आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन अल्पवयीन मुलांनी बनाव रचून पोलिसांना रात्रभर जागवले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- सध्या मंगळसूत्राच्या चोरट्यांच्या बंदोबस्तासाठी शहरात सर्वत्र पोलिसांची नाकाबंदी सुरू आहे. दरम्यान, गुरूवारी (दि. १४) सायंकाळी फ्रेजरपुरा पोलिसांनी प्रशांतनगर बगिच्याजवळ एका दुचाकीवरून जाणाऱ्या तिघांना पकडले. त्यांना कागदपत्र मागितले असता त्यांच्याकडे नव्हते. तसेच दुचाकीचा क्रमांकही खोडतोड केलेला होता. म्हणून पोलिसांना संशय आला. त्यामुळे पोलिसांनी या तिघांची कसून चौकशी असता त्यांनी ही दुचाकी आमच्याकडे एका व्यक्तीने तारण ठेवल्याचे सांगितले. तो व्यक्ती खारतळेगाव येथे राहतो, म्हणून पोलिस त्या गावात पोहोचले, मात्र हा तीन अल्पवयींनानी केलेला बनाव होता. त्यानंतर त्या तिघांनी खरी माहिती दिली की, ही दुचाकी त्यांच्या वलगावस्थित मित्राची आहे. त्याने शहरातून ११ जूनला ही दुचाकी चोरली होती. या सर्व प्रक्रियेत फ्रेजरपुरा पोलिसांना या तीन अल्वयीनांनी अख्खी रात्र जागवले. अखेर पोलिसांनी वलगावच्या त्या युवकाला अटक केली आहे. 


शुभम रवींद्र तसरे (२०, रा. वलगाव) असे पोलिसांनी अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. शुभमने ही दुचाकी ११ जूनला गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चक्रपाणी कॉलनीमधून चोरी केलेली आहे. दुचाकी शुभमने त्याच्या एका मित्राला दिली होती. गुरूवारी सायंकाळी प्रशांतनगर बगिच्याजवळ शुभमचा मित्र व त्याचे दोन अल्पवयीन मित्र असे तिघे चायनिज खाण्यासाठी गेले होते. त्याचवेळी नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी ही दुचाकी पकडली. त्या दुचाकीच्या क्रमांकामध्ये खाडाखोड केलेली असल्यामुळे पोलिसांनी दुचाकीसह त्या तिघांनाही थांबवले. त्यांची कसून चौकशी केली असता त्या तिघांनी पोलिसांना सांगितले की, खारतळेगाव येथील एका व्यक्तीने दोन हजार रुपयात ही दुचाकी आमच्याकडे तारण ठेवली होती. त्यामुळे पोलिसांनी रात्रीच त्या तिघांना घेवून खारतळेगाव गाठले. खारतळेगावात या तिघांनी सांगितलेल्या नावाचा व्यक्तीच अस्तित्वात नाही. अखेर पोलिसांनी या तिघांना मध्यरात्रीच पुन्हा विचारणा केली तर शुभम तसरे याची ही दुचाकी असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी वलगाव गाठून शुभमला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने ही दुचाकी गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याचे सांगितले. 
जप्त केलेली दुचाकी व अटक केलेल्या चोरट्यासह फ्रेजरपुरा पोलिस. 

बातम्या आणखी आहेत...