आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बजाज फायनान्स'च्या नावावर गंडवणाऱ्यास झारखंडला पकडले, अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- मागील काही महिन्यांपासून बजाज फायनान्सचे कार्ड असलेल्या ग्राहकांना फोन येतात व आम्ही कंपनीतून बोलत असून तुमचे कार्ड ब्लॉक होणार आहेत. व्हायला नको तर आम्हाला पाहिजे ती माहिती द्या. असे म्हणून आजवर राज्यात फसवणुकीचे अनेक प्रकरणं घडले आहे. दरम्यान शहरातही अशा फसवणुकीचे तीन गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात शहर सायबर ठाण्याच्या पोलिसांनी थेट झारखंडमध्ये जावून आरोपीचा शोध घेतला व त्याला ताब्यात घेतले आहे. या आरोपीला घेवून पोलिस पथक रविवारी (दि. १७) शहरात येणार आहे. या संशयित आरोपींकडून राज्यभरातील अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 


दिगांबर बसुदेव मंडल (२३, रा. जमतारा, झारखंड) असे पोलिसांनी पकडलेल्या ठगबाजाचे नाव आहे. शहरात दाखल असलेल्या तीन गुन्ह्यांमध्ये सायबर पोलिस आरोपीच्या शोधात होते. तपासादरम्यान पोलिसांना दिगांबर मंडलचा समावेश पुढे आला होता. त्यामुळे त्याच्या शोधात सायबर ठाण्याचे पथक झारखंडमध्ये गेले होते. दरम्यान झारखंडमधील जामतारा या गावातील रहिवासी दिगांबरला पोलिसांनी ताब्यात घेतले. सायबर ठाण्याचे एपीआय कांचन पांडे यांच्या मार्गदर्शनात झारखंडला पीएसआय ईश्वर वर्गे, दीपक बदरके, सुधीर चर्जन, गोपाल सोळंके हे पथक रवाना झाले आहे. 


अशी करायचे फसवणूक
मागील काही वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करण्यासाठी 'बजाज फायनान्स' कर्ज देवून मासिक हप्त्याने परतफेड करण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहे. ज्या ग्राहकांनी ही सुविधा घेतली. त्यांना कंपनीकडून एक कार्ड देण्यात येते. दरम्यान सद्यःस्थितीत अनेक ग्राहकांकडे बजाज फायनान्सचे कार्ड आहेत. दरम्यान मागील सहा महिन्यापूर्वीपासून राज्यातील अनेक शहरात बजाज फायनान्सच्या ग्राहकांची फसवणूक सुरू झाली आहे. अनोळखी व्यक्ती फोन करून आम्ही बजाज फायनान्समधून व्यवस्थापक बोलतोय, तुमच्याकडे असलेले कार्ड आता ब्लॉक होणार आहे किंवा झाले आहे, असे सांगतात. सदर कार्ड सुरू ठेवायचे असेल किंवा करायचे असेल तर आपल्या मोबाइलवर आम्ही एक क्रमांक पाठवत आहोत, तो क्रमांक आम्हाला सांगा. अशा वेळी ज्यांना हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे लक्षात आले, त्यांची फसवणूक टळली मात्र ज्यांनी तो क्रमांक (ओटीपी) दिला. त्यांच्या कार्डवर मात्र हजारो, लाखो रुपयांची खरेदी हा ठकबाज परस्पर करत होता. विशेष म्हणजे त्याने खरेदी केल्याचे खातेदाराला माहीत व्हायला काही दिवस उशीर लागतो. कारण ज्यावेळी त्याच्या खात्यातून सदर खरेदीचा हप्ता कापल्या जाईल, त्यावेळी त्याला रक्कम कमी झाल्याचे लक्षात येईल. मात्र तोपर्यंत तो सदर वस्तू खरेदी करून त्याची विल्हेवाट तो ठकबाज लावून द्यायचा. अशा पद्धतीने या ठकबाजाने अनेक ग्राहकांना चुना लावला आहे. 


नागपुरात आले ३९ अर्ज, वर्धेत ७ गुन्हे
बजाज फायनान्सच्या ग्राहकांची फसवणूक झाल्याचे नागपूर पोलिसांकडे मागील काही दिवसात तब्बल ३९ अर्ज आले आहेत. त्यापाठोपाठ वर्धेत सात गुन्हे दाखल आहेत. तसेच अमरावती शहरात तीन गुन्हे दाखल आहेत. यामध्ये १० व २३ एप्रिलला गुन्हे दाखल झालेत, विशेष म्हणजे एका तक्रारदाराने तत्काळ पोलिसांकडे धाव घेतल्यामुळे पोलिसांनी त्याच्या खात्यातून जाणारे ५७ हजार रुपये थांबवले. अशी माहिती सायबर ठाण्याच्या सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. 


'बजाज कार्ड'च्या गुन्ह्यात प्रथमच पोलिसांना यश 
राज्यभरात बजाज फायनान्स कार्डचे गुन्हे दाखल आहेत. मात्र अद्याप कोणत्याही पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला पकडले नव्हते. मात्र अमरावती शहर पोलिसांनी तब्बल दीड महिना या प्रकरणात तांत्रिक तपास करून हा ठकबाज झारखंडमध्ये असल्याची माहिती काढली व त्याला पकडले आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला पकडल्याची ही राज्यातील अलीकडच्या काळातील पहिलीच कारवाई असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...