आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृषाली गेली, ‘चार्जशीट’साठी कुटुंबीयांची होतेय परवड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृतक वृषाली तिरमारे आणि आई ललिता तिरमारे - Divya Marathi
मृतक वृषाली तिरमारे आणि आई ललिता तिरमारे
अमरावती- नोकरीसाठीमुंबईत गेलेल्या पोटच्या पोरीला एका पुढाऱ्याच्या कारचालकाने उडवले. पोरीचा जीव गेला. चालकाला अटक झाली अन् लगेच सुटलाही. परंतु, प्रशासकीय यंत्रणेत काम करणाऱ्या माणसातील ‘माणूस’च मेल्याने साध्या ‘चार्जशीट’साठी सहा-सातशे किमीवर असलेल्या मुंबईत जाऊन आता पायपीट करावी लागत आहे. गेलेल्या तरण्या मुलीच्या आठवणीने रोजच काळीज फाटते. त्यातच चार्जशीट मिळवण्यासाठी शेकडो किमीवर करावी लागणारी जीवघेणी धावपळ शहारे आणणारी आहे. मुलीच्या आठवणीने भावुक झालेल्या ललिता तिरमारे डोळ्याला पदर लावून शासकीय यंत्रणेतील निंबरता ‘दिव्य मराठी’कडे व्यक्त करत होत्या.

अमरावती येथील वृषाली राजेंद्र तिरमारे (२६) ही तरुणी मुंबई येथे अन्न औषधी प्रशासन विभागात लिपिकपदावर कार्यरत होती. २६ फेब्रुवारी २०१५ रोजी वरळी येथील मैत्रिणीकडे जात होती. रस्त्याच्या कडेला फुटपाथवर एका सँडविच विक्रेत्याकडे सँडविच खात असताना दारूच्या नशेत तर्र एका पुढाऱ्याच्या अालिशान कारचालकाने वृषाली सँडविच दुकानदाराला उडवले. यात दोघांचाही मृत्यू झाला. तरुण मुलीच्या अशा अपघाती जाण्याने तिरमारे कुटुंबीयांवर झालेल्या आघाताच्या जखमा अद्यापही ताज्याच आहेत. अशा वेळी वृषालीच्या जीवन विम्यासाठी तिरमारे कुटुंबीयांना सदर प्रकरणाच्या दोषारोपपत्राची (चार्जशीट) गरज आहे. या सदर प्रकरणाचा तपास वरळी पोलिसांनी पूर्ण केला आहे.आतापर्यंत नेमके काय झाले, ही माहिती घेण्यासाठी वृषालीचे वडील राजेंद्र तिरमारे आई चार- पाच वेळा मुंबईत जाऊन आले आहे. मात्र, पोलिसांनी कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले नसल्याचे ललिता तिरमारे यांचे म्हणणे आहे.

फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे प्रकरण : वृषालीचानाहक बळी घेणाऱ्या वाहनचालकाला कठोर शिक्षा व्हावी,यासाठी हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालायला पाहिजे.हे प्रकरणसुद्धा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे ललिता तिरमारे यांनी सांगितले.

वैदर्भीयामुळेच अन्याय : आम्हीविदर्भातील असल्यामुळेच मुंबईत त्रास दिला जात आहे. आतापर्यंत चार ते पाच वेळा मुंबईत जाऊनसुद्धा आम्हाला मदत झाली नसल्याचे ललिता तिरमारे यांचे म्हणणे आहे. तिरमारे दाम्पत्य शासकीय सेवेत आहे. मुंबईत जाऊन येण्यासाठी त्यांचे किमान चार ते पाच दिवस जात आहेत.
पुढील आठवड्यात पुन्हा जाणार मुंबईला
वृषालीच्या मृत्यूला सहा महिने उलटले आहे. यासंदर्भात माहिती घेण्यासाठी आम्ही आतापर्यंत चार ते पाच वेळा मुंबईत जाऊन आलो. मात्र, पोलिसांकडून सहकार्य झाले नाही. आम्हाला सदर प्रकरणाचे दोषारोपपत्र (चार्जशीट) पाहिजे आहे, तीसुद्धा अजून मिळाली नाही. त्यासाठी पुढील आठवड्यात पुन्हा मुंबईला जाणार अाहे. -ललिता तिरमारे,मृतक वृषालीची आई.