आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाआघाडीत शिवसेना, मनसे नाहीच; केवळ समविचारी पक्ष; अशोक चव्हाण यांची भूमिका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाआघाडीसाठी समविचारी असलेल्या दहा राजकिय पक्षांचाच विचार होणार असून त्यात शिवसेना, मनसे अथवा एमआयएम यांचा विचार होण्याची कदापिही शक्यता नाही, असे स्पष्टीकरण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी गुरुवारी नागपुरात प्रसार माध्यमाशी बोलताना दिले. 


केंद्रात आणि राज्यात भाजपला शह देण्यासाठी समविचारी विरोधी पक्षांची मोट बांधण्याच्या सध्या जोरदार हालचाली सुरू आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यापूर्वीच तसेच जाहीर वक्तव्यही केलेले आहे. महाआघाडीत सध्या राष्ट्रवादीशी केंद्रीय पातळीवर चर्चा सुरू असून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दोन तीन वेळा चर्चाही झाली आहे. आघाडीचा निर्णय लवकरात लवकर व्हावा, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. महाआघाडीसाठी इतर समविचारी बहुजन समाज पक्ष तसेच भारतीय रिपब्लिकन पक्ष, डावे यासारख्या दहा पक्षांचाच विचार होणार असून शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना,एमआयएम या समविचारी नसलेल्या पक्षांचा विचार होण्याची कुठलीही शक्यता नाही, असे चव्हाण यांनी सांगितले. धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्याचे आमचे प्रयत्न आहेत, असेही ते म्हणाले. कर्जमाफीच्या नावावर सरकारचे मदतीचे ठिबक सिंचन सुरू असल्याने शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत नसल्याचे चव्हाण म्हणाले. 


माणिकराव ठाकरेंनी निवडणूक लढवावी 
विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांना विधान परिषदेत पुन्हा संधी न दिल्याबद्दल विचारले असता ठाकरे यांनी निवडणूक लढवावी असे आपले मत आहे, असे चव्हाण यांनी सांगितले. निवडणूक कोठून लढवावी हे त्यांनी ठरवावे. लोकसभा की विधानसभा याचा सल्ला मी त्यांना खासगीत देईन, असेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...