आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी, केळीच्या खांबावरील मल्लखांब ही एचव्हीपीएम अमरावतीची देण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाण्यात मल्लखांब सादर करताना मल्लखांबपटू - Divya Marathi
पाण्यात मल्लखांब सादर करताना मल्लखांबपटू
अमरावती : ११व्या शतकातील ग्रंथांत नोंदलेल्या, शिवशाहीसह पेशवाईत प्रसिद्धीस आलेल्या मल्लखांब व्यायाम प्रकाराला विविध क्रीडा मंडळांसह श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने साता समुद्रापार नेले. मल्लखांबच्या चित्तथरारक कसरती बघितल्यानंतर कोणाच्याही अंगावर रोमांच उभे राहतील असे १२ प्रकार आहेत. यापैकी पाण्यावरील अन् केळीच्या खांबावरील मल्लखांब ही एचव्हीपीएम अमरावतीची देण होय. 
 
मुळ प्रकार हा खालून वरपर्यंत निमुळत्या शिसम, सागाच्या खांबावरील मल्लखांब हा होय. आधी मुलेच यावर कसरती करायचे. नंतर मुलींसाठी जाड सुती दोरावरील (रोप) प्रकार अस्तित्वात आला. या दोन्हींचे एचव्हीपीएमच्या सहकार्याने जिल्ह्यात कौशल्यपूर्ण प्रदर्शन केले जाते. यात जिल्ह्यासह शहरात मुले मुलींच्या गटात उत्कृष्ट खेळाडू घडत आहेत. मयुर दलाल, नरेंद्र गाडे या दोघांनी वर्षभर युरोपातील जर्मनी, डेन्मार्कसह अनेक देशांत मल्लखांबचे चित्तथरारक प्रदर्शन केले. पाण्यावरील मल्लखांब हा प्रकार एचव्हीपीएममध्ये २००५ मध्ये सादर केला अन् तो यशस्वी ठरला. पाण्यावर लाकडी फळी ठेऊन त्यावर मल्लखांबच्या कसरती जागतिक परिषदेत सादर केल्या. त्या बघून विदेशी पाहुणे हरखून गेले होते. पाण्यावरच जळता मल्लखांब सादर केल्यानंतर विदेशी क्रीडा तज्ज्ञांनी तोंडात बोटेच घातली. 
 
यासह २०१४ मध्ये एचव्हीपीएमच्या शताब्दी वर्ष कार्यक्रमात केळीच्या खांबावरील मल्लखांबवर कमी वजनाच्या खेळाडूंनी कसरती केल्या. यासाठी मजबूत, खालून वर निमुळता खांब निवडावा लागला. निराधार मल्लखांब हा धोकादायक प्रकार असून खांब टेबलवर ठेऊन आधाराविना कसरती कराव्या लागतात. यासाठी सरावाची आवश्यकता असते, अशी माहिती साईचे मल्लखांब प्रशिक्षक विलास दलाल यांनी दिली. 
 
 
असे आहेत मल्लखांबचे प्रकार 
खांब,दोर, वेतावर, टांगता, निराधार, काचेच्या बाटलीवर, आंतरपकड, जळता, हाती शस्त्र घेऊन, सायकल, केळीचा खांब, ऊसावरील, पाण्यावरील मल्लखांब राज्यासह देशात प्रसिद्ध आहेत. २५ वर्षांपूर्वीपर्यंत वेताच्या मल्लखांबवर कसरती व्हायच्या मात्र कालांतराने हा प्रकार बंद झाला. आता हाती शस्त्र, जळते टेंभे घेऊन, सायकलवरील मल्लखांब हे प्रकार बघायला मिळतात. यात टेबलच्या चारही पायांना बाटल्यांवर ठेऊन त्यावर मल्लखांबच्या कसरती तर रोमहर्षक असतात. 
बातम्या आणखी आहेत...