आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्याच्या नावावर अडीच लाखांच्या बनावटी कर्जाची उचल, ICICI बँकेतील प्रकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परतवाडा- अचलपूर तालुक्यातील सावळी खुर्द येथील निवासी ज्ञानेश्वर रघुनाथ गाडेराव या शेतकऱ्याची शेती परस्पर बँकेकडे गहाण करत ४ लाख रुपयांचे पीक कर्ज येथील आयसीआयसीआय बँकेने मंजूर करून त्यातील २ लाख १८ हजार रुपयांची उचल करण्यात आल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या प्रकरणी आसेगाव पोलिसांनी बँकेच्या फिल्ड अधिकाऱ्यासह चौघांना अटक केली असून अशाप्रकारे या शाखेतून मोठ्या प्रमाणात कर्जाचे वितरण करून घोळ करण्यात आल्याचे समोर आले आहे. 

 


येथील जी. एम. आर्केड येथील आयसीआयसीआय बँकेच्या शाखेत व्यवस्थापक दिलबाग सिंग व अन्य अधिकारी यांची नव्याने नुकतीच नियुक्ती करण्यात आली. त्यांनी कर्जदारांची यादी तयार करून वसुली सुरू केली. वसुलीसाठी ते ज्ञानेश्वर गाडेराव यांच्याकडे गेले असता, गाडेराव यांना धक्काच बसला. या प्रकरणी ज्ञानेश्वर गाडेराव यांनी आसेगाव पाोलिसांत तक्रार दिली. ठाणेदार अजय आखरे यांनी चाैकशी सुरू केली असता, ज्ञानेश्वर गाडेराव यांच्या अडीच एकर शेतावर ४ लाख रुपयाचे पीक कर्ज १२ नोव्हेंबर २०१६ मध्ये मंजूर करण्यात आले होते. सावळी खुर्द येथीलच निवासी रवींद्र गाडेराव यांनी ज्ञानेश्वर गाडेराव यांच्या शेतीच्या सर्वे नंबरचा वापर करत ७/१२ व ८-अ आतीश जवंजाळ व बँकेचे फिल्ड अधिकारी रोशन मानकर यांच्या माध्यमातून स्वत: च्या नावावर करत बँकेतून ४ लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले. त्यातील २ लाख १८ हजार रुपयांची उचल करून दीड लाख रुपये रवींद्र गाडेराव याने ठेवले, तर उर्वरित रक्कम मानकर व जवंजाळ यांनी वाटून घेतल्याचे लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली. पुढील तपासात कर्जाच्या दस्तावेजांसाठी लागणारे रबर स्टॅम्प दत्तात्रय चांदुरकर यांनी तयार करून दिल्याचे पुढे आल्याने पोलिसांनी त्याला ७ जून रोजी, तर उर्वरित तिघांना ११ जून रोजी अटक केली. चौघांनाही न्यायालयाने १८ जूूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ठाणेदार आखरे यांनी या प्रकरणी बँकेच्या अधिकाऱ्यांकडेही चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती देत पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...