आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिकिटांची चोरी करणाऱ्या वाहकांवर कारवाईचा चाप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जिल्ह्यात एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या भरपूर असूनही वाहकांच्या तिकीट चोरीमुळे एसटी महामंडळाची तिजोरी रिकामीच राहत असल्याचे वास्तवदर्शी वृत्त दै. दिव्य मराठीने गुरुवारच्या (दि.८)अंकात प्रकाशित करताच तोट्याचे हे प्रमाण कमी करण्यासाठी एसटी महामंडळाच्या अमरावती विभागाने पुढाकार घेतला आहे. तिकीट चोरी रोखण्यासाठी वाहकांना कठोर कारवाईचा चाप लावत प्राथमिक दंड म्हणून डेपो बदलण्याची कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, वाहक बघून प्रवासी ही गाडीत बसतात असे लक्षात आल्यामुळे प्रारंभी डेपो बदल ही कारवाई केली जाणार असून, त्यानंतर राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार एक रुपयाच्या भ्रष्टाचारासाठी ५०० रुपये दंड आकारला जाणार आहे, यावरही जर वाहकाच्या वागणुकीत परिवर्तन झाले नाही तर मग त्याला सरळ विभागीय बदलीचा हिसका दाखवला जाणार आहे.लवकरच हा निर्णयही लागू होणार असल्याची माहिती विभागीय नियंत्रकांनी दिली आहे.

एसटीच्या नुकसानीचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाय केले जाणार आहेत. प्रवाशांना स्टँडवरच तिकीट देऊन मगच गाडी पुढे धावेल याला आम्ही ‘इश्यू अॅण्ड स्टार्ट’ असे म्हणतो. तसेच तालुक्यापासून जिल्ह्यापर्यंत बसेसची संख्या वाढवणार आहोत. अमरावती-परतवाडा, अमरावती-मोर्शी, अमरावती-वरुड, अमरावती-चांदूर बाजार या बसेसमध्ये आधी अर्धा तासांचे अंतर असायचे आता ते १५ मिनिटांनी कमी करण्यात आल्याने बसेसची संख्या वाढली आहे. जिल्हा स्थळी येण्यासाठी प्रवाशांना जास्तीचे पर्याय उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न होता. त्याअंतर्गत ही सोय करण्यात आली असून, येत्या काही दिवसांत अमरावती-चांदूर रेल्वे गाड्यांची संख्याही वाढणार आहे. एसटीकडे जे पर्याय उपलब्ध आहेत, त्यांचा प्रवाशांच्या सोयीसाठी पुरेपूर वापर आम्ही करीत आहोत. प्रवाशांनाही दक्षता कर्तव्य म्हणून एसटीला सहकार्य करायला हवे. प्रवाशांनीच एसटीतील भ्रष्टाचाराला वाचा फोडायला हवी. तरच आपली एसटी रस्त्यावर सुरक्षित सुसाट धावेल, असेही एसटीचे अधिकारी म्हणाले.

यंदा ६० गड्या काढल्या भंगारात : एसटीकडे सध्या ४४६ बसेस अाहेत. गत एका वर्षापासून ६० गाड्या भंगारात काढण्यात आल्या असून ६० नवीन बसेसही आम्हाला मिळाल्या आहेत. आणखी १८ गाड्या नव्याने भंगारात काढल्या जातील. यंदा आम्ही एकूण ७८ गाड्या सेवेतून कमी केल्याची माहिती अडोकार यांनी दिली.

स्पर्धेत टिकण्यासाठी गाड्यांचे डिझाईन बदलावे : स्पर्धेत उतरण्यासाठी गाड्यांचे डिझाईन बदलण्याची गरज आहे. आम्ही टप्प्याटप्प्याने बदल करीत अाहोत. आधी मिडी बस आली, नंतर थ्री बाय टू आता टू बाय टू ही परिवर्तन नामक बस आपण बघत आहोत. लांब पल्ल्यासाठी एशियाड धावतेय. त्यात सुधारणा करून एसी बसवण्यात आले आहेत. याला शीतल असे नाव आहे. महामंडळाकडे अशा ५०० गाड्या आहेत. यासोबतच शिवनेरी, वोल्व्हो असे एकूण सात नवे बस प्रॉडक्ट आम्ही वापरत आहोत. सुधारणा होत असली तरी त्यात संथपणा आहे. एशियाडला पुरेसे प्रवासी मिळत नसल्यामुळे त्यांची संख्या विभागात फारच मर्यादित आहे. कारण ज्यादा खर्च करण्याची प्रवाशांची क्षमता नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

एका वर्षात इतिहासजमा होणार ‘यशवंती’ : एसटीकडे सध्या २२ यशवंती या हिरव्या रंगाच्या बसेस आहेत. यांना मिडी बसेस असेही म्हणतात. लहान आकाराच्या या बसेस वर्षांनंतर सेवेतून बाहेर कराव्या लागतात किंवा ४.२५ लक्ष कि.मी. धावल्यानंतर त्या कायमच्या थांबवाव्या लागतात.

अशा १४ गाड्या सध्या रस्त्यांवर धावत असून गाड्या वर्कशाॅपमध्ये उभ्या आहेत. १४ पैकी एखादी गाडी दुरुस्तीसाठी पाठवली तर वर्कशॉपमधील गाडी सेवेत काढली जाते. यशवंतींना आता पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांना एका वर्षांनंतर सेवेतून बाहेर केले जाण्याची शक्यता असल्याची माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ‘स्पीड ब्रेक’
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आम्ही ‘स्पीड ब्रेक’ लावले आहे. मोटार वाहन कायदा १९८९ नुसार ८० कि.मी. प्रतितास वेगाने वाहन चालवण्याचा नियम आहे. यापुढे एसटी असो की ट्रॅव्हल्स सर्वच बसेस नोंदणीसाठी जातील त्यांना स्पीड लिमिट डिव्हाईस बसवल्याशिवाय नोंदणीच होणार नाही.

तिकिटाशिवाय बस पुढे सरकू देऊ नये
एसटीला तोट्यातून बाहेर काढण्याची जबाबदारी ही विभागीय परिवहन विभागासोबतच प्रवाशांचीही आहे. वाहकाने तिकीट दिल्याशिवाय त्यांनी गाडी स्थानकावरून पुढे हलू देऊ नये, प्रवाशांनी त्यांचा हक्क बजावायला हवा. राजेश अडोकार, विभागीय नियंत्रक, राज्य मार्ग परिवहन विभाग, अमरावती.
बातम्या आणखी आहेत...