आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संतप्त पालकांसह विद्यार्थ्यांनी मोझरीत रोखली दोन तास बस, उपस्थित केला सुरक्षेचा प्रश्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिवसा - साहेब,तुमच्या महामंडळाची बस वेळेवर येत नाही. आम्हा विद्यार्थ्यांची राेजचीच ही व्यथा आहे. आम्ही आंदोलन केले की, तुमची लाल परी चार दिवस वेळेवर येते. नंतर मात्र तोच दिवस, तीच गाडी, अन् रोज होणारी तीच रात्र. आम्ही शिकायचे तरी कसे? घरची परिस्थिती बेताचीच, तरी कसे बसे आम्ही शिकतो. साहेब, आमच्या ठिकाणी जर तुमच्या मुली असत्या, तर तुम्ही असेच केले असते का, असे म्हणत शिरजगाव, धोत्रा, माळेगाव येथील शेकडो विद्यार्थिनींनी बुधवारी (दि.१ फेब्रुवारी) रात्री साडे आठच्या सुमारास महामंडळाची बस मोझरी बसस्थानकात दोन तास रोखून धरली. 

प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद वाक्य घेऊन धावणारी एसटी बस ही शहरासह ग्रामीण भागात सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय. मात्र हीच लाल परी तालुक्यातील शिरजगाव, धोत्रा, माळेगावसह इतर गावातील विद्यार्थ्यांसाठी डोके दुःखी ठरू लागली आहे. ग्रामीण भागासाठी सायंकाळी सहा ते साडे सहाच्या सुमारास अमरावती येथून मोझरी येथे पोहोचणारी एसटी रात्री आठच्या सुमारास मोझरी बसस्थानकात पोहोचत असल्याने विद्यार्थ्यांना पालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. आपल्या मुलांनी शकून मोठे व्हावे म्हणून ग्रामीण भागातील पालक जीवाचा आटापिटा करून मुला-मुलींना शाळेत पाठवतात. पालकांच्या अपेक्षेवर उतरावे म्हणून विद्यार्थीही जीवाचे रान करतात. मात्र सकाळी शाळा, महाविद्यालयासाठी घरातून बाहेर पडलेले विद्यार्थी एसटी महामंडळाच्या वेळकाढू धोरणामुळे रात्री उशीरा घरी पोहोचत असल्याने पालकांचा जीव टांगणीला लागला आहे. याबाबत वारंवार वरिष्ठांकडे निवेदनेही देण्यात आली. आंदोलनेही करण्यात आली, मात्र चार दिवसांनी “ये रे माझ्या मागल्या’ या परिस्थितीला सामोरे जावे लागत असल्याने बुधवारी संतप्त विद्यार्थी पालकांनी संजय देशमुख यांच्या नेतृत्वात दोन तास एसटी बसस्थानकात रोखून धरली. वरिष्ठांनी हस्तक्षेप केल्यानंतर पालक आणि विद्यार्थिनींनी एसटी रोखो आंदोलन मागे घेतले. 

परिस्थिती जैसे थे 
“शाळा सकाळची अन् विद्यार्थी घरी पोहोचतात एकदम रात्री’’ या मथळ्याचे वृत्त दै.दिव्य मराठीने यापूर्वीच प्रकाशित करून विद्यार्थ्यांची समस्या मांडली होती. त्या वेळी अमरावतीचे तत्कालीन आगार व्यवस्थापक मनोहर भजेकर यांनी बस वेळेवर पोहोचण्याचा कटाक्षाने प्रयत्न करीन असे आश्वासन दिले होते. मात्र जवळपास सहा महिन्यांचा कालावधी लोटूनही परिस्थिती जैसे थेच आहे बसच्या अनियमिततेमुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. 

शिक्षणाची गोडी असलेल्या ग्रामीण भागातील पालकांनी आपल्या मुलांना शिकविण्यासाठी जीवाचे रान करीत असताना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या या अडवणुकीच्या धोरणामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. एकूणच सर्वत्र असंतोष खदखदत आहे. 

म्हणून रोखली बस 
अमरावती वरून शिरजगाव मोझरीसाठी येणाऱ्या एसटीच्या मोजक्याच फेऱ्या आहेत. शेवटची बस ही सहा वाजता मोझरीला पोहचणे अपेक्षित असताना ती रात्री आठनंतर येत असल्याने विद्यार्थ्यांना अंधारातच वाट बघावी लागते. प्रसंगी खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो. याचा सर्वाधिक त्रास विद्यार्थिनींना सहन करावा लागतो. संतप्त विद्यार्थ्यांनी बुधवारी दोन तास एसटी रोखून धरली. 

अनुचित घटनेस जबाबदार कोण? 
चारदिवस बस वेळेवर येते. नंतर “जैसे थे’’ परिस्थितीचा विद्यार्थ्यांना सामना करावा लागतो. शाळा सुटल्यावर रात्री आठ वाजेपर्यंत बसस्थानकात बसची वाट पहात बसावे लागते. विद्यार्थिनींसोबत काही अनुचित प्रकार घडल्यास जबाबदारी कोण घेणार ? - श्रद्धाभोंबे, विद्यार्थिनी 

तांत्रिक कारणांमुळे होतो बसला उशीर 
काही तांत्रिक कारणामुळे एखाद्या वेळेस बसला उशिरा होतो. बुधवारी ती बस परतवाडा येथे गेली होती. त्यामुळे वेळ झाला. लवकरच मोझरीवरून पाच वाजता निघेल अशा गाडीची व्यवस्था करण्याचा विचार सुरू आहे उमेशइंगळे, आगार व्यवस्थापक, अमरावती डेपो. 

महिला प्रवाशांची कुंचबणा 
मोझरी येथील बसस्थानकावरून दररोज हजारो प्रवाशी प्रवास करतात, परंतु येथे ना धड पाण्याची व्यवस्था आहे, ना स्वच्छतागृहाची. त्यामुळे महिला प्रवाशी विद्यार्थीनींना अनेक गैरसोईचा सामना करावा लागतो.
बातम्या आणखी आहेत...