आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गारपीटग्रस्त आक्रमक; आमदार देशमुखांच्या नेतृत्त्वात नागपूर-अमरावती मार्गावर रास्ता रोको

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झालेल्या शेताचे पंचनामे तातडीने करून गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना तत्काळ नुकसान भरपाई द्या, यामागणीवर विदर्भातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. आमदार आशीष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली गारपीटग्रस्त शेतकरी या मागणीसाठी नागपूर-अमरावती रस्त्यावर उतरले आहेत. शेतकऱ्यांनी याठिकाणी रास्ता रोको सुरु केला आहे.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: येऊन नुकसान भरपाईची पाहणी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून भाजपचे आमदार आशिष देशमुख नाराज आहेत. आशिष देशमुख शेतकर्‍यांसाठी रस्त्यावर उतरले आहेत.

 

दुसरीकडे, काँग्रेस नेतेही आज (मंगळवार) गारपीटग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे हे देखील विदर्भातील गावांना भेट देणार आहेत.

 

दुसऱ्या दिवशीही गारपीट, 2 जण ठार; राज्यात सव्वा लाख हेक्टरला फटका
विदर्भ आणि मराठवाड्यात काही भागांना सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका बसला. मराठवाड्यात सोमवारी हिंगोली, परभणी आणि नांदेड हे तीन जिल्हे, तर विदर्भातील यवतमाळ, अमरावती जिल्ह्यात गारपीट झाली. नांदेडमध्ये लिंबगाव परिसरात जोरदार गारपीट व इतर तालुक्यांत पावसाने हजेरी लावली.

 

परभणी जिल्ह्यातील पूर्णा, जिंतूर, सेलू तालुक्यात साेमवारी गारपीट झाली. चुडावा येथे पत्र्याच्या शेडखाली थांबलेल्या भागीरथीबाई कांबळे (35) यांचा शेड अंगावर पडून मृत्यू झाला. हिंगोलीतील कळमनुरी, वसमत तालुक्यात पाऊस, आखाडा बाळापूर भागात गारपीट झाली. सोलापूर जिल्ह्यातील बावकरवाडी येथे ऊसतोड कामगाराचा वीज पडून मृत्यू झाला.

 

आजही पावसाची शक्यता
मंगळवारी विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. अमरावती, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांत गारपीट होण्याची शक्यता आहे. तर अकोला, बुलडाणा आणि चंद्रपूर जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मराठवाडा क्षेत्रात हलक्या सरी पडू शकतात.

 

राज्यात 11 जिल्ह्यांत फटका, मराठवाड्यातील ४६,४७४ हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांच्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल सरकारला मिळाला आहे. 11 जिल्ह्यांत सुमारे 1086 गावांतील एकूण 1 लाख 24 हजार 294 हेक्टर क्षेत्र बाधित झाले. मराठवाड्यात जालना, परभणी, हिंगोली, बीड, लातूर आणि उस्मानबाद या सहा जिल्ह्यांना फटका बसला. मराठवाड्यातील 464 गावांचे 46,464 हेक्टर (1 लाख 16 हजार 185 एकर) क्षेत्राचे नुकसान झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

 

विमा नसेल तर निम्मीच भरपाई

पीक विमा असलेल्या शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून भरपाई, तर विमा नसलेल्या शेतकऱ्यांना सरकार एनडीअारएफमधून मदत देईल. पीक विमा नसलेल्या शेतकऱ्याला विमाधारकांपेक्षा भरपाईपोटी 50% कमी रक्कम मिळेल. म्हणजेच एखाद्या शेतकऱ्याला विमा कंपनीने भरपाईपोटी 10 हजार दिले, तर त्याच पिकासाठी विमा नसलेल्या पिकांना सरकारकडून 5000 रुपये भरपाई मिळेल, असे अशी माहिती सूत्रांनी दिली.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा...गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या रास्ता रोको आंदोलनाचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...