आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नऊ पैकी सात नगराध्यक्ष भाजपचे, अचलपूरमध्ये शिवसेनेच्या धनुष्यबाणाने केला 'प्रहार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - केंद्रात आणि राज्यातील सत्तांतरानंतर झालेल्या जिल्ह्यातील नऊ नगर पालिकेच्या निवडणुकीत भाजपने सात ठिकाणी नगराध्यक्षपदांवर विजय मिळवून ग्रामीण भागात भरघोस यश संपादन केले आहे. उर्वरीत दोन नगर पालिकांपैकी अचलपूरमध्ये शिवसेनेने खाते उघडले असून, चांदूर रेल्वेमधील सत्ता शाबूत राखण्यात कॉंग्रेसला यश आले आहे. दरम्यान, तीन ठिकाणी नगरसेवक विजयी करून एमआयएमने जिल्ह्याच्या राजकारणात उडी घेतली आहे. तर समाजवादी पार्टी आणि मनसेनेही पालिकेच्या निवडणुकीत खाते उघडले आहे.

मागील निवडणुकीत विदर्भ जनसंग्राम पक्ष स्थापन करून वरूड आणि शेंदूरजनाघाट या दोन नगरपरिषदांमध्ये सत्ता काबीज करणारे भाजपचे विद्यमान आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी यावेळी त्यांचा गड कायम राखला. मोर्शीमध्ये शीला अशोक रोडे, वरूडमध्ये स्वाती आंडे आणि शेंदुरजना घाट मध्ये रूपेश मांडवे हे तीनही नगराध्यक्ष भाजपच्या तिकिटावर विजयी झाले. तर अकोट मतदारसंघाचे भाजपचे आमदार प्रकाश भारसाकळे यांनीही त्यांच्या दर्यापूर मतदारसंघाच्या बालेकिल्ल्यावरील पकड शाबूत ठेवण्यात यश मिळवले आहे. दर्यापूरमध्ये नलिनी भारसाकळे आणि अंजनगांव सुर्जीमध्ये अॅड. कमलाकांत लाडोळे हे दोन्ही भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले. धामणगांव रेल्वे नगरपरिषदेच्या अध्यक्षपदी भाजपचे प्रताप अडसड विजयी झाले. या विजयामुळे भारतीय जनता पक्षाने धामणगाव रेल्वेची नगरपरिषद ताब्यात घेऊन हॅट्रीक साधली आहे. धामणगांव रेल्वेत प्रताप अडसड नगराध्यक्षपदी निवडून आल्याने अडसड परिवारातील तिसऱ्या पिढीने आता राजकारणात यशस्वी पाय रोवले आहेत. अचलपूर येथे शिवसेनेच्या सुनीता फिस्के यांचा विजय झाल्याने शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनीही शिवसेनेचे अस्तित्व कायम ठेवले. तर चांदूर रेल्वेच्या नगराध्यक्षपदी कॉंग्रेसचे नीलेश सूर्यवंशी हे विजयी झाल्याने कॉंग्रेसचे आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांनी प्रतिस्पर्धी भाजपवर विधानसभेप्रमाणेच नगरपालिका निवडणुकीतही यशस्वी मात केली आहे.

अॅड. कमलाकांत लाडोळे सर्वाधिक मतांनी विजयी
अंजनगांव नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी भाजपचे कमलाकांत लाडोळे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार एमआयएमचे सैय्यद मुजीबूर रहेमान यांच्यावर तब्बल हजार ९०१ मतांनी विजय मिळवत जिल्ह्यात सर्वाधिक मतांनी विजयी होण्याचा बहुमान मिळवला आहे. तर दर्यापूरमध्ये भाजपाच्या नलिनी भारसाकळे यांनी कॉंग्रेसच्या सुधाकर भारसाकळे यांच्यावर ६६ मतांनी निसटता विजय मिळविला. या व्यतिरीक्त वरूड येथे भाजपच्या स्वाती आंडे यांनी कॉंग्रेसच्या माधुरी देशमुख यांचा ३६६६, शेंदुरजनाघाटला भाजपाचे रूपेश मांडवे यांनी शिवसेनेचे संदीप खडसे यांचा २५८१, मोर्शीला शीला रोडे यांनी राष्ट्रवादीच्या मेघना मडघे यांचा ५०६ मतांनी पराभव केला. धामणगांव रेल्वे येथे भाजपचे प्रताप अडसड यांनी कॉंग्रेसचे नितीन कनोजीया यांच्यावर ३५०८ मतांनी, आणि चांदूर रेल्वे येथे कॉंंग्रेसचे नीलेश सूर्यवंशी यांनी अपक्ष नीलेश विश्वकर्मा यांच्यावर २०६ मतांनी विजय मिळविला. अचलपूर येथे शिवसनेच्या सुनीता फिस्के यांनी कॉंग्रेसच्या सरवत अंजुम यांचा ६४० मतांनी आणि चांदूर बाजार येथे भाजपचे रवींद्र पवार यांनी प्रहार लोकभारतीचे मुजफ्फर हुसेन शेख रहमतउल्ला यांचा १०१० मतांनी पराभव केला.
निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांनी मिरवणूक काढून मतदारांचे आभार मानले.

भाजपला चार नगरपालिकांमध्ये मिळाले स्पष्ट बहुमत
अंजनगांव सुर्जी, धामणगांव रेल्वे, शेंदूरजना घाट आणि वरूड नगरपरिषदेत भाजपचे सर्वाधिक नगरसेवक विजयी झाल्याने येथे भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तर दर्यापूर, चांदूर बाजार आणि मोर्शी नगर परिषदेत नगराध्यक्षपदी भाजपने विजय मिळवला असला तरी या पालिकांमध्ये भाजपला पूर्ण बहुमत मिळवता आलेले नाही. अचलपूरमध्ये शिवसेनेचा नगराध्यक्ष असताना शिवसेनेला फक्त दोन जागांवरच समाधान मानावे लागले. चांदूर रेल्वे परिषदेत १७ पैकी १० जागा जिंकून कॉंग्रेसने बहुमत मिळवले. दर्यापूरमध्ये २० पैकी १० जागांवर विजय मिळवला.

भाजपचे सर्वाधिक नगरसेवक विजयी
जिल्ह्यातील नगरपरिषदांमधील १९८ पैकी ९५ नगरसेवक पदे काबीज करून जिल्ह्यातील राजकारणात सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपने बाजी मारली आहे. तर ४१ जागा जिंकून कॉंग्रेस दुसऱ्या स्थानावर आहे. उर्वरीत जांगापैकी राष्ट्रवादी काँग्रेस प्रहार प्रत्येकी १३, शिवसेना ६, आरपीआय २, मनसे २, एमआयएम ३, समाजवादी पार्टी आणि अपक्ष २२ असे नगरसेवकांचे पक्षीय बलाबल आहे.
बातम्या आणखी आहेत...