आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीमध्ये नाल्याच्या पुरात बहिण-भाऊ गेले वाहून; वडील व आजोबा बचावले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- सध्या सार्वत्रिक पाऊस जिल्ह्यात झालेला नाही. मात्र काही भागात जोरदार पाऊस आल्यामुळे नदी, नाले धो-धो वाहत आहे. दरम्यान, बुधवारी (दि. २७) रात्री आठ वाजताच्या सुमारास बडनेरा शहरालगत असलेल्या काटआमला गावातून वाहणाऱ्या नाल्याच्या पुलावरून दुचाकीने जात असताना पाण्याचा अंदाज न आल्याने चौघेही पाण्यात पडले. त्यावेळी वडील व आजोबा कसेबसे पाण्यातून बाहेर पडले मात्र सात वर्षीय चिमुकला व दहा वर्षीय मुलगी पाण्यात वाहून गेले. दोघांचाही शोध घेत असताना मुलीचा मृतदेह गुरूवारी (दि. २८) सकाळी मिळाला असून मुलाचा शोध सुरू आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 


भातकुली तालुक्यातील बुऱ्हाणपूर येथे राहणारी धनश्री जगदीश चवरे (वय १०) व धनश्रीचा लहान भाऊ नैतिक (वय ७) असे पाण्यात वाहत गेलेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. धनश्री व नैतिक हे दोघेही बडनेरा येथील शाळेत शिक्षण घेत होते. बुधवारी हे दोघेही सायंकाळी शाळेतून आले. त्याचवेळी धनश्री, नैतिकचे वडील जगदीश मारुती चवरे त्यांच्या वडिलांना दुचाकीने घेऊन बडनेरा येथे आले. बडनेरावरून धनश्री, नैतिक, जगदीश चवरे व मारुती चवरे हे चौघेही अमरावतीला आले. त्यांना अमरावती शहरात काही काम शहरात होते. ते काम आटोपून चौघेही आपल्या दुचाकीनेच गावी जाण्यासाठी निघाले. बुऱ्हाणपूर येथे त्यांच्यागावकडे जाण्यासाठी काटआमला येथून जावे लागते. याच मार्गावर एक नाला वाहतो व या नाल्याला पूर आलेला होता. रात्री आठ ते साडेआठ वाजताच्या सुमारास चवरे काटआमला येथून वाहणाऱ्या नाल्याजवळ पोहोचले. त्यावेळी पाणी पुलावरून जात होते. याच पाण्यातून चौघे बसून असलेले दुचाकी पुलावर टाकली. 

 

यावेळी नाल्याच्या पाण्याचा जोर अधिक असल्यामुळे दुचाकी पुलावर कोसळली. त्यामुळे चौघेही खाली पडले. यावेळी जगदीश व त्यांचे वडील मारुती हे कसेबसे पाण्यातून बाहेर निघाले मात्र धनश्री व नैतिक वाहत गेले. त्यांना पाण्यातून बाहेर येणे शक्य झाले नाही. यावेळी जगदीश व मारुती चवरे यांनी दोन्ही चिमुरड्यांचा शोध घेतला मात्र ते मिळाले नाही. या घटनेची माहिती बडनेरा पोलिस तसेच भातकुली तहसीलदारांना देण्यात आली. तत्काळ महसूल विभागाचे बचाव पथक तसेच महानगरपालिकेची बचाव चमू घटनास्थळी पोहोचली मात्र रात्रीची वेळ असल्यामुळे त्यांनाही शोधकार्य राबवता आले नाही. दरम्यान, गुरूवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू झाली. त्यावेळी काटआमल्यापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या परलाम गावात याच नाल्याच्या पुलाजवळ धनश्रीचा मृतदेह मिळून आला. मात्र नैतिकचा गुरूवारी सायंकाळपर्यंतही शोध लागला नव्हता. पुरात वाहून गेलेल्या मुलाचा युद्धपातळीवर पोलिस, महसूल व महापािलकेचे बचाव पथक नैतिकच्या शोधासाठी प्रयत्न करत आहे. तसेच भातकुलीचे तहसीलदार डॉ. अजितकुमार येळे, बडनेराचे ठाणेदार शरद कुलकर्णी यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ताफा परलाम, काटआमला परिसरात हजर होता. 


चार पथक घेताहेत मुलाचा शोध 
आम्ही बचाव पथकासह घटनास्थळी पोहोचलो. मुलीचा मृतदेह मिळाला . मुलाचा शोध घेण्यासाठी महसूल, महापालिका, तलाठी तसेच पेालिस पथक प्रयत्न करत आहेत. त्यासाठी जेसीबी, पोकलँडची मदत घेत आहोत. 
- डॉ. अजितकुमार येळे, तहसीलदार 


तीन ठिकाणी शोध मोहीम सुरू 
मुलीचा मृतदेह परलाम या गावाजवळ मिळाला आहे मात्र मुलाचा अद्याप शोध लागलेला नाही. त्याच्या शोधासाठी परलाम, काटआमला व बुऱ्हाणपूर परिसरात वेगवेगळ्या पथकाद्वारे शोधमोहीम सुरू आहे. 
- शरद कुलकर्णी, ठाणेदार, बडनेरा. 

बातम्या आणखी आहेत...