आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीचा जितेश शर्मा आयपीएल संघ मुंबई इंडियन्समध्ये, विदर्भातील दुसरा खेळाडू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - विदर्भाचे रणजी करंडक क्रिकेटमध्ये प्रतिनिधीत्व करणारा अमरावतीचा यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्माला इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) दहाव्या मोसमासाठी मुंबई इंडियन्स संघाने करारबद्ध केले आहे. आयपीएलमध्ये अमरावतीचे प्रतिनिधीत्व करणारा यंदा एकमेव अन् विदर्भाचे प्रतिनिधीत्व करणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. 
 
आंतरराष्ट्रीय खेळाडू गोलंदाज उमेश यादव हा आयपीएलमध्ये खेळत असून त्याच्यासह यंदा वैदर्भीय म्हणून विदर्भाचा यष्टीरक्षक फलंदाज  मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे. 
 
सलामीला चांगली सुरुवात देणारा अशी जितेशची ख्याती आहे. याआधी मधल्या फळीतील आक्रमक फलंदाज अपूर्व वानखडेची मुंबई इंडियन्सने निवड केली होती. परंतु, त्याला प्रत्यक्ष आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. 
 
मुंबई इंडियन्सने जितेशला करारबद्ध करण्याची ही सलग दुसरी वेळ होय, गतवर्षीही त्याला एमआयने करारबद्ध केले होते. परंतु, राखीव खेळाडू तसेच भविष्यात उपयोगी ठरेल म्हणून त्याला संघात घेण्यात आले होते. यष्टीरक्षणासोबतच सलामीला विदर्भाकडून जितेशने यंदाच्या मोसमात उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे यंदा त्याला संधी मिळण्याची दाट शक्यता असल्याचे मत त्याचे अमरावती येथील प्रशिक्षक प्रा. दिनानाथ नवाथे व सहायक प्रशिक्षक आल्हाद लोखंडे यांनी व्यक्त केले. 
 
गत तीन वर्षे अपूर्व वानखेडेचीही मुंबई इंडियन्सने संघात निवड केली होती. परंतु, त्यालाही संधी मिळाली नाही. विशेष बाब अशी की, राजस्थानविरुद्ध टी २० सामन्याच्या अंतिम षटकात विदर्भाला १४ धावांची आवश्यकता असताना अपूर्वने विजय मिळवून दिला. या कामगिरीमुळेच त्याची सुरेश रैनाच्या नेतृत्त्वातील मध्य विभाग संघात वर्णी लागली आहे. जितेशनेही टी२० स्पर्धेत सलामीवीर म्हणून अर्धशतकी खेळी केली आहे. यंदा त्याला आयपीएलमध्ये संधी मिळाली तर नवीन यष्टीरक्षक फलंदाज म्हणून तो नावारुपाला येऊ शकतो. 
बातम्या आणखी आहेत...