आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोनशे कोटींचे नुकसान करत नागपुरात रामदेव बाबांच्या पतंजली समूहाला जागा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर : नागपूरच्या मिहान सेझ प्रकल्पाची सुमारे २३० एकर जमीन रामदेव बाबांच्या पतंजली समूहाला २५ लाख रुपये प्रति हेक्टर अशा नाममात्र दराने देण्यात आली.
मिहानमधील जमिनी उद्योजकांना देण्याच्या सध्याच्या नियमांमधील काही नियम बदलून देण्यात आल्याने सरकारचे तब्बल २०८ कोटींचे नुकसान झाले असून सरकारने नुकसान सहन करत एकप्रकारे बाबांना गुरुदक्षिणा दिल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार शरद रणपिसे यांनी विधान परिषदेत केला.

शुक्रवारी लक्षवेधी सूचनेद्वारे रणपिसेंनी सरकारने पतंजलीला जागा देताना आपलेच नियम कसे मोडीत काढले हे उघड केले. पतंजली फूड व हर्बल पार्कचे भूमिपूजन १० सप्टेंबर २०१६ रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले होते. सरकार दरबारी रामदेवबाबांचे वजन असल्याने नाममात्र दराने त्यांना जमीन देण्यात आली.
या जमिनीची किंमत सुमारे एक कोटी प्रति हेक्टर असताना रामदेव बाबांना सवलतीच्या दराने २५ लाख दराने जागा देण्यात आली. बाजारभावाचा विचार करता २६७ कोटी जमिनीची किंमत होत असताना अवघ्या ५८ कोटींत जागा रामदेवबाबांना दान करण्यात आली.
पतंजलीला कमी दराने निविदा का मंजूर करण्यात आली? लागेबांधे असल्यानेच ही गुरुदक्षिणा देण्यात आल्याचे स्पष्ट दिसत आहे. कोणता योग रामदेवबाबांनी शिकवल्याने निविदा मंजूर करण्यात आली, हे लोकांना समजायला हवे. याप्रकरणी निविदा प्रक्रिया चुकीची झाल्याने ती ताबडतोब रद्द करायला हवी, अशी मागणी रणपिसे यांनी केली.

यावर पतंजलीला देण्यात आलेली जागा ही सेेझच्या बाहेरील हाेती. ती विकसित झालेली नव्हती. यामुळे त्याला सेझच्या बाजारभावाचे निकष लावता येणार नाहीत. मुख्य म्हणजे पतंजली उद्याेग समूहामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार असून त्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळेल. भविष्यात १०० कोटी शेतकऱ्यांच्या खाती जमा होऊ शकतात. तसेच ५ हजार लोकांना रोजगारही मिळेल, अशी सारवासारव मंत्री मदन येरावार यांनी केली.

यावर विरोधकांनी एकच गोंधळ केला. सरकारचे हे उत्तर रामदेवबाबांना पाठीशी घालण्याचा प्रकार आहे. उद्योगाला जागा देताना निकष मात्र सामाजिक लावून कोट्यवधींचे नुकसान करण्याचा हा प्रकार आहे. येरावार यांनी सारवासारव करून सभागृहाचा हक्कभंग केला आहे, असे रणपिसे म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...