आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय स्पर्धा गाजवणारा ‘आझाद श्री’ बॉडी बिल्डर नावेदचा खून, 4 ते 5 जणांनी चाकूने भोसकले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पप्पू बॉडी बिल्डर - Divya Marathi
पप्पू बॉडी बिल्डर
अमरावती- शहरातील प्रतिष्ठेची शरीरसौष्ठव स्पर्धा ‘आझाद श्री’ या किताबासह राष्ट्रीय राज्य स्पर्धा गाजवणाऱ्या शरीरसौष्ठवपटू नावेद इक्बाल ऊर्फ पप्पू बॉडी बिल्डर अ. खलील (२८) याचा मंगळवारी (दि. १८) दुपारी चार ते पाच मारेकऱ्यांनी निर्घृण खून केला. या घटनेने नागपुरी गेट परिसरात खळबळ उडाली असून, तणावाचे वातावरण तयार झाले होते. त्यामुळेच पोलिसांनी नागपुरी गेट परिसरात ठिकठिकाणी तगडा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. नावेदचा खून जिम चालवण्याच्या वादातून झाल्याची चर्चा घटनेनंतर परिसरात सुरू होती. 
 
नावेद हा शरीरसौष्ठवपटू होता. त्याने २०११ मध्ये शहरातील प्रतिष्ठेचा आझाद श्री किताब पटकावला हाेता. दरम्यान नागपुरी गेट भागातील राराणी मेडीकल स्टोअरमध्ये काम करून तो कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. यातच मागील चार ते पाच दिवसांपूर्वी त्याने वलगाव मार्गावरील एक जिम भाडे तत्वावर चालवण्यासाठी घेतला होता. या जिमचा संचालक नागपूर येथील आहे. सदर जिम यापुर्वी रहीम खान कादर खान याच्याकडे चालवण्यासाठी होता. दरम्यान मागील काही दिवसांपासून नावेद याच जिमच्या कामात व्यस्त असल्याचे घटनास्थळी असलेले नागरिक चर्चा करत होते. 

मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास नावेद घरातून बाहेर पडला. त्यावेळी त्याच्याजवळ जिमशी संबधित कागदपत्र होते. तो वलगाव मार्गावरील असोरिया पेट्रोलपंप समोर असलेल्या सिंडीकेट बँकेत कामानिमित्त गेला होता. त्याचवेळी चार ते पाच जण त्या ठिकाणी आले. या चार ते पाच जणांनी काही वेळ नावेदसोबत चर्चा केली चर्चा सुरूच असताना मारेकऱ्याने चायना चाकूने त्याच्या शरीरावर असंख्य वार केले. यावेळी गळा, मान, खांदा, छाती, पोट यासह शरीराच्या अनेक भागात असंख्य वार करून हल्लेखोर चारचाकी वाहनातून पसार झाले. हा जीवघेणा हल्ला जिम चालवण्याच्या वादातून झाल्याची प्राथमिक माहिती नागपुरी गेट पोलिसांनीही दिली आहे. 
 
दरम्यान भरदिवसा बँकेच्या आवारात झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. दरम्यान रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या नावेदला तातडीने इर्विन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही वेळ रुग्णालयात डाॅक्टरांनी उपचार केले मात्र प्रचंड रक्तस्त्राव असंख्य घावामुळे पाच मिनीटातच त्याची प्राणज्योत मालवली. नावेदवर हल्ला झाल्याची वार्ता नागपुरी गेट परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि परिसरातील नागरिकांची इर्विनमध्ये गर्दी सुरू झाली. कारण नावेद हा खेळाडू होता. यातही सुस्वभावी शांत अशी त्याची परिसरात ओळखी होती, अशा युवकावर प्राणघातक हल्ला झाल्यामुळे नागरिकांची गर्दी स्वाभाविकच होती. 

दरम्यान इर्विनमध्ये गर्दी वाढल्यामुळे पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला होता. दुसरीकडे नागपुरी गेट परिसरात घटनास्थळी हजारोंचा जमाव एकत्र आला होता. पोलिसांनी त्या ठिकाणी तसेच नावेद राहत असलेल्या छायानगर भागातही बंदोबस्त तैनात केला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर डीसीपी शशिकांत सातव, गुन्हे शाखेचे पीआय प्रमेश आत्राम, नागपुरी गेटचे ठाणेदार दिलीप चव्हाण यांच्यासह पोलिस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले होते. या प्रकरणी नावेदचा भाऊ जुनेद इक्बाल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चार ते पाच मारेकऱ्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. नावेद हा तीन भावंडांपैकी सर्वात लहान होता. त्याला चार वर्षांची एक मुलगी आहे. त्याच्या या अकस्मात मृत्यूने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 
 
सीसीटीव्हीमध्ये मारेकऱ्यांचे चेहरे आले नाही 
सदर घटना ही सिंडीकेट बँक एटीएमच्या आवारातील आहे. या ठिकाणी सीसीटीव्ही लागले आहेत. मात्र घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही पाहिले असता त्यांची दिशा वेगळ्या दिशेने होती. फुटेज तपासले असता त्यामध्ये मारेकऱ्यांचे चेहरे स्पष्ट नसल्याचे पोलिसांकडून समजले आहे. 
 
अमरावतीकरांनी गमावला एक उत्तम शरीरसौष्ठवपटू : राष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धेत पीळदार शरीराचे प्रदर्शन करून अमरावतीला लौकिक मिळवून देणारा बाॅडीबिल्डर नावेद इक्बालचा निर्घृण खून झाल्यामुळे अमरावतीकरांनी एक उत्तम खेळाडू गमावला आहे. शरीर सौष्ठव या क्रीडा प्रकारात तो राष्ट्रीय विजेता राहिला असून विदर्भ श्री, २०११ चा आझाद श्री, कामगार श्री यासह २०१७ मधील संघटनेच्या स्पर्धांमध्ये ही त्याने उत्कृष्ट कामगिरी केली. जिममध्ये जाऊन शरीर कमावण्याची त्याला आवड होती. परिसरात त्याची पप्पू बॉडी बिल्डर म्हणून ओळख होती.
 
पुढील स्‍लाइडवर वाचा, मारेक-यांचा शोध सुरु....