आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मेळघाटातील व्याघ्र प्रकल्पात आगीचा भडका; 50 हेक्टरवरील जंगल खाक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धारणी- मेळघाटातील व्याघ्र प्रकल्पात भीषण आगीचा भडका उडल्याने तब्बल ५० हेक्टरवरील जंगल खाक झाले. आग लागल्याने वन्य प्राण्यांची चांगलीच ससेहोलपट झाल्याची मािहती आहे. संरक्षीत क्षेत्रात बुधवार दि. १८ एप्रिलला दुपारी उडालेल्या आगीच्या भडक्यावर व्याघ्र संरक्षक दलाने नियंत्रण मिळविले. 


अमरावती ते बऱ्हाणपूर मार्गावर असलेल्या हरिसाल व्याघ्र क्षेत्रात येणाऱ्या परिसरात भीषण आग लागली. उन्हाळ्याचे दिवस असल्याने आगीने क्षणात उग्र रुप धारण केले. चिखली फाट्यापासून लागलेली आग मांगीया रोरा या गावापर्यंत झपाट्याने पसरली. व्याघ्र प्रकल्प तसेच जंगलाचा भाग असल्याने येथे मोठ्या प्रमाणात तेंदूची झाडे आहेत. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात उगवलेले गवत देखील उन्हामुळे पूर्णपणे वाळून गेले आहे. सुकलेला पाला-पाचोळा तसेच वाळलेल्या गवताने लवकर पेट घेतला. आगीने क्षणार्धात रौद्र रुप धारण केले. आगीची माहिती मिळताच व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी तसेच पथक दाखल झाले. हिरव्या झाड्यांच्या फांद्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न पथकाने केला. बराच वेळानंतर अथक प्रयत्नाने आगीवर नियत्रंण मिळविण्यास व्याघ्र प्रकल्पाच्या पथकाला यश आले. हरिसाल व्याघ्र क्षेत्रामध्ये पानवठे नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जंगलातील वन्यप्राणी पाण्याच्या शोधात या भागात येतात. या क्षेत्रात सिपना नदीवर डोह असल्याने येथे येणाऱ्या वन्यप्राण्यांची संख्या अधिक आहे. जंगलात पाण्याची टंचाई असल्याने तसेच उन्हाळ्यात सिपना नदीच्या डोहावर पाणी असल्याने वाघ, रानगवे, अस्वल आदी सर्व प्रकारचे वन्यजीव येथे पाणी पिण्याकरीता येत असल्याची माहिती आहे. आग लागलेला परिसर हा वन्यजीवांचा जाण्या-येण्याचा रस्ता म्हणजेच कॉरीडोर असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच मेळघाट व्याघ्र प्रकल्पात आग लागल्याची बाब समोर आली होती. या भागात वन्यप्राण्यांचा अधिक वावर असल्याने आग तसेच त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिने व्याघ्र प्रकल्पाने अधिक लक्ष देण्याची गरज आहे. 

 

आग नियंत्रणाचे हवे नियोजन 
मेळघाटात प्रत्येक उन्हाळ्यात आगी लागण्याच्या अधिक घटना घडतात. आगीमुळे वन्य जीवांची दैना होत असून अन्य भागात ते पळून जातात. सुरक्षित निवास क्षेत्राचा शोधात वन्यजीवांची भटकंती होते. त्यामुळे मेळघाटात आग नियंत्रण करण्याचे नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे. 


पाणवठ्याची गरज 
जंगलात पाणवठे नसल्याने वन्यप्राणी नैसर्गिक जलस्त्रोताच्या शोधात भटकंती करतात. अश्या घटनांमुळे त्यांचे जीवन धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे विभागाने वन्यजीवांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिने पाणवठे निर्माण करण्याची गरज आहे. 
- नीलेश कांचनपुरे, अध्यक्ष वाईल्ड लाइफ अवेअरनेस रिसर्च अॅण्ड रेक्सू 

बातम्या आणखी आहेत...