आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती मनपा निवडणूक: दोन दशकानंतर भाजपचा राज्याभिषेक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - महापौर व उपमहापौरपदांच्या गुरुवारी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दोन्ही पदांवर विजयी संपादन केल्याने तब्बल दोन दशकानंतर महापालिकेत राज्याभिषेक झाला. अमरावतीचे पंधरावे महापौर म्हणून भाजपचे संजय नरवणे तर उपमहापौर म्हणून संध्या टिकले यांनी महापालिकेच्या सभागृहात आज (९ मार्च) झालेल्या निवडणुकीत विजय मिळविला. संजय नरवणे यांनी  ५६  मते मिळवून काँग्रेसच्या उमेदवार शोभा शिंदे यांचा पराभव केला. शिंदे यांना १५ मते मिळाली. उपमहापौरपदासाठी संध्या टिकले यांना ५६, काँग्रेसचे अब्दूल वसीम मजीद यांना १५ तर एमआयएमचे अब्दूल हुसैन मुबारक हुसैन यांना १० मते मिळाली.

मागील दोन दशकापूर्वी भारतीय जनता पक्षाला महापालिकेत सत्ता स्थापनेची संधी मिळाली होती. त्यावेळी भाजपाला शिवसेनेला सोबत घेत युतीशिवाय पर्याय नव्हता. दरम्यान तब्बल २० वर्ष काँग्रेस-राष्ट्रवादीने महापालिकेवर सत्ता गाजविली. केंद्रात आणि राज्यात सत्तांतर झाल्यानंतर फेब्रुवारी २०१७ ला पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत भाजपाने एकहाती सत्ता प्राप्त केली. बहुमताला ४४ नगरसेवकांची आवश्यकता असताना भाजपाचे तब्बल ४५ नगरसेवक निवडूण आले. त्यामुळे महापालिकेत भाजपाचा महापौर होईल, यात कोणतीही शंका नव्हती. महापौर-उपमहापौर पदासाठी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस असल्याने रविवार ५ मार्चला भाजपाने महापौर, उपमहापौर पक्षनेता, स्थायी समिती सभापती यांचे नाव निश्चित केले. 

दोन्ही पदासाठी आजची निवडणूक म्हणजे केवळ औपचारिकता होती. मात्र काँग्रेसने महापौर तर काँग्रेस-एमआयएमने उपमहापौर पदासाठी स्वतंत्र उमेदवार दिल्याने सकाळी ११ वाजता निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. विभागीय आयुक्त जे. पी. गुप्ता यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी कामकाज पाहिले. सर्वप्रथम महापौर पदाकरीता निवडणूक घेण्यात आली. भाजपचे उमेदवार संजय सातप्पा नरवणे काँग्रेसचे उमेदवार शोभा रवींद्र शिंदे यांना हात उंचावून मतदान करण्यात आले. त्यानंतर उपमहापौर पदासाठी निवडणूक घेण्यात आली. भारतीय जनता पक्षाच्या संध्या टिकले, काँग्रेसचे अब्दूल वसीम मजीद तर एमआयएमचे अब्दूल हुसैन मुबारक हुसैन यांना उपस्थित नगरसेवकांनी हात उंचावून मतदान केले. निवडणूक निर्णय अधिकारी महापौर उपमहापौर पदाच्या विजयी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. 

भाजपचे संजय नरवणे यांनी काँग्रेसच्या शोभा शिंदे यांचा ४१ तर भाजपाच्या संध्या टिकले यांनी काँग्रेसचे अब्दूल वसीम मजीद यांचा ३१ मतांनी पराभव केला. महापौर संजय नरवणे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पीठासीन सभापती म्हणून कार्यक्रम पत्रिकेवरील विषय घेतले. यामध्ये स्थायी समिती सदस्यांच्या नावांचा समावेश होता. पक्षीय बलाबलनुसार स्थायी समितीसाठी १६ सदस्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. विजयाची घोषणा होताच भाजपा कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या प्रांगणात घोषणाबाजी जोरदार आतिषबाजी केली. गुलाल उडवित ढोल-ताशांच्या आवाजात ताल धरला. नवनियुक्त महापौर,उपमहापौरांचे पालकमंत्री प्रवीण पोटे, आमदार डाॅ. सुनील देशमुख, भाजप शहराध्यक्ष जयंत डेहणकर यांनी स्वागत केले.यावेळी शिवसेना, युवा स्वाभिमान पक्षाने भारतीय जनता पक्षाला निवडणुकीत मतदान करीत मदत केली. 
 
पक्षविरोधी पक्ष नेत्याची निवड: महापालिकेतसत्ताधारी पक्षाच्या एका नेत्याची पक्ष नेता म्हणून सभागृहात निवड केली जाते. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने सुनील काळे यांना सभागृह नेता तर काँग्रेसचे बबलू शेखावत यांची विरोधी पक्ष नेता म्हणून निवड करण्यात आली. 
 
स्वीकृत सदस्यांचा वाद: स्वीकृतसदस्यांच्या नावांची घोषणा करण्याबाबत कार्यक्रम पत्रिकेत विषय समाविष्ट करण्यात आला होता. मात्र नव्याने शासन आदेश प्राप्त झाल्याचा हवाला देत स्वीकृत सदस्यांच्या नावांची घोषणा महिन्यानंतर होणाऱ्या सभेत होणार असल्याचे नगर सचिव मदन तांबेकर यांनी स्पष्ट केले. मात्र प्रशांत वानखडे यांनी आक्षेप घेतल्यानंतर पहिल्याच सभागृहात चर्चेचा फड रंगला. यामध्ये विलास इंगोले, चेतन पवार, बाळासाहेब भूयार, तुषार भारतीय यांनी सहभाग घेतला.   

पाच गटनेत्यांनी निवड
मनपात पक्षनिहाय पाच गटांचे गठन करण्यात आले आहे. या गटाची नोंदणी विभागीय आयुक्त कार्यालयात केली जाते. त्यानुसार भाजप गटनेतेपदी सुनील काळे, काँग्रेस गटनेतेपदी बबलू शेखावत, एमआयएम गटनेते पदी अब्दूल नाजीम अ. रऊफ, शिवसेनेच्या गटनेतेपदी प्रशांत वानखडे, बहुजन समाज पक्षाच्या  गटनेतेपदी चेतन पवार यांची निवड  करण्यात आली. या आधारे पक्षीय राजकारण चालेल.

तटस्थांची संख्या अधिक : महापौर तसेच उपमहापाैर या दोन्ही निवडणुकीत तटस्थ राहणाऱ्या नगरसेवकांची संख्या देखील मोठी आहे. महापौरांच्या निवडणुकीत ८४ सदस्यांनी सहभाग घेतला, ३ सदस्य अनुपस्थित होते. एमआयएम व बसप मिळून १३ सदस्य तटस्थ होते. उपमहापौर निवडणुकीत ८७ सदस्यांनी भाग घेतला. यामध्ये बसपाचे ५ व अपक्ष १ असे एकूण ६ सदस्य तटस्थ होते.

नवनियुक्त स्थायी समिती सदस्य
तुषार भारतीय (भाजपा)
विवेक कलोती (भाजपा)
आशिष अतकरे(भाजपा)
बलदेव बजाज (भाजपा)
गंगा अंभाेरे (भाजपा)
चंद्रकांत बोमरे (भाजपा)
माधुरी ठाकरे (भाजपा)
सुचिता बिरे (भाजपा)
सपना ठाकुर (युवा स्वाभिमान)
शोभा शिंदे (काँग्रेस)
मंजूश्री महल्ले (काँग्रेस)
हफीजाबी शहा (काँग्रेस)
नजमुन्नीसा मेहमुद (एमआयएम)
इमरान सईद (एमआयएम)
ललित झंझाड (शिवसेना)
इशरत बानो मन्नान खान (बसपा)
 
बातम्या आणखी आहेत...