आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amravati Policemen Deploy For Nagpur Winter Session

कर्तव्य'दक्ष' पोलिसांचा नागपूर हिवाळी अधिवेशनात 'बंदोबस्त'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - आपल्या असाधारण कर्तृत्वामुळे नेहमी चर्चेत राहणाऱ्या शहर ग्रामीण दलातील त्या 'कर्तव्यदक्ष' पोलिसांचे 'खास' सर्वेक्षण करून त्यांना डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या नागपूर हिवाळी अधिवेशनाकरिता पाठवण्याचा निर्णय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतला आहे. या 'खास' निवडीबाबत मंगळवारपासून पोलिस दलात जोरदार चर्चा सुरू होती. नागपूरला रवाना होणाऱ्या पथकामध्ये आयुक्तालयातील सुमारे १० कर्तव्य"दक्ष'पोलिस अधिकारी ७५ कर्मचारी ,तर ग्रामीणमधील सात अधिकाऱ्यांसह ७० पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश असून, किमान तीन आठवडे तरी त्यांचा नागपुरात 'बंदोबस्त' राहील, अशी व्यवस्थासुद्धा करण्यात आली आहे.

नागपूर कराराअंतर्गत दरवर्षी राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात होते. अधिवेशन काळात अमरावती आयुक्तालयातून १० अधिकारी ७५ कर्मचारी नागपूरसाठी रवाना होणार आहे. दरवेळी मुख्यालयातील पोलिस आणि थोड्या प्रमाणात ठाण्याचे पोलिस बंदोबस्तासाठी पाठवण्यात येतात. मात्र, यंदा पोलिस आयुक्तांनी अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी ७५ पैकी १९ कर्मचारी हे दहा ठाण्यातून घेतले आहे. या १९ पोलिसांमध्ये काही डीबी स्कॉडचे तर काही खुपिया ठाण्यातील "दक्ष' कर्मचारी आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात बंदोबस्तासाठी संपूर्ण राज्यातूनच पोलिस येत असतात. अमरावती आयुक्तालयातूनही पोलिस कर्मचारी अधिकारी बंदोबस्ताला जाणार आहे. बंदोबस्तासाठी जाणाऱ्या १० अधिकारी ७५ कर्मचाऱ्यांची यादी मंगळवारी दुपारी निघाली.
बंदोबस्तावर पोलिस पाठवणे, ही पोलिस विभागासाठी नियमित प्रक्रिया आहे. त्यामुळे त्यामध्ये नवल असे काय? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला असेल. मात्र, मंगळवारी यादी निघाली आणि त्यामध्ये ७५ पैकी तब्बल १९ नावे ही ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिसांची होती. या १९ नावांमध्ये काही 'खास' नावे आहेत की, अलीकडच्या काळावर नजर टाकली असता ते बंदोबस्तासाठी गेलेले नाहीत. कारण त्यामध्ये काही जण डीबीला कार्यरत आहेत, तर काही खुपियामध्ये आहे. वास्तविकता आपण डीबी स्कॉडमध्ये आहोत, खुपिया आहोत, त्यामुळे नागपूर अधिवेशनासाठी जाणाऱ्या यादीत आपले नाव राहणार, असा तर त्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल. मात्र, मंगळवारी दुपारी यादी निघताच त्यांच्यासह आयुक्तालयातील इतर पोलिसांच्याही भुवया उंचावल्या होत्या. संपूर्ण पोलिस दलात याच विषयाची चर्चा मंगळवारी दुपारपासून सुरू होती. ज्या काही 'खास' पोलिसांचा बंदोबस्तासाठी समावेश करण्यात आला आहे, ती नावे पोलिस दलात सर्वश्रुत आहेत. त्यांची 'कामगिरी' नेहमीच पंचक्रोशीत गाजणारी असते. ते 'खास' कर्मचारी ठाण्याच्या हद्दीत किंवा आयुक्तालयात कोणत्याही ठिकाणी बदलीवर गेले तरी त्यांची 'विशेष कामगिरी' सुरूच असते. त्यामुळे हे खास पोलिस बंदोबस्ताच्या कर्तव्यावर जाणार हे ऐकून पोलिस खात्यातील अनेकांना विश्वासच बसत नाही.