आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या दोघांना भोसकले, अमरावतीचे तिघे अटकेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धामणगाव रेल्वे- भांडण सोडवण्यास गेलेल्या दोघांना धारदार शस्त्राने भोसकून जखमी केल्याची घटना स्थानिक दत्तापूर परिसरात शनिवारी सायंकाळी घडली. यात दोघांनाही गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. 


दत्तापूर येथे कमलेश बडगैय्या आपल्या आप्त कुटुंबसह राहतो. शनिवारी त्यांच्या घरासमोर नीलेश पुरुषोत्तम मेहकर यांच्या घरी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास मावंदाचा कार्यक्रम होता. कार्यक्रमाला त्यांच्या कुटुंबाला सुद्धा निमंत्रण होते. घरातील सर्व सदस्य घराबाहेर रोडवर खुर्च्यावर बसलेले होते. नीलेश मेहकर यांच्याकडे अमरावतीवरून त्यांचे दहा-बारा मित्र टाटा सुमोने पाहुणे म्हणून आले होते. त्यांनी नीलेशच्या घराच्या बाजूला गाडी उभी केली. सर्वजण कार्यक्रमाच्या मंडपात गेले व काही वेळातच मेन रोडवर आले. त्यानंतर त्यांच्यातील दोन ते तीन लोकांमध्ये भांडण झाले. ते दारू पिऊन असल्याने जोरजोरात ओरडत शिवीगाळ करत होते. त्यामुळे त्यांना भांडण करू नका, असे सांगण्यात आले. यावरून अंशूल श्यामलाल बडगैय्या व घराशेजारी राहणारा नयन वानखडे असे दोघेजण भांडण करणाऱ्यांना समजावण्यासाठी गेले. पण ते काही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. 


दरम्यान एकाने पँटच्या खिशातून चाकू काढून अंशुलच्या पोटावर घाव मारले व दुसरा वार नयन वानखडेवर केला. नंतर त्या तिघांनी या दोघांवर जिवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला. त्यानंतर ही सर्व घटना बघितल्याने टाटा सुमो चालकाला व उर्वरित लोकांना पकडून नाव गाव विचारले असता, त्यांनी आपले नाव रूपेश राधेश्याम वानखडे, सूरज ज्ञा. देऊळकर, अक्षय भ.धाकडे सर्व रा.आदर्श नगर अमरावती असे सांगितल्याने त्या तिघांना पोलिस स्टेशनला नेण्यात आले. दरम्यान, नयन वानखडे व सुनील बडगैय्या यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी तीनही आरोपींवर गुन्हा दाखल केला. 

बातम्या आणखी आहेत...