आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अँटिबायोटिक्स औषधांचा अनावश्यक वापर घातकच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - ‘साध्या- साध्या आजारांवर सध्या सर्रास अँटिबायोटिक (प्रतिजैविक) औषधांचा वापर हाेत अाहे, ताेे भविष्यात रुग्णासाठी अतिशय घातक ठरू शकतो. त्यामुळे सर्दी-पडसे यासारख्या किरकोळ आजारांवर अँटिबायोटिक औषधांचा वापर शक्यतोवर टाळायलाच हवा,’ असा इशारा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला अाहे. तसेच याबाबत वैद्यकीय क्षेत्र तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्येही जाणीव निर्माण होण्याची गरज असल्याचे मतही मांडण्यात अाले.

अँटिबायोटिक औषधांच्या वापरावर जागृतीबाबत नागपुरात इंडियन पेडियाट्रिक असोसिशनच्या वतीने कार्यशाळा अायाेजित करण्यात अाली अाहे. या निमित्ताने ‘दिव्य मराठी’ने ज्येष्ठ पेडियाट्रिक डॉ. सी. एम. बोकडे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी या अाैषधांचे विपरित परिणाम सांगून हा इशारा दिला.

डॉ. बोकडे म्हणाले की, ‘आजकाल काेणताही अाजार असाे त्यातून लवकर बरे होण्यासाठी सर्रास अँटिबायोटिक औषधांचा वापर केला जात आहे. डॉक्टरांचा एक वर्गही ही औषधे सर्रास लिहून देतो. तर दुसरीकडे लोक स्वत:ही लवकर बरे होण्यासाठी या औषधांचा वापर करताना आढळतात. हे अतिशय घातक आहे,’ याकडेही त्यांनी लक्ष वेधले. ‘जगभरात मागील काही वर्षांत नवी अँटिबायोटिक (प्रतिजैविक) औषधे विकसित होऊ न शकल्याने सध्या जुन्याच औषधांमध्ये सुधारणा घडवून त्यांचा वापर वैद्यकीय क्षेत्रात होत आहे.

आजार पसरवणाऱ्या जिवाणूंचीही प्रतिकारशक्ती वाढल्याने सध्या वापरात असलेली अँटिबायोटिक औषधे बऱ्याचदा परिणामकारक न ठरण्याची शक्यता बळावते. अशा स्थितीत गंभीर स्वरूपाचे इन्फेक्शन झाल्यावर काय घ्यायचे? असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सर्वांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे,’ असा सावधानतेचा इशाराही डाॅ. बाेकडे यांनी दिला.

पुढील पिढीसाठी अाैषधे राखून ठेवण्याची गरज
‘अँटिबायोटिक (प्रतिजैवक) औषधांचा अतिवापर टाळण्यासाठी मागील तीन वर्षांपासून देशभरात जागृती घडवण्याचे प्रयत्न इंडियन मेडिकल असाेसिएशनसह अनेक तज्ज्ञ डॉक्टरांच्या संघटनांकडून होत आहेत. डॉक्टरांसह सर्वसामान्य नागरिकांनाही ही जाणीव करून दिली जात आहे. खरे तर सध्याची अँटिबायोटिक औषधे पुढील पिढ्यांसाठी राखून ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. एखाद्या अाजारावरील चाचण्यांमध्ये इन्फेक्शन झाल्याचे स्पष्ट होत असेल तरच अँटिबायोटिक औषधांचा वापर योग्य ठरू शकतो,’ असेही डॉ. बोकडे यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...