आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती विद्यापीठाची खाद्रींना 'कॅरेक्टर रोल वार्निंग' तर सिकचींना दंड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- गैरवर्तणूक प्रकरणी भुगर्भशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एस. आर. एफ. खाद्री यांना 'कॅरेक्टर रोल वार्निंग' तर डॉ. आर. डी. सिकची यांना राज्य माहिती आयुक्तांनी दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. अश्या गंभीर प्रकारची कारवाई झाली असताना दोघांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विद्वत परिषदेवर नामीत करण्यात आले आहे. प्रा. राजेंद्र प्रसाद यांच्याकडून तक्रार करण्यात आल्यानंतर कुलगुरू डाॅ. मुरलीधर चांदेकर यांनी या प्रकरणाची चौकशी आरंभली आहे. 


विद्वत परिषद हे विद्यापीठाचे अभ्यास विषयक तसेच शैक्षणिक बाबतीत निर्णय घेणारे महत्वपूर्ण प्राधीकरण आहे. कारवाई झाली असल्याने विद्यापीठ कायद्याचे कलम ६४ अंतर्गत अपात्र असताना डाॅ. एस. आर. एफ. खाद्री आणि अकोला येथील सीताबाई आर्ट्स, कॉमर्स आणि विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डी. सिकची यांची महत्वपूर्ण असलेल्या विद्वत परिषदेवर नुकतीच निवड करण्यात आली आहे. कुलगुरूंच्या सल्लामसलतीनुसार राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या कार्यालयाकडून ३ फेब्रुवारी २०१८ रोजी निर्गमित ११/२०१८ या सूचनेनुसार विद्वत परिषदेवर दहा सदस्यांची निवड करण्यात आली. विद्यापीठ कायदा २०१६ मधील विद्वत परिषद नामांकन नियम ३२(३)(एफ) नुसार ही निवड करण्यात आली. मात्र महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्याचे कलम ६४ अंतर्गत दंड तथा कारवाई झालेल्या व्यक्तिंची निवड कोणत्याही प्राधिकरणावर करता येत नाही. शिवाय मतदान प्रक्रियेत देखील अशा अपात्र व्यक्तिंना सहभागी होता येत नाही. मात्र विद्यापीठ कायदा बासनात गुंडाळून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने दोन अपात्र व्यक्तींना चक्क विद्वत परिषदेवर नामीत केले आहे. 


८ जून २००५ रोजीच्या विद्यापीठाच्या क्रं. संगाबाअवि/१/१०४/२-७२४/२००५ या कार्यालयीन आदेशानूसार डाॅ. एस. आर.एफ. खाद्री यांच्यावर 'कॅरेक्टर रोल वार्निंग' ही कारवाई करण्यात आली होती. शिवाय माहे जून २००५ च्या वेतनातून ५ हजार ४४७ रुपये एकरकमी वसूलदेखील करण्यात आले होते. तर अपिलकर्त्याने सार्वजनिक स्वरुपाची माहिती मागितली असताना माहिती अधिकार कायद्याचे कलम ११ चा दृष्ट हेतूने वापर करुन ती दडवून ठेवणे. अपिलकर्त्यास माहिती विलंबाने देणे तसेच खोटी आणि बनावटी माहिती तयार करुन देणे. खोटी व बनावटी माहिती ज्ञात असताना देखील माहिती अधिकार अंतर्गत दिल्याचा ठपका ठेवत विद्यापीठाचे तत्कालीन वित्त व लेखाधिकारी डॉ. आर. डी. सिकची यांच्या विरोधात राज्य माहिती आयुक्तांनी माहिती अधिकार अधिनियम २००५ चे कलम २०(१) नुसार शास्तीची कारवाई केली होती. तत्कालीन कुलसचिव दिनेशकुमार जोशी यांचे 'स्वग्राम प्रवास भत्ता' अाणि तत्कालीन कुलगुरू डॉ. मोहन खेडकर यांचे 'बदली प्रवास भत्ता' ही दोन्ही प्रकरणे शैक्षणिक वर्तुळात चांगलीच चर्चीत राहिली. या प्रकरणाशी संबंधित विद्यापीठाचे तत्कालीन वित्त व लेखाधिकारी डॉ. आर. डी. सिकची यांच्यावर राज्य माहिती आयुक्तांनी शास्ती ठोठाविल्यानंतर ही त्यांची विद्वत परिषदेवर वर्णी लागल्याने शैक्षणिक वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. 


काय आहे 'कॅरेक्टर रोल वार्निंग' प्रकरण
डॉ. एस. आर. एफ. खाद्री यांनी आयसीएआर अंतर्गत मंजूर संशोधन प्रकल्प अंतर्गत मुंबई येथे विविध संस्थांना साहित्य विषयक सर्वेक्षणाकरीता गेले असता २९ जानेवारी २००३ ते १ फेब्रुवारी २००३ या दरम्यानचे एकाच प्रवासाचे दोन वेळा प्रवासभत्ता देयक सादर करीत देयकाची रक्कम घेतल्याची बाब उघड झाली होती. प्रशासनाने नोटीस देत त्यांना स्पष्टीकरण मागितले. मात्र खाद्री यांची वर्तणूक विद्यापीठ शिक्षकांच्या सेवाशर्ती संदर्भातील अध्यादेश क्रं. १२२ चे प्रकरण ७ मधील कलम ३९, ४०(१) तसेच परिशिष्ट 'अ' मधील कलम ६ नुसार अपेक्षीत वर्तणुकीचा भंग करणारी आहे. शिवाय कलम १२(अ) व (डी) नुसार गैरवर्तणूकीत मोडते. त्यामुळे सदर अध्यादेशाचे कलम ४८ च्या तरतुदीअंतर्गत डॉ. खाद्री यांना चेतावणी (कॅरेक्टर रोल वार्निंग) देत त्यांच्या गैरवर्तणूकीची नोंद कार्यालयीन अभिलेखात घेतली. शिवाय देयक क्रमांक ४२, दि. ३१ ऑक्टो. २००३ ची रकम ५ हजार ४४७ रुपये जून २००५ च्या वेतनातून कपात करण्याची कारवाई विद्यापीठाने केली. 


सिकचींवर १० हजार रुपये दंडाची शास्ती

तत्कालीन कुलसचिव दिनेशकुमार जोशी यांचे 'स्वग्राम प्रवास भत्ता' अाणि तत्कालीन कुलगुरू डॉ. मोहन खेडकर यांचे 'बदली प्रवास भत्ता' ही दोन प्रकरणाशी निगडीत माहिती अधिकार अंतर्गत मागण्यात आलेली बनावट व खोटी माहिती देण्याचा ठपका राज्य माहिती आयुक्त खंडपीठाने ठेवला होता. माहिती देण्यास टाळाटाळ करणे, सार्वजनिक स्वरुपाची असताना त्रयस्तांशी संबंधित असल्याने त्रयस्त व्यक्तिंनी माहिती देण्यास विरोध दर्शविल्याने माहिती देण्यास नकाार देणे, या प्रकरणात तत्कालीन माहिती अायुक्तांनी ३० मे २०१५ रोजी १० हजार रुपये दंडाची शास्ती ठोठावली होती. 


कुलगुरुंनी लावली चौकशी

विद्वत परिषदेवर दोन अपात्र सदस्यांना नामित करण्यात आल्याची तक्रार प्रा. राजेंद्र प्रसाद यांच्याकडून कुलगुरुंना देण्यात आली. शिवाय दिव्य मराठीने देखील याबाबत वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्याकडून शोध समितीने नामित केलेल्या दोन अपात्र सदस्यांबाबत चौकशी आरंभ करण्यात आली. 


निवड प्रकरणाची चाैकशी सुरू केली 
शोध समितीकडून नावे आल्यानंतर राजभवनाकडून विद्वत परिषदेवर दहा सदस्यांना नामीत करण्यात आले. शोध समितीने सर्व शहानिशा करुन सदस्यांचे नामांकन केले आहे. यातील दोन सदस्य अपात्र असल्याबाबत तक्रार प्राप्त झाली. तक्रारीवरून दोन सदस्यांबाबत चौकशी सुरू केली आहे. कागदपत्र बघितल्यानंतर सत्य समोर येईल.

- डॉ. मुरलीधर चांदेकर, कुलगुरू संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ 

बातम्या आणखी आहेत...