अमरावती - ‘भीमरायाघे तुझ्या या लेकरांची वंदना’, अशी मनातून साद घालीत इर्विन चौकात लाखोंच्या संख्येत आलेल्या सर्वधर्मीयांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला १२५ व्या जयंतीनिमित्त पुष्पांसह श्रद्धासुमनांनी अभिवादन केले.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यीकरण समितीतर्फे इर्विन चौकात आयोजित मुख्य समारंभात पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी चौकात बाबासाहेबांचा चांदीचा पुतळा उभारण्याचा संकल्प व्यक्त केला. डाॅ. आंबेडकर सर्व धर्मीयांचे आहेत. त्यांचा हा पुतळा माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील माजी राज्यपाल रा. सू. गवई यांच्या प्रयत्नांतून इर्विन चौकात उभा राहिला. त्यांनी भारतीय समाजासाठी केलेल्या कार्यामुळे त्यांचा चांदीचा पुतळा उभा करण्याचे स्वप्न आहे. ते पूर्ण करण्यासाठी हजार लोकांनी प्रत्येकी एक लाख रु. जमा केले, तरी त्यांचा चांदीचा पुतळा उभा करणे सहज शक्य असल्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. अमरावती येथील शिव टेकडी, भीम टेकडी, दादासाहेब गवई यांचे स्मारक घडवण्याचे माझे स्वप्न आहे. बाबासाहेबांना कोणत्याही चौकटीत बसवू नका तसेच त्यांच्या नावाने राजकारणही करू नका, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.
जिल्हाधिकाऱ्यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या राज्यघटनेमुळेच भारत हा विश्वातील यशस्वी लोकशाही असलेला देश ठरल्याचे मत व्यक्त केले. सोबतच इर्विन चाैकातील जमीन पुतळा सौंदर्यीकरण समिती स्मारकासाठी विकत घेणार आहे. त्यासाठी जेवढे पैसे लागणार त्यापेक्षा १० लाख रु. जास्त जमा झाले आहेत. स्मारक उभारण्यासाठी यापेक्षा जास्त पैसे लागतील. ते लोकवर्गणीतून जमा करण्यात यावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी केले.
मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी इर्विन चौकात बाबासाहेबांचे स्मृती केंद्र उभारणार असून, यासाठी चांगल्यात चांगला आर्किटेक्ट निवडण्यासाठी स्पर्धा घेतली जाईल. त्याद्वारे आर्किटेक्टची निवड करू, असे सांगितले, तर पुतळा सौंदर्यीकरण समितीचे समन्वयक किशोर बोरकर यांनी सर्व जाती धर्मांना एकत्र करून डाॅ. आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला समाज घडवू, असे मत व्यक्त केले. इर्विन चौकात दिवसभरात लाखो अभिभावकांनी डाॅ. आंबेडकर यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले.
अर्ध्यातासात जमा झाले २३ लाख : डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे इर्विन चौकात स्मारक घडवण्यासाठी व्यासपीठावरून मान्यवरांनी आवाहन केल्यानंतर केवळ अर्ध्या तासात २३ लाख ५०० रु. ची रक्कम धनादेशांद्वारे जमा झाल्याची माहिती पुतळा सौंदर्यीकरण समितीच्या सदस्यांनी दिली. विशेष बाब अशी की, रोख रक्कम देता धनादेश देण्याचे अभिभावकांना आवाहन करण्यात आले होते.
जिल्हाआॅटो युनियनतर्फे हजार लोकांना अन्नदान : डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती पर्वावर अमरावती बसस्थानकापुढील आॅटोचालकांनी सकाळी ११ ते दु. पर्यंत अन्नदान केले. याअंतर्गत दिवसभरात हजार लाेकांना भोजन देण्यात आल्याची माहिती अमरावती जिल्हा आॅटो युनियन चालकमालक संघटनेच्या सदस्यांनी दिली. बसस्थानकापुढील १५० आॅटोचालकांनी अन्नदानासाठी आॅटो बंद ठेवल्याचेही त्यांनी सांगितले.
१०० गायकांद्वारे सलग १२ तास भीमगीतांचे गायन : इर्विनचौकात रंजल्यागांजल्यांचा भीमराजा होता... असे स्वर सकाळी १० पासून ऐकू येत होते. बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त १०० कलावंत सलग १२ तास भीमगीतांचे गायन केले. हा कार्यक्रम रात्री १० पर्यंत सुरू होता. समता संगीत मंचचे दीपक इंगळे या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक होते.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. मोहन खेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या एकता रॅली आयोजन समितीच्या अभिवादन कार्यक्रमात सुदर्शन जैन (गांग) यांच्यातर्फे १२५ किलो लाडवाचे इर्विन चौकात वाटप करण्यात आले.
१२५ किलोचे दोन केक : इर्विनचाैकात रात्री १२.०१ मिनिटांनी १२५ किलोचा केक रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे डाॅ. राजेंद्र गवई यांच्या नेतृत्वात कापण्यात आला, तर दुसरा केक १४ एप्रिल रोजी सकाळी अभिजित ढेपे यांनी आणला होता. तो पालकमंत्र्यांच्या हस्ते कापण्यात आला.
शहरात इर्विन चौकात स्वच्छता राहावी म्हणून निळे फेटे घालून विद्यार्थी हाती प्लास्टिकच्या पिशव्या घेऊन सर्वत्र फिरत होते. समाजकार्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिवसभर कचरा उचलून चौकात डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ स्वच्छता ठेवली.
डाॅ. आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त शहरात ठिकठिकाणी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. माजी सैनिकांकडून बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आली. त्याचप्रमाणे अभिवादन करण्यात आले. स्टेट बँक अमरावती मुख्य शाखेतर्फे रखरखत्या उन्हात दर्शनासाठी येणाऱ्या अभिभाविकांना शरबत वाटण्यात आले. यासोबतच अभिभाविकांना निःशुल्क पाणी, अल्पोपाहार देण्यात आला.
बसपतर्फे लाख २५ हजार लाडवाचे केले वाटप
बहुजन समाज पार्टीतर्फे शहरात डाॅ. आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त विशाल कार रॅली काढण्यात आली. संपूर्ण शहरात फिरून या रॅलीचा समारोप इर्विन चौकात झाला. दरम्यान, रॅलीद्वारे शहरात लाख २५ हजार बुंदीचे लाडू वाटण्यात आले.
व्हिजन इंटिग्रीटी तर्फे निःशुल्क दंत चिकित्सा
इर्विन चौकात मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्यामुळे भीमसागर उसळला होता. यांपैकी दंत विकार असलेल्यासाठी संभाजी ब्रिगेड अन् व्हिजन इंटिग्रिटी डेव्हलपमेंट असोसिएशनद्वारे निःशुल्क दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त इर्विन चौकात अभिवादन करण्यसाठी जमलेली गर्दी अभिवादन करताना पालकमंत्री प्रवीण पोटे.