आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील सर्वच केंद्रांवर मतदारांच्या लांब रांगा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शहरात आज (२१ फेब्रुवारी) तुरळक प्रकार वगळता शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. शहरातील एकूण ७३५ मतदान केंद्रांवर सरासरी ५४.२१ टक्के मतदान झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. शहरातील एकूण ३ लाख १० हजार ४५५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ६२८ उमेदवारांचे भाग्य इव्हीएममध्ये बंद झाले असून त्यांच्या भाग्याचा फैसला गुरुवार २३ फेब्रुवारीला होणार आहे. 
 
महापालिका निवडणुकीत योग्य उमेदवार निवडण्यासाठी सकाळीच मतदार घराबाहेर पडले. सर्वच मतदान केंद्रावर सकाळी ७.३० पासून मतदारांनी हजेरी लावली. सकाळी ८ च्या सुमारास मुस्लिम बहुल परिसर तसेच मुस्लिम समाजाचे प्राबल्य असलेल्या प्रभागात नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र होते. सकाळी ७.३० ते ९.३० दरम्यान ७.९० टक्के, ११.३० पर्यंत १९.५७ टक्के, दुपारी १.३० वाजेपर्यंत ३१.६५ टक्के, दुपारी ३.३० पर्यंत ४४ टक्के मतदान झाले होते. शहराच्या अन्य भागात मात्र दिवसभर मतदारांची मतदान केंद्रात ये-जा सुरू होती. चौकातील मंडपांमुळे वादंग निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता बडनेरा जुनीवस्ती प्रभागातील बारीपुरा चाैकातील मंडप पोलिस प्रशासनाकडून काढण्यात आले. 

मतदान केंद्रावर सकाळी ११ पर्यंत मतदारांच्या रांगा दिसून आल्या. मात्र उन्हाची तीव्रता लक्षात घेता मतदारांनी दुपारी घरीच राहणे पसंत केले. त्यानंतर अंतिम टप्पात ४ वाजेपासून मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा दिसून आल्या. बडनेरा येथील एका मतदान केंद्रावर वीजेच्या व्यवस्था अपुरी असल्याने मतदारांना मतदान चिन्ह दिसत नसल्याची तक्रार होती. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत परिस्थिती हाताळल्याने मोठा वाद टळला. दरम्यान पालकमंत्री प्रवीण पोटे, आमदार डॉ. सुनील देशमुख, जिल्हाधिकारी किरण गित्ते, पाेलिस आयुक्त दत्तात्रय मंडलीक, महापालिका आयुक्त हेमंत पवार, मावळत्या महापौर चरणजित कौर यांच्यासह अनेक नामवंतांनी मतदान केले. प्रभागाच्या क्षेत्रात विस्तार करण्यात आल्याने मतदारांच्या संख्येत देखील मोठी वाढ झाली. 
 
शिवाय मावळत्या सदस्यांच्या प्रभागाला अन्य मोठा भाग जोडण्यात आल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे चित्र होते. संपूर्ण प्रभागात चर्चेत असलेल्या उमेदवाराला देखील मते मागण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. जवाहर स्टेडीयम या प्रभागातून भाजपाच्या रिता पडोळे अविरोध निवडून आल्याने ८६ नगरसेवक पदासाठी ७३२ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. ८७ जागेसाठी एकूण ७७८ ऑनलाइन नामांकन अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील छानणीमध्ये ५३ अर्ज रद्द करण्यात आले. वैधरित्या ६८८ उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. एकूण ६२८ उमेदवार रिंगणात होते. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी ७९१ केंद्राधिकारी, ७९१ सहाय्यक केंद्राधिकारी, ७९१ मतदान अधिकारी १,७९१ मतदान अधिकारी २ तसेच ३२९ शिपाई नियुक्त केले होते.
बातम्या आणखी आहेत...