आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोंडअळी मुद्द्यावरून विधान परिषद ठप्प; सलग चौथ्या दिवशीही गोंधळामुळे कामकाज बंद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- पावसाळी अधिवेशन सुरू होऊन चार दिवस झाले तरी बोंडअळीच्या नुकसान भरपाईवरून सभागृहात गोंधळ सुरूच आहे. सरकार सभागृहात खोटे बोलत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तर, विरोधकांत खरे ऐकून घेण्याची हिंमत नाही, असा पलटवार सत्ताधाऱ्यांनी केला आहे. विधानसभेत कामकाज सुरू असताना सोमवारी विधान परिषद मात्र दिवसभरासाठी तहकूब झाली. 


विधान परिषदेच्या कामकाजाच्या सुरुवातीला नवनिर्वाचित आमदारांना सभापतींनी शपथ दिली. त्यानंतर प्रश्नोत्तरांचा तास सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी २८९ प्रमाणे बोंडअळीच्या स्थगन प्रस्तावावर चर्चेची मागणी लावून धरली. सभापतींनी त्यांचा प्रस्ताव नाकारला. तरीही मुंडे बोलत राहिल्याने त्यांना एक मिनिटाचा वेळ दिला. बोंडअळी व धान उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, असा त्यांनी सरकारवर आरोप केला. सभापतींनी मुंडेंना खाली बसण्यास सांगून प्रश्नोत्तरे घेण्याचे उच्चारताच विरोधी पक्षाच्या आमदारांनी सभापतींच्या आसनासमोर येऊन गोंधळ सुरू केला. त्यामुळे कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब केले. 


नुकसान भरपाई कधी देणार ते सांगा, मगच कामकाज : मुंडे 
दुपारी १२.४२ कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधकांच्या गोंधळामुळे सभागृह पुन्हा ३० मिनिटांसाठी तहकूब केले. पुन्हा सभागृह सुरू झाल्यानंतर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचे निवेदन, नीलम गोऱ्हे यांचा औचित्याचा मुद्दा झाल्यानंतर सभापतींनी त्यांचे निवेदन केले. हे कामकाज काही मिनिटांत संपताच मुंडेंनी बोंडअळीवर चर्चेची पुन्हा मागणी केली. हे सभागृह खोटे बोलण्यासाठी आहे का? याच सभागृहात डिसेंबर २०१७ मध्ये जाहीर बोंडअळी व धानावर आलेल्या तुडतुड्या रोगाची नुकसान भरपाई कधी देणार, ते सांगा आणि नंतरच कामकाज करा, असा सवाल त्यांनी केला. यावरून गोंधळ सुरू झाल्याने सभापतींनी दिवसभरासाठी विधान परिषद तहकूब केली. 


खरे ऐकण्याची हिंमत विरोधकांत नाही : खोत 
पत्रकारांशी बोलताना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, कापूस आणि धानाचे नुकसान झाल्याने सरकारने ५५ लाख ४४ हजार शेतकऱ्यांसाठी ३,४८४ कोटींचे पॅकेज दिले आहे. त्याचा १००९ कोटींचा पहिला हप्ता दिला आहे. दुसरा हप्ताही लवकरच बँक खात्यांत जमा करू. पीक विम्याचे पैसे दिले आहेत. सरकारची चर्चेची तयारी असताना विरोधकांमध्ये खरे ऐकण्याची हिंमत नाही, असा आरोप खोत यांनी केला. 

बातम्या आणखी आहेत...