आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेच्या सभेमध्ये मांडलेले जनसामान्यांचे प्रस्ताव गेले उडत!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरविकास तसेच जनसामान्यांच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेले, नगरसेवकांकडून मांडण्यात आलेले तब्बल २६४ प्रस्ताव प्रलंबित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे महापालिकेत जनसामान्यांचे प्रस्ताव हवेत अधांतरी उडत असल्याचे चित्र आहे. तीन वर्षांपूर्वी मांडण्यात आलेल्या प्रश्नांवर साधी चर्चा होत नसल्याने महापालिकेचे पदाधिकारी किती गंभीर आहेत, हे लक्षात येते.
महापालिकेच्या सभेसाठी नगरसेवकांकडून प्रस्ताव दाखल केले जातात. प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर या प्रस्तावांवर चर्चा होणे अपेक्षित आहे. प्रशासकीय विषय, शासनाच्या पत्रांचे अवलोकन केल्यानंतर एकाच विषयावर चर्चा लांबवत सर्वसाधारण सभा गुंडाळली जाते. या गोंधळात नगरसेवकांकडून मांडण्यात आलेल्या प्रस्तावांवर चर्चाच होत नाही.

१८ डिसेंबर २०१३ च्या सभेत मांडण्यात आलेल्या प्रस्तावांवर तीन वर्षांचा कालावधी लोटला तरी चर्चा झाली नाही. एकापेक्षा जास्त नगरसेवकांकडून प्रस्ताव आल्याने त्यावर प्राधान्यक्रमाने चर्चा होणे अपेक्षित आहे. प्रत्येक महिन्यात एक सर्वसाधारण सभा होत असताना तीन वर्षांपासूनचे प्रस्ताव प्रलंबित असल्याचे स्पष्ट होते. एवढेच नव्हे तर पाणीटंचाई असल्याने बडनेरा शहरात टँकरची मागणी दीड वर्षांपूर्वी करण्यात आली होती. ऑगस्ट २०१४ मध्ये टँकरची मागणी करण्यात आली होती. टँकर मिळाल्याने नगरसेविका डॉ. कांचन ग्रेसपुंजे यांच्याकडून एक वर्षांपूर्वी म्हणजेच २० मार्च १५ रोजी सर्वसाधारण सभेत याबाबत प्रस्ताव मांडण्यात आला. टँकर तर नाहीच शिवाय प्रस्तावावर चर्चादेखील नाही.

दाेन वर्षांपूर्वी देखील असेच शेकडो प्रस्ताव प्रलंबित होते. मात्र, तत्कालीन महापौर वंदना कंगाले यांनी प्रशासन तसेच नगरसेवकांशी समन्वय साधून एकाच वेळी अनेक प्रस्ताव निकाली काढले होते. अनेक नवीन प्रस्तावांची भर पडत असताना या विषयाला गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. विद्यमान नगरसेवकांचा कार्यकाळ संपण्यास केवळ १० महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. पुढील वर्षी फेब्रुवारीत पुन्हा जनतेच्या दरबारात त्यांना जावे लागणार आहे.

निपटारा होणे गरजेचे
^जनतेच्या समस्यांशी निगडित असलेल्या प्रस्तावांचा निपटारा होणे गरजेचे आहे. सर्वसाधारण सभा हा विषय महापौरांच्या अधिकार कक्षेत येत असल्याने त्यांनी त्यावर मार्ग काढत जनतेला समाधानी केले पाहिजे. शिवाय एका विषयावर लांबणारी चर्चा आवरती घेत प्रस्तावांवर चर्चा झाली पाहिजे. प्रवीणहरमकर, विरोधीपक्षनेता.

विषय पत्रिका शून्य हवी
^प्रस्ताव मांडण्यात आल्यानंतर नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत पूर्ण वेळ उपस्थित राहिले पाहिजे. अनेकदा नगरसेवकांकडून प्रस्ताव प्रलंबित ठेवण्याबाबत सूचना येते. त्यामुळे विषयपत्रिका लांबत जाते.विषयपत्रिका शून्य करणे सर्वांची जबाबदारी आहे. प्रकाश बनसोड, गटनेता.

निश्चित मार्ग काढणार
^प्रस्ताव मांडणाऱ्या सदस्यांनी सभागृहात पूर्ण वेळ हजर असावे, प्रस्ताव प्रलंबित असल्याने विषयपत्रिका फुगत आहे. विभागप्रमुखांची बैठक घेत प्रस्ताव निकाली काढण्याचा प्रयत्न करण्यात आला.चर्चा करावयाची असल्याने समस्या कायम आहे. यावर निश्चित मार्ग काढला जाईल. चरणजितकौर नंदा, महापौर.

विशेष सभा बोलवावी
^सर्वसाधारण सभेतएकाच विषयावर चर्चा लांबत जाते, याकडे लक्ष देत पीठासीन अधिकाऱ्यांनी मार्ग काढणे गरजेचे आहे. हा विषय मार्गी लावण्यासाठी विशेष सभा बोलावली पाहिजे. - संजय अग्रवाल, गटनेताभाजप.

पुढे काय?
समन्वयातून प्रस्ताव निकाली
विषयपत्रिकेत २६४ प्रस्ताव प्रलंबित असून, यातील अनेक प्रस्ताव कालबाह्य तसेच समस्या निकाली निघाल्याने खारीज होऊ शकतात. प्रशासनासोबत चर्चा करत अनेक प्रस्तावांबाबत मार्ग काढणे शक्य आहे. विषयपत्रिका शून्य करण्याकरिता पदाधिकाऱ्यांना समन्वयातून विषय हाताळावा लागणार आहे.

कालबाह्य प्रस्ताव कायम
सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेत असलेले अनेक प्रस्ताव कालबाह्यदेखील झाले आहेत. शिवाय ज्या समस्यांना घेऊन नगरसेवकांकडून प्रस्ताव मांडण्यात आले, त्या समस्या प्रशासनाकडून निकाली काढण्यात आल्या. काही विषय मार्गी लागले आहेत, अशा प्रस्तावांचा देखील यामध्ये समावेश आहे.
बातम्या आणखी आहेत...