आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ते चारही मृतदेह आज रात्रीपर्यंत येणार अमरावती शहरात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 अमरावती- केदारनाथ, गंगोत्री, बद्रीनाथ येथे दर्शनासाठी गेलेल्या जिल्ह्यातील दहा भाविकांच्या वाहनाला उत्तराखंडमध्ये अपघात झाला. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या शहरातील चारही भाविकांचे मृतदेह रविवारी (दि. ७) रात्रीपर्यंत शहरात पोहोचणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे. दुसरीकडे या अपघाताचे वार्ता वसुंधरा कॉलनी, प्रकाशनगर दस्तूरनगर भागात पसरताच परिसरात शोककळा पसरली आहे. 
 
केदारनाथ यात्रेसाठी जिल्ह्यातून जवळपास ३० ते ३२ भाविक मे रोजी सकाळी १० वाजता शहरातून नागपूरच्या दिशेने रवाना झाले होते. नागपुरातून रेल्वेने त्यांनी पुढील प्रवास सुरू केला. दरम्यान शनिवारी (दि. ६) सकाळी भाविकांचा जत्था गंगोत्रीवरून केदारनाथ जाण्यासाठी टेम्पो ट्रॅव्हलरने निघाले होते. तीन टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये अमरावतीचे भाविकांचा केदारनाथच्या दिशेने प्रवास सुरू झाला. यावेळी यमुनोत्री ते केदारनाथ मार्गावरील झिंगोरा बॅन्ड नजीक दहा भाविक बसले असलेली एक टेम्पो ट्रॅव्हलर दरीत कोसळली. यावेळी सेवानिवृत्त अभियंता चंद्रकांत सीताराम काळकर (६१ ) त्यांच्या पत्नी कुंदा चंद्रकात काळकर (५० दोघेही रा. प्रकाशनगर, विद्युत नगर), मीना सुधाकर मुरादे (४८, रा. दस्तूरनगर परिसर) संजय पाटील (५७, रा. वुसंधरा कॉलनी) यांचा मृतकांमध्ये समावेश आहे. याचवेळी सहा जण जखमी झाले आहे. जखमींमध्ये येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दक्षता गुणनियंत्रक विभागाचे अधीक्षक अभियंता सुधाकर मुरादे, धामणगाव रेल्वेच्या माजी नगराध्यक्षा अर्चना राऊत, त्यांचे पती सतीश राऊत यांच्यासह जिल्ह्यातील अन्य सहा जण जखमी झाले आहे. शहरातील विद्युतनगर भागातील अभियंता कॉलनीमध्ये राहणाऱ्या काळकर दाम्पत्यासह अन्य काही भाविक शहरातून केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री येथे दर्शनासाठी गेले होते. दरम्यान शनिवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास जिल्ह्यातील दहा भाविक टेम्पो ट्रॅव्हलर क्रमांक (एच. आर. ६९ डि २७१८) ने यमुनोत्रीवरून केदारनाथच्या दिशेने जात होते. दरम्यान बाळगंगा तालुक्यातील झिगोरा बँन्डनजीक त्यांचे वाहन दरीत कोसळले. यामध्ये चौघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. 
अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या चारही मृतदेहांचे शनिवारी सायंकाळी शवविच्छेदन करून मृतदेह सोबत असलेल्या अमरावतीच्या इतर भाविकांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. हे चारही मृतदेह रविवारी देहरादूनवरून कार्गो विमानाने नागपूरला आणण्यात येईल, नागपूरवरून वाहनाने रविवारी रात्रीपर्यंत शहरात मृतदेह पोहचतील, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. दरम्यान अपघातात गंभीर जखमी झालेले अधीक्षक अभियंता सुधाकर मुरादे यांना टेहरीवरून देहरादून उपचारासाठी पाठविण्यात आले होते. त्यांना तातडीने देहरादून पोहचवण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र हेलीकॉप्टर उतरवणे शक्य झाल्यामुळे उत्तराखंड प्रशासनाने त्यांना वाहनानेनच देहारादून पाठवले असून त्यांची प्रकृती आता चिंताजनक नसल्याचे टेहरी प्रशासनाने दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.
 
जिल्हाप्रशासन उत्तराखंडच्या संपर्कात ­: घटनेचीमाहिती मिळाल्यानंतर पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्यासह अवघे जिल्हाधिकारी कार्यालय, प्रशासकीय अधिकारी माहिती मिळवण्यासाठी सातत्याने उत्तराखंड प्रशासनाच्या संपर्कात होते. मिळालेल्या माहितीच्या आधारे पुढील दिशा ठरवण्यासाठी प्रयत्न करत होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असलेली प्रधानमंत्री आवास योजनेची आढावा बैठकही काही काळ थांबवण्यात आली होती. शनिवारी उशिरा रात्रीपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाची यंत्रणा उत्तराखंड प्रशासनाच्या संपर्कात होती. 
 
जखमींची प्रकृती आता धोक्याबाहेर 
-या अपघातातील चारही मृतदेहांचे शवविच्छेदन झाले आहे. जखमींपैकी एकाला आम्ही देहरादूनला उपचारासाठी पाठवले आहे. हेलीकॉप्टरला उतरण्यासाठी जागा मिळाल्यामुळे जखमींना वाहनातूनच देहरादून पाठवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक नसल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे. नारायणसिंग, एसएसपीटेहरी, उत्तराखंड. 
केदारनाथ अपघातात मृत्युमुखी पडलेले संजय पाटील यांच्या वसुंधरा कॉलनीमधील घरासमोर नागरिकांनी गर्दी केली होती. 
बातम्या आणखी आहेत...