आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती जिल्ह्यात दररोज अपघात, एकाचा मृत्यू तर तिघे जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - नैसर्गिक मृत्यू किंवा आजाराने मृत्यू होणाऱ्यांच्या तुलनेत रस्त्यावर होणाऱ्या वाहन अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत आहे. जानेवारी ते डिसेंबर २०१६ या वर्षभरात शहरासह जिल्ह्यात एकूण १२७० अपघात घडले असून यामध्ये तब्बल ३३९ जणांचा रस्त्यांवरच बळी गेला. अपघाती मृत्यूसंख्या लक्षात घेता दरदिवशी सरासरी अपघातात एकाचा मृत्यू तर तिघे जखमी होतात. अपघातामुळे हाेणारी ही हानी दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी वाढतच आहे. त्यामुळे प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक नियमांचे तंतोतत पालन करून अपघात टाळण्याची गरज आहे. 

सद्या रस्ता सुरक्षा सप्ताहानिमीत्त पोलिसांच्या वाहतूक शाखा, आरटीओ विभागाकडून वाहतूक नियमांच्या जनजागृतीसाठी मोठ्या प्रमाणात विवीध मार्गाने प्रयत्न केले जातात. या प्रकारची शासकीय जनजागृती या विभागाकडून दरवर्षीच केली जाते. वर्षांतून एकदा जनजागृती करूनही अपघातांची संख्या तसेच अपघाताने मृत्यूमुखी पडणारे जखमींची संख्या वाढत आहे. शासकीय यंत्रणा केवळ जनजागृती करू शकते मात्र प्रत्येक वाहनचालकाने नियमांचे पालन केले तर
अपघात निश्चितच कमी होतील. 
 
मात्र मागील पाच वर्षांची आकडेवारी पाहता दरवर्षी अपघात अपघातामुळे जीव जाणाऱ्यांचा आलेख सातत्याने वाढत आहे. अमरावती आयुक्तालयातंर्गत येणाऱ्या दहा ठाण्यांमध्ये जानेवारी ते डिसेंबर २०१६ दरम्यान एकूण ५९३ अपघात झालेले आहे. यापैकी ८६ अपघातात ९१ जणांचा जीव गेला आहे तर ८१ अपघातात १०६ जण गंभीर जखमी झालेले आहे.
 
याचवेळी २९२ अपघातात ३८१ जण किरेकोळ जखमी झाले आहेत. तसेच १३४ इतर अपघात झाले आहे. तसेच अमरावती ग्रामीणमध्ये म्हणजेच जिल्ह्यातील ३१ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत एकूण ६७७ अपघात झाले आहेत. यामध्ये २३६ अपघातात २४८ जणांचा जीव गेला आहे तर १५९ अपघातात २५५ जण गंभीर जखमी झालेत. याचवेळी २८२ अपघातात ३६० जण किरकोळ जखमी झाले आहेत. 

जिल्ह्यात दरवर्षी ३५ ते ४० हजार नवीन वाहन रस्त्यांवर येत आहे. त्यातच बहूतांश वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले जाते. अपघात होऊ नये यासाठी शासकीय यंत्रणाकडून प्रयत्न सुरूच आहे, यावेळी प्रत्येक वाहनचालकाने नियमांचे पालन करून अपघात टाळणे गरजेचे आहे. कारण अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्या एकूण व्यक्तींमध्ये १५ ते ४० या वयोगटाची टक्केवारी ही ५० टक्केच्या आसपास आहे. 

नियमांचे पालन करावे: रस्ते अपघाताची मृत्यू संख्या चिंताजनक आहे.प्रत्येकांनी वाहतूक नियमांचे पालन केल्यास ही संख्या कमी होईल, असा विश्वास पश्चिम वाहतूक विभागाचे पीआय अर्जुन ठोसरे यांनी व्यक्त केला आहे.