आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती स्मार्ट सिटी; १०० कोटी रुपये उपलब्ध, शासनाने केला महापालिकेचा समावेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अमरावती महापालिकेची स्मार्ट सिटीकरिता निवड करण्यात आली असून, सिडकोच्या माध्यमातून १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. अमरावतीसह राज्यातील आठ शहरांची स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी निवड करण्यात आल्याची घोषणा शासनाकडून शनिवार, १८ जून रोजी करण्यात आली आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी निवड झाल्याने अमरावतीला १०० कोटी रुपये प्राप्त होणार आहे. शंभर कोटी रुपयांमधून शहरातील पाणीपुरवठा वाहतूक नियमन करण्याचे कार्य प्राथमिक टप्प्यात होणार असल्याचे संकेत आहे. शहरांना स्वच्छ सुंदर करण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाकडून ‘स्मार्ट सिटी’ हा प्रकल्प राबवला जात आहे. स्पर्धेच्या पहिल्या फेरीत देशातील शंभर शहरांची निवड या प्रकल्पासाठी करण्यात आली. अनेक प्रयत्न करूनदेखील अमरावती महापालिकेची प्रथम फेरीत निवड झाली नव्हती. पहिल्या फेरीतून बाद झालेल्या राज्यातील शहरांमध्ये स्मार्ट सिटी प्रकल्प राबवण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला. राज्य पातळीवरील उच्चाधिकार समितीने या योजनेंतर्गत १० शहरांची यादी तयार केली आहे. केंद्र शासनाकडून देशातील १०० शहरांच्या पहिल्या फेरीत पुणे सोलापूर या दोन शहरांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर अमरावती शहराचे नाव स्मार्ट सिटी प्रकल्पात येईल की नाही, याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, शासनाच्या नगरविकास विभागाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार अमरावतीतदेखील हा प्रकल्प राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. आठ शहरांची निवड दुसऱ्या फेरीत होणे अपेक्षित होते; मात्र शहराच्या विकासाच्या दृष्टीने याच आर्थिक वर्षापासून ही योजना राबवणे आवश्यक असल्याने शासनाने हा निर्णय घेतला आहे. यासाठी केंद्र शासनाचा ५० टक्के निधी, तर राज्य संबंधित महानगरपालिकेचा प्रत्येकी २५ टक्के हिस्सा राहणार आहे. त्यांपैकी केंद्राचा निधी म्हणून सिडकोकडून १०० कोटी रुपये महापालिकेला मंजूर झाले आहे.

अहवालावर कोट्यवधींचा खर्च : स्मार्टसिटी प्रकल्पासाठी महापालिकेकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. पहिल्या फेरीत प्रकल्प अहवालासाठी आलिया कन्सल्टन्सी या कंपनीसोबत करार केला. महापालिकेने याकरिता कंपनीला तब्बल ८० लाख रुपये दिले. मात्र, निवड झाल्याने नवीन डीपीआर तयार करण्यासाठी ३९ लाख रुपयांमध्ये अन्य दुसऱ्या कंपनीसोबत करार करण्यात आल्याची माहिती आहे.

समिती गठित : स्मार्टसिटीसाठी ‘विशेष उद्देश वाहन' समिती गठित करण्यात येणार आहे. या समितीच्या अध्यक्षपदी नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव सुनील पोरवाल राहणार आहे. जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त सहायक संचालक नगररचना हे या समितीचे सदस्य राहणार आहेत.

पूर्वीचा सिंगल प्लॅन : स्मार्टसिटीकरिता पूर्वी सिंगल प्लॅन तयार करण्यात आला होता. यानुसार शहरात एकाच वेळी कार्यान्वित लागू होईल अशा यंत्रणांचा समावेश होता. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची नव्याने टाकली जाणारी पाइपलाइन तसेच वाहतूक नियंत्रणावर भर दिला होता.

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत १०० कोटी रुपये उपलब्ध होणार आहे. आवश्यक असलेल्या विकासकामांना प्राथमिकता देत त्याबाबत नियोजन केले जाणार आहे. सिडकोकडून अंतिम मंजुरी देण्यात आल्यानंतर योजनेस सुरुवात होईल. प्राथमिक टप्प्यात होणार पाणीपुरवठा, वाहतूक नियमन यावर भर दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

पुढे काय?
हेमंत पवार, महापालिकाआयुक्त
शासन निर्णयानुसार होणार कारवाई
स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये अमरावती शहराची निवड करण्यात आली आहे. सिडकोच्या माध्यमातून प्रकल्पाचे कार्य केले जाणार आहे, एवढेच शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. मागील प्रकल्प अहवाल पूर्णपणे सादर करण्यात आलेला नाही. शिवाय अंतिम मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे शासन निर्णयानुसार अाता यापुढची कारवाई केली जाईल.

बातम्या आणखी आहेत...