अमरावती - बहुजनांची एकताच त्यांच्या समस्यांना वाचा फोडणार आहे. त्यामुळे संघटीतपणे काम करून गत अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांचा विचार करण्यास शासनाला भाग पाडू अशा निर्धारासह जिल्हा संयोजन समितीद्वारे आयोजित बहुजन क्रांती मोर्चा आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. एकाचवेळी निळे, पिवळे, केशरी हिरवे झेंडे फडकत होते. या मोर्चात विविध समाजातील सुमारे ७०० लोकांचा सहभाग होता.
सकाळी ११ वाजता निघणारा मोर्चा दु. २.३० वाजता सायन्सकोर मैदानावरून निघाला. सभेचे रूपांतर मोर्चात झाले. यानंतर रेल्वे स्थानक, राजकमल चौक, चित्रा चौक, मालविय चौक, इर्विन चौक, गर्ल्स हायस्कूल चौक या मार्गाने हा मोर्चा सायं. वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला. मोर्चात ओबीसी, एससी, एसटी, व्हीजेएनटी, डीएनटी, मराठा-कुणबी, एसबीसी, बलुतेदार, अल्पसंख्यांक मुस्लीम, बौद्ध, जैन, ख्रिश्चन, लिंगायत, शीख समुदायाचे लोक सहभागी होते. चार रंगांचे झेंडे घेऊन रांगेत या मोर्चात प्रथम महिला, मागे पुरुष होते. बहुजन एकतेचे नारेही मोर्चेकरी देत होते. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेल्यावर महिला, संयोजन समितीचे पदाधिकारी, महिला कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना ३६ मागण्यांचे निवेदन दिले.
६९ वर्षांपासून शासनाने बहुजन समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे बहुजनांच्या समस्या कायम आहेत. त्यांचे निवेदन मुख्यमंत्री, पंतप्रधानांकडे पाठवावे, अशी विनंती संयोजन समिती पदाधिकाऱ्यांनी केली. अॅट्राॅसिटी कायदा कडक करावा, यासह इतर मागण्यांचे निवेदन सादर केले. याप्रसंगी महिला कार्यकर्त्या रेशमा सोळंके, गजाला परवीन, अर्चना भातकुले, नलिनी इंगळे, माधुरी खोब्रागडे, अनुपमा कटक तलवारे, नजिमा परवीन, रंजिता पाटील, रंजना चव्हाण, ललिता तायवाडे उपस्थित होत्या.