आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमुलच्या धर्तीवर राज्यातही शेतकरी कंपनी स्थापन करणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- देशात गुजरात, पंजाब, उत्तर प्रदेश आदी सात राज्यांमध्ये शेतकरी कंपन्या स्थापन करण्यात आल्या आहे. या नंतर राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ, आणंदच्या सहकार्याने राज्यातही शेतकरी कंपनी स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती विदर्भ व मराठवाडा विभागाच्या दूध विकास प्रकल्पाचे संचालक रवींद्र ठाकरे यांनी माध्यम संवाद कार्यक्रमात दिली. आणंदचाच एक भाग असलेल्या मदर डेअरीच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात विदर्भ व मराठवाड्यातील ११६४ गावांमध्ये दर दिवशी १ लाख ९२ हजार ३६९ लिटर दूधाची खरेदी करण्यात येते, अशी माहितीही ठाकरे यांनी दिली. 


मदर डेअरीमुळे दूधाला चांगले दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक बदल झाले असून गाई-गुरे विकणारे शेतकरी आता ती विकत घेत आहे. विदर्भ-मराठवाड्यातील २८०० शेतकऱ्यांनी आतापर्यत ३५०० जनावरे विकत घेतली, असे ठाकरे यांनी सांगितले. या प्रकल्पातंर्गत विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर तसेच मराठवाड्यातील उस्मानाबाद, नांदेड, जालना, लातुर या जिल्ह्यांचा समावेश आहे. तीन टप्प्यांत एकूण ३०२३ गावांमध्ये दूध संकलन करण्यात येणार आहे. एकूण ७७७ संकलन केंद्राद्वारे २६,८११ शेतकरी दूध विक्री करतात. 


कृत्रिम रेतनातून दर्जेदार गोवंश निर्मिती 
अमरावती विभागात गोवंशाची शुद्धता टिकून राहिली नाही. तेथे गोवंशाचा इतिहास माहित नसल्याने दूधाच्या दर्जावर परिणाम होतो. अमरावती विभागात गाई जर्सी, गावरान आहे की गवळाऊ हे सांगता येत नाही. थोड्याफार फरकाने अशीच स्थिती सर्वत्र आहे. त्यामुळे दर्जेदार गोवंश निर्मितीसाठी कृत्रिम रेतन करण्यात येणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. या शिवाय जनावरांना सकस आहार तसेच चांगला चारा मिळावा याकडे कटाक्षाने लक्ष देण्यात येणार आहे. वैरण विकासासाठी ७ हजार शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. ८० पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना आणंद येथे प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येणार आहे. हे प्रशिक्षित अधिकारी नंतर शेतकऱ्यांना प्रशिक्षण देतील, असे ठाकरे म्हणाले. सकस पशुखाद्य पुरवठ्यासाठी २ कोटी ३२ लाख तर वैरण विकास कार्यक्रमासाठी ६ कोटी १५ लाख रूपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. 

बातम्या आणखी आहेत...