आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'विदर्भ विरोधकांनो गो बॅक'..; विदर्भाच्या मागणीसाठी बंद, ५०० जण ताब्यात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- 'विदर्भ विरोधकांनो गो बॅक'..अशा घोषणा देत विदर्भ राज्य आंदोलन आंदोलन समितीच्या वतीने पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आयोजित बंदला कुठेही प्रतिसाद मिळाला नाही. सुमारे पाचशे आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 


हिवाळी अधिवेशनादरम्यान नेहमीच बंदची हाक देणाऱ्या विदर्भवाद्यांनी या वेळी आवाहन केले. पावसाळी अधिवेशनाला आमचा विरोध राहील, अशी घोषणाही संघटनांनी केली. मात्र, सर्वच बाजारपेठा सुरळीत सुरू होत्या. आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी सीताबर्डी, शहीद चौक, लक्ष्मीभुवन चौक, मानेवाडा मार्ग अशा काही ठिकाणांवर आंदोलन केले. व्हरायटी चौकात झालेल्या मुख्य आंदोलनात विदर्भातील विविध जिल्ह्यांतून जमलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. 


या ठिकाणी झालेल्या निषेध सभेत विदर्भवादी नेते राम नेवले, माजी आमदार वामनराव चटप, माजी पोलिस महासंचालक पीकेबी चक्रवर्ती आदी नेत्यांनी भाजपच्या विदर्भविरोधी भूमिकेचा निषेध केला. पोलिसांनी शहरातील विविध ठिकाणांवरून सुमारे पाचशेवर कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. अटकेतील कार्यकर्त्यांना दिवसभर अमरावती मार्गावरील दाभा परिसरातील तात्पुरत्या तंबूसदृश कारागृहात ठेवण्यात आले होते. सरकारने पोलिसांमार्फत दडपशाही केल्याने नागपूर बंद करणे शक्य झाले नाही, अशी कबुली विदर्भवादी नेत्यांनी या वेळी दिली. 

बातम्या आणखी आहेत...