आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक करण्याचे प्रशिक्षण दिले जायचे झारखंडच्या जमतारा भागात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- मागील काही महिन्यांपासून बजाज फायनान्स कार्ड धारकांना तुमचे कार्ड बंद पडले आहे, ते सुरू करण्यासाठी फोन यायचे. याच प्रकारे फोन करून शहरातील तीघांना फसवण्यात आले. या प्रकरणात सायबर पोलिसांनी झारखंड राज्यातील जमतारा येथील मजलाडिह गावातील कोटला तांडा येथून दिगंबर बासुदेव मंडल (२३) याला ताब्यात घेवून रविवारी (दि. १७) शहरात आणले. जमतारा परिसरात सायबर क्राईम करणारे अनेक गुन्हेगार असून 'सायबर क्राईम हब' म्हणून हा परिसर कुपरिचित आहे. या भागात काही वर्षांपूर्वी 'ठगी कैसे किये जाए' (फसवणूक कशी करावी) यासाठी प्रशिक्षण वर्ग चालायचे. प्रशिक्षण घेणाऱ्या व्यक्तीकडून अडीच हजार रुपये घेतले जायचे, अशी धक्कादायक माहिती सायबर पोलिसांनी दिली आहे. 


जमतारा जिल्ह्यातील कर्मातांड या गावातील दिगांबर हा रहिवासी आहे. त्याने मागील दीड वर्षांपासून सायबर क्रमाईमच्या क्षेत्रात काम सुरू केल्याचे पोलिसांना सांगितले आहे. या भागात सायबर क्राईम करणे, हा अनेकांचा मुख्य धंदा आहे. एका गावातील अनेक युवक याच कामात व्यस्त असतात. सायबर क्राईम करणाऱ्या प्रत्येकाकडे लॅपटॉप, संगणक, दोन ते तीन मोबाइल, अनेक सीम कार्ड आहेत. विशेष म्हणजे सायबर क्राईम करणारे कोणीही गावातून किंवा घरातून कोणालाही फोन लावत नाहीत. ते गावापासून काही अंतरावर असलेल्या जंगलात दोन ते तीन जणांच्या गटाने बसतात. कारण जंगलात निरव शांतता राहते. त्या ठिकाणाहून बोलल्यास गंडवणाऱ्या व्यक्तीला कोणताही आवाज जाणार नाही, जेणेकरून कॉल सेंटरवरून बाेलल्याचा भास त्याला होतो. महत्वाची बाब म्हणजे दिगांबर हा केवळ बारावीपर्यंत शिकलेला आहे. मात्र सायबर क्राईममध्ये तो पटाईत आहे. याच प्रमाणे त्या भागातील इतरही गुन्हेगारांचा सायबर क्राईममध्ये हातखंडा आहे. कारण काही वर्षांपूर्वी या भागात 'ठगी कैसे किये जाए' हे शिकवण्यासाठी शिकवणी वर्ग घेतले जायचे. एक महिन्याच्या या प्रशिक्षणासाठी अडीच हजार रुपये द्यावे लागत. यामध्ये पंधरा दिवस तांत्रिक माहिती दिल्यानंतर पुढील पंधरा दिवस प्रात्यक्षिक करून घेतले जायचे. याचवेळी त्यांना कोणाला कसे गंडवायचे, याबाबत धडे मिळायचे. 


दिगांबरने केलेल्या गुन्ह्यांमध्ये कोलकात्यात घेतल्या गेल्या वस्तू
दिगांबर फोनवर ग्राहकांना गंडा घालायचा. त्यानंतर बजाज फायनान्सकडून खरेदी केलेली वस्तू बोलवण्यासाठी कोलकात्याचा पत्ता द्यायचा. तो पत्ता अस्तित्वात नसलेला असायचा. त्यामुळे ही वस्तू त्या ठिकाणी घेऊन येणारा व्यक्ती फोन करायचा. त्याला म्हणायचे तू आहे त्याच ठिकाणी थांब मी येतो. त्यावेळी दिगांबरचा कोलकात्याचा एक सहकारी जावून ती वस्तू घ्यायचा व परस्पर विक्री करायचा. यामधून येणारी रक्कम दिगांबर व कोलकात्याचा व्यक्ती वाटून घ्यायचे. 


अखेर शिडीलावून दिगांबरला पकडले
दिगांबरचे घर मोठे आहे. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला मात्र दरवाजा तुटला नाही. कारण त्या गावात प्रत्येकाने दरवाजा तुटू नये, असे मजबूत दरवाजे तयार करून त्यावर लोखंडी ग्रील लावल्या आहेत. अखेर स्थानिक पोलिसांच्या मदतीने अमरावती सायबर पोलिसांनी शिडी लावून दिगांबरच्या घरात प्रवेश करून त्याला ताब्यात घेतले. या पथकात पीएसआय इश्वर वर्गे, दीपक बदरके, गोपाल सोळंके, सुधीर चर्जन यांचा समावेश होता. 
महिन्याकाठी ५० ते ६० हजार कमवायचा : दिगांबर हा दररोज सकाळपासून जंगलात जावून ग्राहकांना फोन लावायचा. यामध्ये जो अडकला त्याला गंडवायचे. जवळपास दोन ते तीन दिवसातून किमान दहा ते बारा हजार रुपये तरी याला मिळायचे. असे पोलिसांच्या चौकशीत पुढे आले आहे. याला पकडण्यासाठी पोलिस आयुक्त दत्तात्रय मंडलीक यांच्या मार्गदर्शनात सायबर ठाण्याचे पीएसआय वर्गे व त्यांचे पथक मागील आठ दिवसांपासून झारखंडमध्ये होते. 

 

'एटीएम मारते आता क्या'! 
जमतारा जिल्ह्यातील करमातांड भागात सायबर क्राईम करणे म्हणजे त्या भागातील लोकांसाठी गुन्हा नाहीच. शिवाय या कामात पटाईत असणाऱ्यांला जास्त मान सन्मान मिळतो. इतकेच काय तर कोणत्याही मुलाला विचारताना तुझे 'एटीएम मारते आता क्या'! असे विचारतात. म्हणजे तुला एटीएम किंवा कार्डद्वारे लोकांना गंडवता येते का? येत असल्यास तो हुशार मानल्या जातो, असेही पोलिसांनी सांगितले आहे. 


दोन दिवसांची पोलिस कोठडी 
झारखंड राज्यातील जमतारा येथील मजलाडिह गावातील दिगांबरला रविवारी न्यायालयात हजर केले. त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. शहरातील तीन गुन्ह्यांव्यतिरीक्त राज्यात अनेक ठिकाणी बजाज फायनान्स कार्डधारकांची फसवणूक झालेली आहे. त्या गुन्ह्यांमध्ये त्याचा समावेश आहे का? याबाबत आम्ही माहिती घेतो आहे.
- कांचन पांडे, एपीआय, सायबर पोलिस ठाणे. 


सायबर गुन्हेगारांचे सोशल मीडियावर गृप 
या भागात सायबर गुन्हेगारांची संख्या जास्त आहेत. हे गावात न बसता जंगलात जावून बसतात. याच दरम्यान गावात पोलिस आले किंवा नवीन व्यक्ती दिसल्यास तत्काळ सर्वांना माहित झाले पाहिजे म्हणून त्यांनी सोशल मीडियावर गृप तयार केले आहे. या गृपद्वारे ते तत्काळ एकमेकांना माहिती देवू शकतात. 

बातम्या आणखी आहेत...