आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार झाडावर आदळल्यामुळे चिमुकल्यासह कोतवाल मृत्युमुखी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरूड - कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात एका पाच वर्षीय चिमुकल्यासह तहसील कार्यालयात कोतवाल म्हणून कार्यरत असलेल्या व्यक्तीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. वरूड तालुक्यातील धनोडी ते पुसला मार्गावर शनिवारी १० सप्टेंबरला सकाळी ही दुर्घटना घडली. घरून शेताकडे जात असताना हा भीषण अपघात घडला. या अपघातात दोन जण ठार झाले असून, एक जण गंभीर जखमी आहे. या घटनेमुळे धनोडी गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. जखमींमध्ये एका पोलिस पाटलाचा समावेश आहे.या संदर्भात प्राप्त माहितीनुसार येथून जवळच असलेल्या धनोडी येथील रूपेश मधुकर सुळे (३२), प्रितम शरद आंडे आणि सोहम प्रितम आंडे(५) हे तीन जण कार क्रमांक एमएच २७ एसी ८४११ ने पुसला रस्त्यावरील शेतात जाण्यासाठी निघाले. सकाळी वाजताच्या सुमारास ही कार अनियंत्रित झाल्याने या मार्गावर असलेल्या एका लिंबाच्या झाडाला जाऊन धडकली. ही धडक एवढी जोरदार होती की या अपघातात रूपेश सुळे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. रूपेश सुळे हे तहसील कार्यालयात कोतवाल या पदावर कार्यरत होते. या घटनेची माहिती मिळताच जखमींना वरूडच्या ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र तेथून त्यांना नागपूर येथे हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी जखमी झालेल्या सोहमचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या अपघातात पोलिस पाटील प्रितम आंडे हे जखमी झाले आहे. मात्र त्यांचा चिमुकला मुलगा या अपघातात दगावला. या दुर्घटनेमुळे धनोडी गावात शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेनंतर मृतकांचे आप्तेष्ट ,गावकरी,महसूल कर्मचाऱ्यांची रूग्णालयात गर्दी झाली होती.
वरूड ते धनोडी रस्त्यावर झाडावर धडकून झालेल्या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे.
बातम्या आणखी आहेत...