आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता आषाढी वारीला आमचा \'पांडुरंग\' सोबत नसेल : माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या भावना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनाने राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यामुळे येत्या आषाढीच्या वारीला आमचा पांडुरंग आमच्या सोबत राहणार नाही, अशा शब्दांत माजी कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी फुंडकरांच्या शोकप्रस्तावावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. 


अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी माजी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्यासह माजी गृह राज्यमंत्री भाई वैद्य, यवतमाळचे माजी आमदार बापूसाहेब पानघाटे, दगडू बडे (पाटील) या दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करणारा शोकप्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडला. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले, 'शेतीच्या प्रश्नांवर भाऊसाहेबांना विशेष आस्था होती. आपल्या ताकदीच्या जोरावर त्यांनी राजकारणात स्थान निर्माण केले. राज्यात भाजपचा सर्वदूर प्रसार करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. कृषिमंत्री म्हणून त्यांनी पीक विमा, कृषी संजीवनीसारख्या योजना प्रभावी पद्धतीने अमलात आणण्याचे प्रयत्न केले. त्यांच्या अकाली निधनाने भाजपचे आणि राज्याचेही मोठे नुकसान झाले. 'कृषिमंत्री म्हणून झालेली टीका त्यांनी अतिशय सकारात्मक पद्धतीने घेतली. भाऊसाहेबांसारखा संयमीपणा मंत्रिमंडळातील प्रत्येक मंत्र्याने शिकायला हवा,' असा सल्ला विरोधी पक्ष नेते विखे पाटील यांनी या वेळी दिला. 


शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावून द्यावी श्रद्धांजली 
राज्याचे विद्यमान कृषिमंत्री असतानाही भाऊसाहेबांच्या निधनानंतर राज्य शासनाने दुखवटा जाहीर केला नाही, शासकीय स्तरावर श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला नाही, अशी टीका करतानाच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात भाजपचे सरकार आल्यावर भाऊसाहेबांना मंत्रिपदासाठी दोन वर्षे प्रतीक्षा करावी लागली, याचाही या वेळी उल्लेख केला. सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावून त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहनही अजित पवार यांनी केले. 


यांनीही जागवल्या आठवणी 
अनिल सोले, सुरेश धस, गोपीकिशन बाजोरिया, हरिभाऊ राठोड, जोगेंद्र कवाडे, माणिकराव ठाकरे, सदाभाऊ खोत, रामहरी रूपनवर या सदस्यांनी फुंडकर यांच्या आठवणी जाग्या केल्या. 


सेनेचेही भाजपवर टीकास्त्र 
शिवसेना नेते आणि मंत्री दिवाकर रावते यांनीही या वेळी टीकास्त्र सोडले. फुंडकरांनी भाजपचा पक्षविस्तार केला, म्हणून तुम्ही सत्तेत आहात, असे बसलेल्या भाजप सदस्यांकडे पाहून म्हणत राज्य विधिमंडळाची अधिवेशने शेतीच्या प्रश्नावर गाजत असतानाही तुम्ही फुंडकरांना कृषिमंत्रिपद वेळेत का दिले नाही?' असा सवालही केला. 'आपला पक्ष राज्यात आणि केंद्रात सत्तेत आहे. तरीसुद्धा शेतकरी आत्महत्या आपण रोखू शकत नाही, याची मोठी खंत भाऊसाहेबांच्या चेहऱ्यावर कायम होती,' असा मुद्दा राष्ट्रवादीचे हेमंत टकले यांनी मांडला. 

 

फुंडकरांच्या शोकप्रस्तावात भाजपला चिमटे 
दिवंगत कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी पक्षविस्तारासाठी मोठे योगदान दिलेले असताना पक्षाने मात्र त्यांना मंत्रिपदासाठी तिष्ठत ठेवले, अशी खंत विरोधी आणि सत्ताधारी बाकांवरील सदस्यांनी व्यक्त केली. 


निधन झालेल्या सदस्यांवर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव मांडले जातात. त्यावर सरकार आणि सभागृहातील राजकीय पक्षांचे सदस्य मनोगते मांडत असतात. त्या प्रथेनुसार महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज फुंडकर यांच्यावरील शोकप्रस्ताव विधान परिषदेत मांडला. शोकप्रस्तावात संबंधित व्यक्तीच्या आठवणी जागवल्या जातात. अशा प्रस्तावात आरोप केले जात नाहीत. मात्र आज फुंडकर यांच्यावरील शोकप्रस्तावात भाजपला चिमटे काढण्यात आले. त्याची सुरुवात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. ते म्हणाले 'भाऊसाहेबांना मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात स्थान द्यायला हवे होते. मात्र ते स्थान भाऊसाहेबांना दिले नाही. भाजपने भाऊसाहेबांच्या योगदानाची योग्य ती दखल घेतली नाही.

 

बातम्या आणखी आहेत...