची घोषणा विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली. 


विभागनिहाय तरतूद 
सहकार, पणन, वस्त्रोद्योग - १,८५३ कोटी
नगरविकास - १,६८६ कोटी
ग्रामविकास - १,३६७ कोटी
सार्वजनिक आरोग्य - १,१४२ कोटी
महिला आणि बालविकास - १,०१६ कोटी


दोन हेलिकॉप्टरची खरेदी
अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या हवाई प्रवासासाठी राज्य सरकार दोन हेलिकॉप्टर्स खरेदी करणार असून त्यासाठी १५९ कोटी ६३ लाख रुपयांची तरतूद केली आहे. मुंबईत नुकत्याच झालेल्या विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ही बाब महत्वाची मानली जात आहे.


शिवसेनेचा विरोध, तरी बुलेट ट्रेनसाठी २५० कोटी
नाणार प्रकल्पावरून नाराज असलेल्या शिवसेनेचा विरोध असूनही मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी २५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.


पत्रकारांसाठी पेन्शन योजना
ज्येष्ठ पत्रकारांसाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेअंतर्गत निवृत्तिवेतन देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. यासाठी पुरवणी मागण्यांमध्ये १५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.

 

दीपक केसरकर यांनी सादर केलेल्या पुरवणी मागण्या 
- मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुंबई, पुणे तसेच नागपूर मेट्रोसाठी ८५० कोटी
- भारत नेट टप्पा-दोन -३०० कोटी, महात्मा फुले जन आरोग्य योजना -७६९ कोटी
- राज्यात ५० कोटी वृक्ष लागवडीसाठी -२५० कोटी
-  ग्रामीण भागातील आमदारांद्वारे २५/१५ प्रस्तावांतर्गत मतदारसंघातील कामांसाठी १ हजार कोटी
-  नगरपालिकांना वैशिष्ट्यपूर्ण कामाचे अनुदान -५४६ कोटी
-  महापालिका क्षेत्रातील मूलभूत सुविधांसाठी -१९० कोटी

बातम्या आणखी आहेत...