आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकाने विहिरीत उडी मारुन केली आत्महत्या, पत्नीला लिहिले- कलियुगात संन्याशालाच फाशी मिळणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ - महागाव तालुक्यातील बेलदरी गावात एका शिक्षकाने विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली आहे. हा शिक्षक काटखेडा येथील शाळेत कार्यरत होता. त्याने मृत्युपूर्वी चिट्ठीत शिक्षक नेत्यासह मुख्याध्यापकाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. शिवाय याच चिट्ठीत त्याने पत्नीची माफीदेखील मागितली आहे. शिक्षकाच्या आत्महत्येने शिक्षणक्षेत्रात खळबळ माजली आहे. 

 

मिळालेल्या माहितीनुसार, मनोहर वसंत जाधव (37) पुसद पंचायत समितीच्या काटखेडा शाळेत विशेष शिक्षक म्हणून कार्यरत होते. रविवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास त्यांनी पत्नीला मोबाईल करून आपण आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. यामुळे घाबरलेल्या पत्नीने नातेवाईकांना माहिती दिली. त्यांचा शोध सुरू केला असता रात्री 10 वाजताच्या सुमारास त्यांची दुचाकी आणि पाकीट शेतातील विहिरीजवळ आढळून आले. विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने रात्री शोध घेता आला नाही. या घटनेची माहिती महागाव पोलिसांना देण्यात आली. दरम्यान सोमवारी सकाळी या विहिरीचे पाणी उपसल्यानंतर मनोहर जाधव यांचा मृतदेह आढळून आला. तसेच विहिरीवर ठेवलेल्या पाकीटात सात पानांची चिठ्ठी आढळून आली. ही चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली.

 

जगणे असह्य झाले म्हणून उचलले पाऊल
या चिठ्ठीत त्यांनी काटखेडा शाळेचे मुख्याध्यापक संतोष नारायण शेवाळकर, सहायक शिक्षक अश्विन शिवलाल चव्हाण आणि केंद्रांतर्गत मुंगसाजीनगर शाळेचे मुख्याध्यापक तथा महाराष्ट पुरोगामी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनीष राठोड यांच्या नावावर छळाचा आरोप केला आहे.  आपण केंद्र प्रमुखांकडे तक्रार केली. तेव्हापासून आपल्याला मानसिक त्रास सुरू झाला. या दोघांना शिक्षक संघटनेच्या नेत्याने सहकार्य केले. आपले जीवन जगणे कठीण झाले, यामुळेच आपण आत्महत्या करीत असून आपल्याला आत्महत्येला केवळ तिघेच जबाबदार असल्याचे या चिठ्ठीत स्पष्टपणे नमूद केले आहे.

 

पत्नीला लिहिले- ईश्वराच्या न्यायालयात न्याय मिळेल 
मनोहर जाधव यांनी आपल्या पत्नीला एक चिठ्ठी लिहिली आहे. या चिठ्ठीत तिला जीवनभर साथ देऊ शकलो नाही, याची खंत व्यक्त करीत हे कलियुग आहे, या युगात चोर सोडून संन्याशालाच फाशी मिळणार आहे असे लिहिले आहे. स्वत:चे जीवन ईश्वराला समर्पित करून जीवन जगण्याचा सल्ला देत सर्वांना सांभाळण्यासही या चिठ्ठीत त्यांनी सांगितले आहे. ईश्वराच्या न्यायालयात या लोकांना जरुर शिक्षा मिळेल.

बातम्या आणखी आहेत...