आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपहृत बालिकेस घरी सोडणारी महिलाच निघाली अपहरणकर्ती, पोलिसांनी केली अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - खोलापुरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तालाबपुरा येथे राहणाऱ्या एका वर्षभराच्या चिमुकलीचे ११ जानेवारीला घरासमोरून अपहरण झाले होते. मात्र १२ जानेवारीला ही चिमुकली सुखरूप घरी पोहोचली. या वेळी सदर चिमुकली एका भीक मागणाऱ्या महिलेकडे होती. मी झटापट करून तिला सोडवले असे सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणारीच महिला पोलिसांच्या तपासात खरी अपहरणकर्ती निघाली आहे. या महिलेला खोलापुरी गेट पोलिसांनी रविवारी सायंकाळी अटक केली आहे.

 

नताशा फिरदोस असे अपहरण झाल्यानंतर सुखरूप घरी पोहोचलेल्या चिमुकलीचे नाव आहे. नताशा घरासमोर खेळत असताना ११ जानेवारीला सकाळी अचानकपणे बेपत्ता झाली होती. त्यानंतर सर्वत्र शोधाशोध केली, मात्र नताशा मिळाली नाही. अखेर तिच्या आईने पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी शोध मोहीम राबवली, मात्र नताशाचा काही पत्ता लागला नव्हता. दरम्यान, दुसऱ्या दिवशी म्हणजेच १२ जानेवारीला दुपारी १२ वाजताच्या सुमारास एक युवक चिमुकलीला घरी घेऊन आला. त्याने सांगितले की, परिसरातच धुणी भांडीचे काम करणाऱ्या एका महिलेने चिमुकलीला त्याच्याजवळ दिले. त्यामुळे पोलिसांनी शुक्रवारीच त्या महिलेला चौकशीसाठी बोलावले होते. तिने सांगितले होते की, मी धुणी भांडी करण्यासाठी जात असताना एका भीक मागणाऱ्या महिलेकडे मला नताशा दिसली. त्यावेळी त्या भीक मागणाऱ्या महिलेसोबत झटापट करून नताशाला सोडवले व ओळखीच्या युवकाकडे देऊन तिला तिच्या आईकडे पाठवले. तेव्हापासून या महिलेवर पोलिसांचा संशय बळावला होता. म्हणून पोलिसांनी सर्वच दिशेने तपास सुरू ठेवला. दरम्यान, शनिवारी पोलिसांनी या महिलेला पुन्हा ताब्यात घेतले, मात्र ती पोलिसांना 'कहाणी' सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होती. अखेर हा गुंता सोडवण्यात पोलिसांना रविवारी दुपारी यश आले.

 

ज्या महिलेने दोन दिवसांपूर्वी पोलिसांना सांगितले होते की, भीक मागणाऱ्या महिलेकडून मी चिमुकलीची सुटका केली. त्यावेळीच पोलिसांनी महिलेचा शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही. दरम्यान, रविवारी याच महिलेने सांगितले की, भीक मागणारी कोणतीही महिला नसून मीच ११ जानेवारीला सकाळी चिमुकलीचे अपहरण केले होते. तिला घेऊन त्याच दिवशी दुपारी नागपूरला गेली. कारण नागपुरात राहणाऱ्या माझ्या एका नातेवाइकांला मुल पाहिजे होते. मात्र अशा पद्धतीने आणलेले मुल आम्हाला नको म्हणून त्यांनी हे बाळ घेण्यास नकार दिला. परंतु त्यावेळी रात्र झाली होती. त्यामुळे चिमुकलीला घेऊन रात्रभर नातेवाइकांच्याच घरी मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळीच ती नताशाला घेऊन शहरात आली. आपण स्वत: नताशाला घेऊन गेलो, तर आपले पितळ उघडे पडणार या भीतीने तिने नताशाची आपण सुटका केली, अशी कहाणी बनवून झालेल्या प्रकारावर पांघरून टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पोलिसांच्या तपासाअंती उघड झाला. दरम्यान सदर महिलेसोबत या प्रकरणात आणखी कुणी होते का? नागपुरात ही महिला मुलीला घेऊन नेमकी कुठे गेली होती, असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. त्यामुळे पोलिसांनी तिला रविवारी अटक करून तपास सुरू ठेवला अाहे.

बातम्या आणखी आहेत...