आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यवतमाळच्या जीएमसीमध्ये मधुमालती यांचे शवविच्छेदन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरातील किशोरनगर भागात राहणाऱ्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका मधुमालती धारिया यांचा घरात गळा आवळून खून झाल्यानंतर शुक्रवारी शवविच्छेदन होणार होते. मात्र, मृतक महिलेचे पती अॅड. जालंधर धारिया यांनी पोलिस जिल्हा शल्यचिकित्सकांना पत्र देवून पत्नीच्या मृतदेहाचे यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पॅनेलद्वारे विच्छेदन व्हावे,अशी मागणी केली.त्यामुळे पोलिसांनी मृतदेह यवतमाळला रवाना केला असून, शनिवारी शवविच्छेदन होणार आहे. दरम्यान, नवनियुक्त पोलिस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी शुक्रवारी सायंकाळी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
मधुमालती धारिया गुरुवारी दुपारी घरात एकट्याच असताना अज्ञात मारेकऱ्याने त्यांचा गळा आवळून खून केला. यावेळी घरातून एलसीडी चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. ही बाब मधुमालती यांचे पती अॅड. धारीया यांना लक्षात आली. पोलिसांनी गुरूवारी रात्रीपासून धारिया यांच्या घरात पाहणी केली ही पाहणी शुक्रवारी पहाटेपर्यंत सुरू होती. त्यावेळी पोलिसांना धारिया यांच्या घरातील पाण्याच्या टाक्यात पॉलीथीन मिळून आली तसेच हॉलमध्ये रुमाल मिळाला. पोलिसांनी पॉलीथीन रुमाल जप्त केला. मारेकऱ्याने गळा दाबताना हॅन्डग्लोव्हज म्हणून पॉलीथीनचा वापर केला तसेच रुमालाचा बोळा तोंडात कोंबला असावा, असा अंदाज आहे. पॉलीथीन पाण्यात टाकल्यामुळे त्यावरील हाता- बोटाचे ठसे मिटून जातील, असा मारेकऱ्यांचा उद्देश असू शकतो. मारेकऱ्यांनी धारिया यांच्या घरातून केवळ एलसीडी चोरून नेला आहे, याचवेळी मधुमालती यांची पर्स घटनास्थळी पडली होती, त्यामध्ये हजार ९०० रुपये होते, मारेकऱ्याने ते नेले नाही किंवा घरात असलेले दागिने किंवा रक्कमसुद्धा नेली नाही.त्यामुळे मारेकऱ्याचा उद्देश केवळ मधुमालती यांचा खून करणे, हाच होता, असा अंदाज पोलिसांकडून लावला जात आहे. मात्र मारेकऱ्यांपर्यंत पोहचता येईल, असा कोणताही सुगावा फ्रेजरपुरा किंवा गुन्हे शाखा पोलिसांना शुक्रवारी रात्री वाजेपर्यंत तरी मिळाला नव्हता.दरम्यान या गंभीर प्रकरणाची दखल घेत पोलिस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी शुक्रवारी सायंकाळी धारीया यांच्या घरी जावून पाहणी केली अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली.

मधुमालती त्यांचे पती हे दोघेच घरात रहात होते.मोठा मुलगा जय हे जबलपूर उच्च न्यायालयात ट्रान्सलेटर तर धाकटा मुलगा सुमेध हे अमरावतीतच व्हीएमव्ही महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. तसेच अॅड. धारिया हे पोलिस अधिकारीसुद्धा होते. १९७५ ते १९७८ या काळात त्यांनी अमरावतीत पोलिस उपनिरीक्षक म्हणून सेवा दिली आहे. एका प्रकरणात आरोपीला मारहाण करण्याचा ठपका ठेवून त्यांना सेवेतून कमी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर धारिया हे वकिलीचा व्यवसाय करत आहे. या प्रकरणात फ्रेजरपुरा पोलिसात अॅड. धारिया यांच्या तक्रारीवरून दरोड्याच्या उद्देशाने खून करणे, या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.