आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Exclusive: देशातील 70 शहरांची प्रदूषणमुक्तीकडे वाटचाल; अाैरंगाबादसह राज्यातील 10 शहरांचा समावेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- वायु प्रदूषणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या महाराष्ट्रासह देशभरातील ७० शहरांमधील हवेच्या गुणवत्तेचा आढावा घेऊन त्यावर उपाययोजना सुचविण्याचा प्रकल्प ‘नीरी’कडे आला आहे. यात नाशिक, अाैरंगाबादसह महाराष्ट्रातील १० शहरांचा समावेश असून त्यावर यापूर्वीच काम सुरू झाले आहे.  

नागपुरातील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेचे (नीरी) संचालक डॉ. राकेशकुमार यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना याबाबत माहिती दिली. देशातील सहा मेट्रो शहरांसह (बंगळुरू आणि हैदराबादसह) वायुप्रदूषणाच्या दृष्टीने संवेदनशील किमान ७० शहरांमधील हवेच्या गुणवत्तेचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी ‘नीरी’कडून उपाययोजना सुचविल्या जाणार आहेत. यासाठी  स्थानिक स्वराज्य संस्था, आयआयटी, एनआयटी तसेच अन्य स्वयंसेवी संस्थांसोबत भागीदारीतून या प्रकल्पाची अंमलबजावणी करणार असल्याचे डॉ. राकेशकुमार यांनी नमूद केले. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने या शहरांची यादी तयार केली आहे. प्रामुख्याने औद्योगिक वसाहती, वीज प्रकल्प तसेच वाहनांच्या मोठ्या संख्येमुळे प्रदूषणाचा सामना करणाऱ्या शहरांचा यात समावेश करण्यात आला आहे.   
 
महाराष्ट्रातील दहा शहरांमध्ये नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, चंद्रपूर, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, मुंबई आणि नवी मुंबई या शहरांचा समावेश अाहे. या शहरांसाठी नीरीने यापूर्वीच काम सुरू केले आहे. या वर्षभरात या शहरांमध्ये वायुप्रदूषण मुक्तीच्या कृती योजनेची अंमलबजावणी देखील शक्य होईल, असे त्यांनी सांगितले. या प्रकल्पात स्थानिक स्वराज संस्थांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. कारण ‘नीरी’कडून सुचविल्या जाणाऱ्या उपाययोजनांची अंमलबजावणी या संस्थांनाच करायची आहे. त्यासाठी नीरी आणि ७० शहरांशी संबंधित संस्थांमध्ये सामंजस्य करारांची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. या शहरांमधील वायुप्रदूषणाचे स्वरूप, धूलिकणांची स्थिती, त्यामागील कारणे यांचा सर्वंकष अभ्यास केल्यानंतर शहरनिहाय कृती योजनेचे स्वरूप स्पष्ट होणार आहे.

मुंबईपासून सुरुवात  
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ‘नीरी’ने राज्यातील २७ शहरांमध्ये ध्वनिप्रदूषणाचा आढावा घेऊन त्यावर उपाय सुचविण्याच्या योजनेला अलीकडेच सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात २७ पैकी १० शहरांमधील ध्वनिप्रदूषणाच्या मोजमापाचे काम हाती घेण्यात येत असून त्यात मुंबई व लगतच्या शहरांचा प्रामुख्याने समावेश असल्याचे सांगण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...