आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यवतमाळ: नायलॉन मांजाने आठवडाभरात घेतला 7 पक्ष्यांचा जीव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर करण्यावर कायदेशीर बंदी आहेत. कारण नायलॉन मांजा पक्ष्यांसोबत मनुष्यासाठीही घातक ठरतो. तरीही शहरात नायलॉन मांजाचा वापर सुरूच असल्याचे दिसून येते. दोन पक्षिमित्र संघटनेच्या माहितीवरून शहरात मागील आठवडाभरात तब्बल सात पक्ष्यांचा नायलॉन मांजाने कापल्यामुळे मृत्यू झाला. मकरसंक्रांतीमुळे पतंग उडवण्याचे प्रमाण वाढले असून, नायलॉन मांजाचा वापर करू नये, अशी अपेक्षा पक्षी मित्रांनी व्यक्त केली आहे.

 

कायद्याने बंदी असून सुद्धा बाजारात नायलॉन किंवा चायना मांजा उपलब्ध असल्यामुळे वापरला जातोय. केवळ पक्षीच नव्हे, तर मनुष्यांनासुद्धा या मांजामुळे धोका आहे. पर्यावरण संवर्धन कायदा १९८६, प्राण्यांना क्रूरपणे वागवण्यास प्रतिबंध कायदा १९६०, वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ व भारतीय दंड विधान कायद्यांतर्गत नायलॉन मांजाचा उपयोग करणे हा गुन्हा आहे. तरी नायलॉन मांजाच्या वापरामुळे अमरावती शहरात गेल्या आठवड्यात एकूण ७ पक्षी जखमी झाले होते. त्यामध्ये घुबड, घार, कबुतर, कोतवाल, पारवा यासह अन्य पक्ष्यांचा समावेश आहे. या पक्ष्यांना उपचारासाठी पक्षिमित्र व पशुशल्य चिकित्सकांपर्यंत पोहोचवण्यात आले. मात्र ते पक्षी वाचू शकले नाहीत. त्यामुळे पतंग उडवणाऱ्यांनी नायलॉन मांजाचा वापर करू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली.

 

जनजागृतीसाठी प्रतीकात्मक पक्ष्यांवर स्वाक्षरी मोहीम : नायलॉन व चायनीज मांजामुळे पक्ष्यांसह मानवी जीवितालाही धोका निर्माण होतो. त्यामुळे हा जीवघेणा मांजा वापरू नये, विकत घेऊ नये याबाबत जनजागृती करण्यासाठी सोमवार, १५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजतापासून राजकमल चौकात स्वाक्षरी अभियान राबवण्यात येणार आहे. या वेळी जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पोलिस आयुक्त, काही शाळांचे विद्यार्थी, पालकांची उपस्थिती राहणार आहे. प्रतीकात्मक पक्षी तयार करून त्यावरच ही स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येणार आहे.

 

मांजा विरोधात लोकचळवळ हवी
नायलॉन मांजाच्या वापरावर कायद्याने बंदी आहे. या मांजाची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यावर कडक कारवाई अपेक्षित आहे. नागरिकांनी प्राण्यांचा जीव जाणार नाही याची काळजी घ्यावी. पक्षी संवर्धनात सहकार्य करावे.
- यादव तरटे, वन्यजीव अभ्यासक, दिशा.

 

मांजा मिळाल्यास कारवाई होणार
नायलॉन व चायनीज मांजाची विक्री करू नये. कोणी विक्री केली, तर त्याच्याविरुद्ध कारवाई होईल. मांजा विक्रीच्या दुकानांची तपासणी करून कारवाई करण्याच्या सूचना सर्व ठाणेदारांना दिल्या.'' दत्तात्रय मंडलिक, पोलिस आयुक्त.

बातम्या आणखी आहेत...