आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

16 वर्षीय विद्यार्थिनीचा पाठलाग; युवकाला तीन वर्षांची शिक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - दोन वर्षांपूर्वी शहरातील एका महाविद्यालयात अकरावीमध्ये शिकणाऱ्या १६ वर्षीय विद्यार्थिनीचा एका युवकाने पाठलाग करून तिला अश्लील शिवीगाळ केली होती. या आरोपी युवकाला न्यायालयाने तीन वर्षांचा कारावास सुनावला आहे. ही शिक्षा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्रमांक २) एस. डब्ल्यू. चव्हाण यांच्या न्यायालयाने सोमवार, २९ जानेवारीला सुनावली.

 

विधी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक रवींद्र देशमुख (३०, रा. गाडगे नगर) असे आरोपीचे नाव आहे. शहरातील एका महाविद्यालयात शिकणारी मुलगी १७ नोव्हेंबर २०१६ ला बोनाफाईड प्रमाणपत्र घेण्यासाठी महाविद्यालयात गेली होती. महाविद्यालयात गर्दी असल्यामुळे ती बाजूलाच असलेल्या दुसऱ्या महाविद्यालय परिसरात तीन मैत्रिणींसह बसली होती. त्याचवेळी ओळखीचा नसलेला एक युवक तिच्याजवळ आला. त्याने काही कारण नसताना या युवतीला अश्लील शिवीगाळ केली. त्यामुळे ही मुलगी घाबरून त्या ठिकाणाहून निघाली तर त्याने मुलीचा पाठलाग सुरू केला. त्यामुळे युवतीने आरडाओरड केल्यावर आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेऊन त्याला पकडून गाडगे नगर पोलिसांच्या स्वाधीन केले.


पोलिसांनी त्याला नाव विचारले असता त्याने अभिषेक रवींद्र देशमुख असे सांगितले. युवतीच्या तक्रारीवरून त्याच दिवशी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध विनयभंग व बाल लैंगिक अत्याचार कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास पीएसआय सुलभा राऊत यांनी पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने पाच साक्षीदार तपासले. त्यानंतर न्यायालयाने त्याला तीन वर्ष कारावास व दहा हजारांचा दंड ठोठावला. वसूल होणाऱ्या दंडाच्या रकमेपैकी पाच हजार रुपये पीडित मुलीला देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. शासकीय पक्षाकडून अॅड. कौस्तुभ लवाटे यांनी युक्तिवाद केला.

बातम्या आणखी आहेत...