आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१८८ देहांचे दान घडवून अाणण्याचा नागपुरात विक्रम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - देहदानावर जागृती, प्रत्यक्ष चालना देणाऱ्या फारच थोड्या संस्था आहेत. एखाद्या मोठ्या संस्थेचे कार्यही थिटे पडावे असे काम नागपुरातील ज्येष्ठ समाजसेवक रमेश सातपुते यांचे आहे. गेल्या ३० वर्षांत प्रचंड परिश्रमातून त्यांनी १८८ जणांचे मरणोत्तर देहदान व नेत्रदान घडवून आणले आहे. त्यांच्या कामगिरीची दखल इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे.
वैद्यकीय विद्यार्थ्यांना मृतदेहांची गरज असते. मात्र देहदानाबद्दल फारशी जागृती नसल्याने काॅलेजांत त्याचा तुटवडा भासतो. त्याच जाणिवेतून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सातपुते यांनी या कामी स्वत:ला झोकून दिले. देहराष्ट्रार्पण संस्थेच्या नावाने सातपुतेंचे कार्य चालते. संस्थेत ते एकमेव पदाधिकारी व कार्यकर्ते आहेत. त्यांच्या खांद्यावरील झोळीतून संस्थेचे कार्य चालते. देहदानाचे विल करायचे आहे, असा निरोप येताच सातपुते त्या घरी हजर होतात. तासभर देहदानाचे महत्त्व आणि प्रक्रिया समजावून सांगितल्यावर वारस आणि साक्षीदारांच्या साक्षीने देहदानाचे विल (संकल्पपत्र) तयार करून घेतात. येथे त्यांच्या कामाचा पहिला टप्पा संपतो.
सुमारे ७५० लोकांनी त्यांच्याकडे कायदेशीर संकल्प केला आहे. रात्री-अपरात्री केव्हाही सातपुते यांचा गिरीपेठेतील घरचा दूरध्वनी खणखणतो. देहदान, नेत्रदानाची प्रक्रिया काही तासांत करावी लागते. सुरुवातीला नेत्रदानाची प्रक्रिया उरकून घेण्यासाठी त्यांची धडपड चालते. मृतदेह देहदानासाठी योग्य आहे की नाही, यासाठी तो चाचपून ते खात्री करून घेतात. मगच स्वत: मेडिकल काॅलेजच्या अॅनॉटॉमी विभागाला निरोप देेतात. शववाहिकेतून मृतदेह रवाना झाला की त्यांचे काम त्या केसपुरते संपते.

धमक्या आल्या, तमा न बाळगता काम मात्र सुरू
पुरोहित वर्गाकडून सुरुवातीला धमक्या आल्या. धर्मबुडव्या म्हणून टीका झाली. कशाचीही पर्वा न करता सातपुते यांनी कार्य सुरूच ठेवले. आज वयाच्या सत्तरीतही त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. त्यांच्याएवढे काम कुठल्या संस्थेचेही नाही. झी २४ तास वाहिनीचा अनन्य सन्मान त्यांना मिळाला. हरियाणातील इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने नोंद घेतली.

मोबदला न घेता कार्य
देहदानाबाबत जनजागृती करण्यासाठी सातपुते यांना काेणाकडून कुठलाही आर्थिक मोबदला मिळावा, अशी अपेक्षित नसते. स्वत:चा फिरण्याचा व इतर खर्च भागवण्यासाठी कुणी हजार रुपयांचे सहयोग शुल्क दिले तर उत्तमच. नाही तर बहुतेक वेळी पदरमाेड करून त्यांचे कार्य चालते. कमर्शियल आर्टिस्ट राहिलेल्या सातपुतेंचा उदरनिर्वाह त्यांच्या नर्सरीच्या उद्योगातून चालतो.

नश्वर शरीर मृत्यूनंतर समाजाेपयोगी ठरू द्या
"शरीर म्हणजे मातीच. त्याचा मोह का बाळगायचा? ते मृत्यूनंतरही समाजाच्या कामी पडायला हवे. त्यातून उद्याचे चांगले डॉक्टर घडणार असतील तर बिघडले कुठे?,’ असा सवाल करतानाच ‘मृतदेह हाताळावा लागत असल्याने कोणी या कामी रस घेत नाही,’ अशी खंतही सातपुते व्यक्त करतात. देहदानाबद्दल भ्रामक समजुती आहेत. हिंदू धर्मात कुठेही याला मज्जाव नाही, असा संदर्भही ते देतात.

जागतिक देहदान दिन असावा
सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक दिन साजरे होतात. नेत्रदान, रक्तदानदिनीही विविध कार्यक्रम घेतले जात आहेत. त्याचप्रमाणे अाता देहदान दिनही साजरा करण्यात यावा यासाठी सातपुते यांचा सर्व पातळ्यांवर पत्रव्यवहार सुरू आहे.