आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाेस्ट ग्रॅज्युएट तरुणांनाही व्हायचे पोलिस; 169 जागांसाठी 46 हजार अर्ज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहर पोलिस, एसआरपीएफ व ग्रामीण पोलिसांकडे एकूण १६९ जागांसाठी भरती प्रक्रिया होणार असून, त्यासाठी जवळपास ४६ हजार ६७८ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. पोलिस भरतीची मैदानी चाचणीची प्रक्रिया ७ मार्चपासून सुरू होणार होती, मात्र काही कारणास्तव संपूर्ण राज्यातच आता १२ मार्चपासून सुरू होत असून मंगळवार, ६ मार्चला उमेदवारांना चालान भरण्याची शेवटची तारीख होती.

 

शहर पोलिस दलात ३० जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासाठी पोलिसांकडे ६५५५ उमेदवारांनी अर्ज भरले. तसेच एसआरपीएफ (राज्य राखीव पोलिस दल) ४६ जागांसाठी १४१२३ अर्ज आले, तर ग्रामीण पोलिसांत सर्वाधिक म्हणजेच तब्बल ९३ जागांसाठी भरती होत आहे. ९३ जागांसाठी ६ मार्चला सायंकाळपर्यंत २५ हजार ३८ अर्ज प्राप्त झाले असून, १ हजार ११६ अर्जांचे चालान प्रक्रियेत होते. अशा पद्धतीने जवळपास २६ हजार अर्ज प्राप्त होणार आहेत. यामध्ये २०१०१ अर्ज पुरुषांचे, तर ४९३७ महिला उमेदवारांचे आहेत. १२ मार्चपासून शहर पोलिसांची भरती प्रक्रिया मुख्यालयाच्या मैदानात तसेच ग्रामीण पोलिसांची जोग स्टेडियम, तर एसआरपीएफची एसआरपीएफच्याच मैदानावर सुरू होणार आहे.

 

उच्चशिक्षित तरुणांचा भरतीकडे वाढता कल
मागील काही वर्षांपासून शासकीय नोकऱ्यांचे प्रमाण अत्यल्प झाले आहे. यामध्ये पोलिस भरतीच एकमेव अशी भरती प्रक्रिया आहे की, जी दरवर्षी होते. त्यामुळे अलीकडच्या काळात पोलिस भरतीसाठी उच्चशिक्षित तरुणांची गर्दी वाढली आहे. एसआरपीएफला आलेल्या १४१२३ अर्जापैंकी ३१९२ उमेदवार पदवीधर, तर १४७ उमेदवार पदव्युत्तर पदवीधर आहे. तसेच शहर पोलिस दलासाठी अर्ज केलेल्या ६५५५ उमेदवारांपैकी ९८ उमेदवार पदव्युत्तर पदवीधर, तर १५६४ पदवीधर आहेत.


सर्वाधिक स्पर्धा एसआरपीएफमध्ये
आयुक्तालय, एसआरपीएफ तसेच ग्रामीण पोलिस या तिन्ही ठिकाणी उमेदवारांची प्रचंड संख्या आहे. मात्र तिन्ही भरती प्रक्रियेमध्ये पाहिले असता सर्वाधिक स्पर्धा एसआरपीएफसाठी आहे. एसआरपीएफच्या ४६ जागांसाठी तब्बल १४१२३ अर्ज प्राप्त झाले आहेत. यावरून एका जागेसाठी जवळपास ३०७ उमेदवारांमध्ये स्पर्धा दिसून येते. यात उच्चशिक्षितांचे अर्ज मोठ्या प्रमाणावर दाखल झालले आहेत.

 

ग्रामीण पोलिस बोलावणार दरदिवशी ७०० ते हजार उमेदवार
पोलिस भरती प्रक्रियेदरम्यान सुरुवातीला दोन दिवस प्रति दिवस ७००, तर उर्वरित सर्व दिवस प्रति दिवस एक हजार उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी बोलावण्यात येणार आहे. भरती प्रक्रियेदरम्यान अर्ज तपासणी नंतर शारीरिक मोजमाप व त्याच दिवशी मैदानी चाचणी पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा होणार आहे.
- शिरीष राठोड, उपअधीक्षक (गृह).

 

बातम्या आणखी आहेत...