आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती मनपाच्या नव्या ‘संघा’तील शिलेदारांची लागली उत्सुकता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - भारतीय जनता पक्षाने ८७ पैकी ४५ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविल्यानंतर आता महापालीकेतील नव्या ‘संघा’ तील संभाव्य शिलेदारांच्या निवडीबाबत सर्वच राजकिय पक्षांची उत्सुकता ताणल्या गेली आहे. 

अत्यंत चुरसीच्या झालेल्या अमरावती महानगरपालिकेच्या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये केंद्र राज्यामध्ये सत्ताधारी असलेल्या भाजपने एकहाती सत्ता मिळविल्याने अन्य कोणत्या राजकिय पक्षांच्या मदतीची निकड सत्ता स्थापण करण्यासाठी आता भाजपला महापालिकेमध्ये राहिलेली नाही. त्यामुळे महापालिकेतील महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, विविध संमित्यांचे सभापती, मिनी महापौर या सर्वच पदांवर भारतीय जनता पक्षातील नव्या सदस्यांची वर्णी लागणार हे निश्चित मानले जाते. 
 
भाजप व्यतिरीक्त विजयी झालेल्यापैंकी ज्या नगरसेवकांनी निवडणुकीत भाजपला सहकार्य केले अशा सदस्यांना सत्तेत स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. अमरावती महापालिकेतील महापौर पद हे अनुसूचीत जाती या प्रवर्गाकरीता राखीव आहे. या पदाकरीता भाजपकडे सध्या १० वार्डातून विजयी झालेल्या नगरसेवकांची टिम आहे. या दहा पैकी एकाची वर्णी महापौर पदावर लागणार आहे. राधा कुरील, अनिता राज, गंगा अंभोरे, वंदना हरणे, इंदू सावरकर, सोनाली नाईक या महिला उमेदवार आहेत. तर विजय वानखडे, संजय नरवणे, अजय गोंडाणे, संजय वानरे, हे महापौर पदाचे पुरुष दावेदार आहेत. या पैकी कोणाच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडणार ही उत्सुकता अमरावतीकरांना आहे. मात्र पक्षाच्या पार्लेमेंट्री बोर्डाच्या बैठकीतच यावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. 
 
पार्लेमेंन्ट्री बोर्डाच्या बैठकीत निर्णय 
महापौर,उपमहापौरआणि सर्वच महत्वाच्या समित्यांबाबत निवडून आलेल्या भाजपच्या सर्व नगरसेवकांशी भाजप पार्लेमेंन्ट्री बोर्डाचे सदस्य चर्चा करतील. त्यांची मते जाणून घेतील. सर्वांना सोबत घेऊनच महापालिकेत सत्ता स्थापन करण्यात येईल.’’ रामदासआंबटकर, प्रदेश सरचिटणीस भारतीय जनता पक्ष. 
 
महापालिकेतील भाजपचा नवा संघ 
तुषार भारतीय, विजय वानखडे,सुचिता बिरे, वंदना मडघे, गोपाल धर्माळे, चंदू बोमरे, सुरेखा लुंगारे, प्रमिला जाधव, बाळू भुयार, स्वाती जावरे, संजय वानेरे,नीता राऊत,माधुरी ठाकरे, धीरज हिवसे, संजय नरवणे, कुसूम साहू, सोनाली करेसिया, राजेश साहू, सोनाली नाईक, रिता पडोळे, श्रीचंद तेजवाणी, पंचफूला चव्हाण,अजय गोंडाणे, संध्या टिकले, राधा कुरील, नुतन भुजाडे, जयश्री डहाके, अजय सारस्कर, लविना हर्षे, स्वाती कुलकर्णी, प्रणीत सोनी, संगिता बुरंगे, विवेक कलोती, इंदू सावरकर, शिरीष रासने, सुनंदा खरड, आशिष अतकरे, अनिता राज, पदमजा कौंडण्य, बलदेव बजाज, चेतन गावंडे, रेखा भुतडा, वंदना हरणे, सुनिल काळे, गंगाबाई अंभोरे. 
 
महापालिकेतील सर्वच समित्या राहणार भाजपच्या ताब्यात 
महापालिकेत स्थायी समिती, विधी समिती, शहर सुधार समिती, शिक्षण समिती, महिला बाल कल्याण समिती, या पाच महत्वाच्या समित्या आहेत. तर महापालिकेच्या पाच झोन चे पाच सभापती म्हणजेच मिनी महापौर हे पाच पदे आहेत. या व्यतिरीक्त स्वीकृत नगरसेवकांमध्ये भाजपचे तीन, कॉंग्रेसचा एक आणि अन्य एक अशी पाच जणांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. या पैकी भाजपचे दोन स्वीकृत नगरसेवक निश्चित मानले जातात. उर्वरीत तिसऱ्या नगरसेवकाकरीता भाजपला पालिकेमध्ये जोड तोडीचे राजकारण करावे लागणार आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...