आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरात गुन्हेगारांना राजाश्रय, ठोस निर्णय घेण्यास भाग पाडू; शिवसेना आमदारांचा इशारा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- बुलेट ट्रेन, कायदा-सुव्यवस्था, नाणार, सातव्या वेतन आयोगासह या पावसाळी अधिवेशनात सभागृहात विदर्भाचेही प्रश्न मांडू. या प्रश्नांवर सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडू, असा इशारा देतानाच नागपुरात गुन्हेगारांना राजाश्रय मिळत असल्याची टीका शिवसेनेच्या विधान परिषदेतील मुख्य प्रतोद डाॅ. नीलम गोऱ्हे, विधानसभेतील मुख्य प्रतोद सुनील प्रभू व विधान परिषदेतील गटनेते अॅड. अनिल परब यांनी संयुक्त पत्रपरिषदेत केली. 


राज्यातील शेतकरी अस्वस्थ आहे. आत्महत्यांचे प्रमाण कमी झालेले नाही. बोंडअळीची नुकसान भरपाई मिळालेली नाही. राज्यात शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न दोन्ही सभागृहांत लावून धरू. कर्जमाफी योजनेची योग्य अंमलबजावणी व्हावी आणि शेतमालाला योग्य भाव मिळावा, अशी मागणी या वेळी नीलम गोऱ्हे यांनी केली. राज्यातील कायदा-सुव्यवस्था डळमळीत आहे. जनतेला विश्वास वाटत नाही म्हणून अशा गुन्ह्यांच्या घटना घडत आहेत का, असा प्रश्न मनात आल्यावाचून राहत नाही. लोकांना कायद्याचा धाक राहिलेला नाही. नागपूर, नाशिक, पुणे, नगर, धुळे आदी ठिकाणी अफवांच्या नावावर लोक कायदा व सुव्यवस्था हातात घेत आहेत, ही निश्चितच चांगली स्थिती नाही, असे गोऱ्हे म्हणाल्या. नागपुरात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती कोलमडलेली आहे. गुन्हेगारांना राजाश्रय मिळत आहे, अशी टीका मुन्ना यादव याचे नाव न घेता केली. ठेवीदारांच्या ठेवी परत मिळण्यासाठी सरकारने निर्णय घ्यावा यासाठी सभागृहात विषय लावून धरू. बुडीत बँकांतील ठेवींना संरक्षण मिळायला हवे. बँक घाेटाळ्यात महाराष्ट्र बँकेला जो नियम लावला तोच नियम पंजाब नॅशनल बँक व आयसीआयसीआय बँकेलाही लावण्यात यावा, असे गोऱ्हे म्हणाल्या. 


अन्यथा नाणार विदर्भात आणावा : प्रभू 
भाजप आमदार आशिष देशमुख यांनी नाणार प्रकल्प कोकणात होणार नसेल तर विदर्भात आणावा, अशी मागणी केली आहे. सरकारने त्यांच्या मागणीची दखल घ्यावी आणि नाणार प्रकल्प विदर्भात आणावा, असे शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी म्हटले. ग्रामीण भागातल्या आमदारांना योजना आणि आमदार निधीव्यतिरिक्त अधिक निधी मिळावा यासाठी आज शिवसेनेचे आमदार मुख्यमंत्र्यांना भेटल्याचे आमदार अनिल परब यांनी सांगितले. 


विकास निधीवरून नाराजी, कामकाजावर बहिष्काराचा शिवसेना नेत्यांचा इशारा 
विकास निधीवरून शिवसेनेच्या संतप्त आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बुधवारी त्यांच्या दालनात भेट घेऊन निधी न मिळाल्यास कामकाजात सहभागी होणार नाही, असा इशारा दिला. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात जाऊन त्यांची भेट घेतली. विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याचे सांगत या आमदारांनी दहा कोटी रुपयांचा निधी देण्याच्या आश्वासनाची आठवण करून दिली. आम्ही वर्षभर पाठपुरावा करूनही विकासकामांसाठी निधी मिळाला नाही, या शब्दांत आमदारांनी नाराजी व्यक्त केली. निधी न मिळाल्यास सभागृहांच्या कामकाजात सहभागी होणार नाही, असा इशारादेखील या आमदारांनी दिल्याचे सांगण्यात आले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीसाठी बरीच प्रतीक्षा करावी लागल्याने आधीच आमदार संतप्त होते. त्यातच अवघ्या तीन ते चार मिनिटे झालेल्या चर्चेत मुख्यमंत्र्यांकडून पुन्हा आश्वासनच मिळाले. त्यामुळे आमदार नाराज होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

बातम्या आणखी आहेत...